मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारण राज ठाकरे, हनुमान चालिसा आणि मशिदीवरील भोंगे यांच्याभोवती फिरत आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि पत्नी शर्मिला ठाकरे यांनी नुकतचं एबीपी माझ्याच्या ‘माझा कट्टा’मध्ये सहभाग घेतला होता. यातून त्यांनी आपल्या वैयक्तिक आणि राजकीय आयुष्यातील अनेक किस्से सांगितले आहेत. यावेळी शर्मिला ठाकरे यांनी राज ठाकरे यांना हनुमान चालीसाच का म्हणायची? असा प्रश्न विचारला. यावेळी राज ठाकरेंनी देखील यामागची आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

यावेळी त्यांनी म्हटलं की, मशिदीवरील भोंगे हा काही राजकीय विषय नाही, तर तो सामाजिक विषय आहे. भोंग्याच्या आवाजाचा प्रत्येक नागरिकाला त्रास होतो. मुस्लीम समाजातील लोकांना देखील याचा त्रास होतो. गणेशोत्सवाच्या दिवसात जसा हिंदूंना डीजेचा त्रास होतो. तसाच मशिदीवरील भोंग्यांचा त्रास मुस्लिमांना होतो. घरात अनेक लहान लेकरं आणि वयोवृद्ध असतात. काही दिवसांपूर्वी मी दुबईला गेलो होतो. तेव्हा मला तिथे कोणत्याही मशिदीवर लाऊड स्पिकर दिसला नाही. त्यामुळे भारतात मशिदीवर लाऊडस्पिकर का आहेत? असा सवालही राज ठाकरेंनी यावेळी विचारला.

यापूर्वी देखील मी अनेकदा मशिदीवरील भोंग्यांचा प्रश्न उपस्थित केला होता. पण आता केवळ मी पर्याय दिल्यामुळे अनेकांना झोंबलं आहे. त्यामुळे मशिदीवरील भोंगे हा काही राजकीय विषय नाही, तर तो सामाजिक विषय आहे, हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवं. देशातल्या मशिदींवरचा लाऊड स्पिकर जाणे गरजेचे आहे. देशातल्या सर्व राजकीय पक्षांनी आणि हिंदूंनी या गोष्टींचा विचार करणे गरजेचं आहे, त्यांनी ते म्हणणं गरजेचे आहे. हा केवळ मुंबईचा विषय नाहीये ना, हा देशभरातल्या सर्वांना होणार त्रास आहे हा, असंही ते यावेळी म्हणाले.

बॉलिवूडमध्ये अभिनेता आमिर खान आणि सलमान खान यांच्याशी तुमची चांगली मैत्री आहे. पण मराठी भाषेच्या आग्रहामुळे तुमच्या मैत्रीत दुरावा आला का? असा प्रश्नही राज ठाकरेंना ‘माझा कट्टा’मध्ये विचारला. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, “देशहितासाठी काही चागलं करायचं असेल, तर काही संबंध तुटले तरी चालतील”. पण अशी वेळ अद्याप आली नाही. मराठी भाषेसाठी केलेल्या आंदोलनामुळे अनेकांना तो प्रश्न महत्त्वाचा वाटला. आमिर खानने तर मराठी शिकण्यासाठी शिकवणी लावली. आजही आमिर खान किंवा सलमान खान कधी भेटले, तर माझ्याशी मराठीतून संवाद साधतात, असंही राज ठाकरे म्हणाले.