वीर सावरकर यांना भारतरत्न देण्यासाठी शिफारसीची गरजच काय असा प्रश्न शिवसेनेने आता विचारला आहे. मला भारतरत्न द्या असे म्हणत वीर सावरकर मंत्रालयाच्या पायरीवर उभे नाहीत. त्यामुळे भाजपाच्या जाहीरनाम्यात सावरकर यांना भारतरत्न मिळावा म्हणून प्रयत्न करु हे मुख्यमंत्र्यांनी म्हणणे क्लेशदायक आहे असे शिवसेनेने म्हटले आहे.
महाराष्ट्रात युतीचेच सरकार येणार आहे. आम्ही वीर सावरकरांना भारतरत्न देण्याची शिफारस करु त्यासाठी भाजपाला मतदान करा असे भाजपाने जाहीरनाम्यात सांगितले आहे. भाजपाच्या जाहीरनाम्यात हा संदर्भ येणं क्लेशदायक आहे असं शिवसेनेने म्हटलं आहे. सामनाच्या अग्रलेखात शिवसेनेने ही टीका केली आहे. यामध्ये विशेष बाब ही शुक्रवारीच महायुतीची सभा पार पडली, या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. या सभेत उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात सावरकर यांना भारतरत्न देण्याची शिफारस केल्याचे कौतुक केले होते.
सामनाच्या अग्रलेखात मात्र भाजपाची ही भूमिका क्लेशदायक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. गेल्या पाच वर्षात वीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात यायलाच हवे होते असेही अग्रलेखात स्पष्ट करण्यात आले आहे. वीर सावरकर हे सशस्त्र क्रांतिकारांचे महानायक होते. मात्र आपल्या देशातील एक वर्ग महात्मा गांधी यांना खलनायक ठरवतो आहे तर दुसरा वर्ग सावरकर यांना खलनायक ठरवतो आहे. हे सगळे कधीतरी थांबायला हवं.
काय म्हटलं आहे अग्रलेखात?
भाजपा जाहीरनाम्यानत म्हणते, सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी प्रयत्न करु.आम्ही विचारतो, सावरकरांवर इतके वाईट दिवस आले आहेत का? सावरकर यांना स्वातंत्र्यवीर मानायला काँग्रेस आणि त्यांचे बगलबच्चे तयार नाहीत. मग काय पी चिदंबरम, रॉबट वढेरा वगैरेंना स्वातंत्र्यवीर मानायचे का? सावरकर यांना दोन जन्मठेपांची शिक्षा ब्रिटिश न्यायालयाने सुनावली. देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून सावरकरांनी ज्या यातना भोगल्या त्या इतर कोणी भोगल्या असतील तर तसे सांगावे. सावरकरांचे बंधू बाबाराव सावरकर हेदेखील अंदमानात होते. पण दोन भावांना चार वर्षे हे ठाऊकच नव्हते की आपला भाऊही याच तुरुंगात आहे. देशासाठी महान त्याग करणाऱ्या वीर सावरकर यांना अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असतानाच भारतरत्न मिळायला हवे होते. आता मुख्यमंत्री म्हणतात आम्ही सावरकरांची शिफारस करु. सावरकर मंत्रालयाच्या पायरीवर मला भारतरत्न द्या हो असे म्हणत उभे नाहीत. ज्यांनी स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचा होम केला त्यांना भारतरत्न पुरस्काराचे काय अप्रुप? वीर सावरकर यांनी त्यांच्या हयातीत राष्ट्रभक्तीपर, स्वातंत्र्यदेवतेस वंदन करणारी नाटकं लिहिली. मात्र सावरकरांच्या भारतरत्नवरुन जे नाटक सुरु आहे ते असह्य करणारे आहे.