२३ नोव्हेंबर २०१९ हा असा दिवस होता जो दिवस महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास कधीही विसरणार नाही. कारण यादिवशी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. भाजपा आणि शिवसेनेचं भांडण सुरू असताना आणि महाविकास आघाडी स्थापन होईल असं वाटत असतानाच ही घटना घडली होती. या घटनेला पहाटेचा शपथविधी असंही म्हटलं जातं. याबाबत अजित पवार यांनी गेल्या तीन वर्षात बोलणं टाळलं आहे. आपण बोलणं का टाळतो? आपल्याला त्याबाबत का बोलायचं नाही हेदेखील अजित पवार यांनी सांगितलं आहे.

काय म्हणाले अजित पवार?

“ज्या वेळी एखादा व्यक्ती एखाद्या गोष्टीबाबत बोलणं टाळतो त्यावेळी त्यावेळी ती गोष्ट त्याला टाळायचीच असते. हेच त्यामागचं कारण असतं. मी काही मूर्ख नाही की त्याबाबत आता भाष्य करेन. मी याविषयावर कधीच बोलणार नाही. मी पण पोहचलेला माणूस. मला तो विषय काढायचा नाही. प्रसारमाध्यमं प्रश्न विचारू शकतात पण उत्तर द्यायचं की नाही हा माझा प्रश्न आहे मी त्यामुळे या प्रश्नावर उत्तर देणारच नाही.” आम्ही राजकारणात आलो ते शरद पवार यांच्यामुळे. त्यामुळे ते ठरवतील तीच आमच्यासाठी पूर्व दिशा असते. वरिष्ठांचा निर्णय अंतिम असं ज्या ठिकाणी असतं तिथेच पक्षात शिस्त असते असं मला वाटतं.

त्या ट्विटबाबत काय म्हणाले अजित पवार?

भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुढची पाच वर्षे राज्याला स्थिर सरकार देईल असं ट्विट अजित पवार यांनी केलं होतं. त्याबाबत विचारलं असता अजित पवार म्हणाले की हो हे ट्विट मी केलं होतं कारण मला तसं ट्विट करावंसं वाटलं होतं. पुढच्या सगळ्या घटना घडल्या. शिळ्या कढीला आता उत आणण्याचं कारण काय? असंही अजित पवार म्हणाले आहेत. टीव्ही नाईन मराठीला दिलेल्या मुलाखतीत अजित पवार यांनी हे भाष्य केलं आहे. त्यापुढे ते म्हणाले की तुम्ही मला कितीही फिरवून प्रश्न विचारा पहाटेच्या शपथविधीला तीन वर्षे झाली आहेत. मी त्याविषयी उत्तर देऊ इच्छित नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुख्यमंत्री व्हावं असं वाटत नाही का?

मुख्यमंत्री व्हावं असं वाटत नाही का? त्यावर अजित पवार म्हणाले फक्त मला वाटून काय उपयोग आहे? तेवढी क्षमता असेल तरच एखादा माणूस ते करू शकतो. जोपर्यंत माझ्याकडे १४५ आमदार येतील असं वाटत नाही तोपर्यंत मी उगीच स्वप्न बघणार नाही. उगाच स्वप्न बघायचं आणि पूर्ण होईल का वाट बघायची हे माझ्या स्वभावात बसत नाही असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदेंकडे १५५ चं संख्याबळ झालं म्हणून ते राज्याचे मुख्यमंत्री झाले ना नाहीतर ते होऊ शकले नसते असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.