सजग नागरिक म्हणून भूमिका मांडणं यात गैर काय? तुकारामांच्या गाथा त्यांनी प्रश्न उपस्थित केले म्हणून बुडवल्या गेल्या तरीही आपण त्यांना मानतोच. हिंदू या शब्दाची व्याख्या विनोबांनी केली आहे. हिंसा झाल्यानंतर ज्याला दुःख वाटतं तो हिंदू असं विनोबा भावे म्हणाले आहेत. त्यामुळे मी त्या विचारांचा पाईक आहे असं अतुल पेठे यांनी म्हटलं आहे शिवाय एखाद्या कलाकृतीने, नाटकाने हिंदू धर्माला काही होईल इतका हिंदू धर्म लेचा पेचा आहे का? असाही प्रश्न अतुल पेठेंनी विचारला.
अतुल पेठे काय म्हणाले?
मी एक सजग नागरिक आहे, देशाची घटना मानणारा आहे. प्रत्येक काळाचे स्वतःचे काही गंभीर प्रश्न असतात. ते प्रश्न व्यासांनाही चुकले नाहीत, तुकारामांनाही चुकले नाहीत. आपल्यालाही चुकले नाहीत यापुढच्या पिढ्यांनाही चुकणार नाहीत. लोक पळवाट कुठे काढतात? की त्याबाबत बोलायचं नाही. का? तर आर्थिक फायदे असतील, सरकारी दिवे ओवाळणीचे कार्यक्रम होणार नाहीत त्यामुळे अनेक कलाकार गप्प बसतात. पण कलावंताचं काम वाचा फोडणं आहे. त्याचा वारसाही आपल्याला लाभला आहे.
व्यक्त व्हायचं नसेल तर मग तुकाराम महाराजांपासूनच प्रश्न निर्माण होतील-अतुल पेठे
जर व्यक्त व्हायचं नसेल तर मग तुकाराम महाराजांपासून प्रश्न निर्माण होतील. वेदांचा तो भार असं तुकाराम महाराज म्हणाले आहेत त्यामुळे त्यांच्या गाथा बुडवल्या. तरीही आपण तुकारामांना महत्त्वाचं मानतोच. कारण त्यांनी काही फक्त विठ्ठलाची स्तुती करणारी गाणी लिहिली नाहीत. लोकांच्या डोळ्यात अंजन घालण्याचं काम केलं. लोकांना दृष्टी दिली. तुकारामांपासून कुठलाही जगातला कवी, चित्रकार अगदी पिकासो असेल गुर्मिका हे त्याचं महान चित्र आहे, त्याच्यावर बॉम्ब पडल्यावर त्याची अस्वस्थता त्याने प्रकट केली. उत्तम चित्रकार हेच करतात. कादंबरीकारही हेच करत असतात. त्यामुळे समाजात जे चाललं आहे त्यातून प्रकट होत असतं. हंगामा खडा करना हमारा मकसद नहीं और कभी नहीं था. काहीतरी बोलून दुसऱ्यांच्या भावना दुखावणं याला माझा आक्षेप आहे. दुसऱ्याचा विचार करुनच बोललं पाहिजे असं अतुल पेठे यांनी म्हटलं आहे. अतुल पेठे यांनी बीबीसी मराठीला मुलाखत दिली या मुलाखतीत त्यांनी मतं मांडली आहेत.
माझी भूमिका आशावादी आहे-पेठे
एखाद्या काळात सगळंच वाईट चाललं आहे असं वाटत नाही. माझी भूमिका आशावादी आहे, कारण आशावादी नसेन तर मी नाटकच लिहू शकत नाही. वेटिंग फॉर गोदो हेच शिकवतं की उद्या परिस्थिती बदलणार आहे. त्यामुळे कालखंड वाईट असतात, त्या कालखंडातील माणसं प्रश्नांना सामोरी कशी जातात आणि आकलन कसं करतात हे महत्त्वाचं आहे. मी महाराष्ट्रात जिथे फिरतो तिथे मी पाहतो की तरुण, मुलं, मुली हे सगळेच नव्या विचारांनी भारलेले आहेत त्यांना काहीतरी करायचं आहे. आत्ताचा कालखंड हा गंमतीदार आहे. फक्त भारतात नाही तर जगभरात आहे. मला अनेकजण कम्युनिस्ट, समाजवादी वगैरे म्हणतात. महाराष्ट्रात एक बरं असतं की महाभारत न वाचताही त्यावर बोलणारे लोक खूप असतात. कशाविषयी काहीच माहीत नाही आणि बोलता येतं. मी कुठल्या पक्ष किंवा संघटनेचा बांधील माणूस नाही. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा मी पुरस्कर्ता आहे. फुर्रोगामी वगैरे म्हणणं हा राजकारणाचा भाग आहे असं मला वाटतं असं अतुल पेठे म्हणाले.
पुरोगामी असणं चूक आहे का? अतुल पेठेंचा सवाल
पुरोगामी असायला नको का? चांगली कविता लिहायची नाही का? सतीची चाल पुन्हा आणायची आहे का? मुंडन प्रथा वगैरे रुजवायची आहे का? आगरकर पुरोगामीच होते, राजा राममोहन रॉय पुरोगामीच होते. पुरोगामी म्हणजे प्रोग्रेसिव्ह. र. धो. कर्वेही पुरोगामीच होते. आगरकरांची परंपरा ही र. धो. कर्वेंनी पुढे चालवली आणि बुद्धिप्रामाण्यवादाच्या विचारांवर दाभोलकरांनी कर्वेंची परंपरा पुढे चालवली. पुरोगामी म्हणून मला कुणी शिवी दिली तर मी ती शिवी म्हणून घेणार नाही. एखादा माणूस जर मला म्हणाला की तुम्ही गाढव आहात तर मला माहीत आहे ना मी नाही. तो कुठल्या तरी वेगळ्या गाढवाला म्हटला असेल, किंवा त्याचा तो भ्रम असेल त्याला तपासलं पाहिजे. गाणाऱ्याच्या गळ्यात दोष असतो तसा ऐकणाऱ्याच्या कानातही असू शकतो. मी वंचित, शोषित, पीडितांच्या बाजूने आहे असंही अतुल पेठे या मुलाखतीत म्हणाले.
मी फिसझमच्या विरोधात आहे-पेठे
मी फॅसिझमच्या विरोधात आहे. हिटलरने, मुसोलिनीने काय केलं माहित आहे का? माणसांना मारलं. ते चुकीचं आहे. माणसं माणसंच असतात आणि त्यांचं रक्त लालच असतं. धर्म, आयडिओलॉजी या भोवती कथा रचल्या आहेत. मी, तुम्ही आपल्या सगळ्यांची पृथ्वी आहे ती काही अमुक अ ब क लोकांची नाही. जातपात, धर्म, भाषेच्या भिंती तयार केल्या आहेत. एकमेकांचा आदर करा की त्यात काय चूक आहे. मानवतावादी दृष्टीकोन असला पाहिजे. जात हा कलंक आहे, पण धर्मामध्ये वैविध्य आहे. धर्माचं रुपातंर धर्मांधेत करणं गैर आहे असंही अतुल पेठे यांनी म्हटलं आहे.
हिंदू खतरेमे असं तुम्हाला का वाटतं?
मला एक कळत नाही की माझ्या विचारांची, नाटकांची तुम्हाला भीती का वाटते? तुम्हाला असं का वाटतं की यामुळे हिंदू धर्म खतरे में येईल. हिंदू धर्म इतका लेचापेचा आहे का? नरेंद्र दाभोलकर हे हिंदू धर्मालाच मोठं करत होते असं मला वाटतं. कारण चार्वाकाची परंपरा आपण खंडित करता कामा नये. मी हिंदू आहे पण मला मुस्लिमांविषयी द्वेष करण्याचं काही कारण नाही. माझा धर्म मला द्वेष शिकवतच नाही. हिंदू या शब्दाची विनोबांनी केलेली व्याख्या आहे हिंसेने दुःखी होतो तो हिंदू मी त्या विचारांचा पाईक आहे असं अतुल पेठे म्हणाले.