राज्य सरकारविरोधात महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेत १७ डिसेंबर रोजी मुंबईमध्ये विराट मोर्चा काढण्याची घोषणा सोमवारी सायंकाळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबाबत वादग्रस्त विधाने करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि सीमाप्रश्नी मवाळ धोरण स्वीकारल्याच्या मुद्द्यावरुन आक्षेप घेत महाविकास आघाडीच्यावतीने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या मोर्चाची घोषणा केली. १७ डिसेंबरला मुंबईत जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा विराट मोर्चा काढण्यात येणार आहे असं शिवसेना पक्षप्रमुखांनी सांगितलं. या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरेंनी सीमाप्रश्नावरुनही राज्यात सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारला लक्ष्य केलं.

बैठकीनंतर सरकारवर टीका

विधिमंडळाचे आगामी अधिवेशन, राज्यपालांकडून सातत्याने केली जाणारी वादग्रस्त वक्तव्ये, महाराष्ट्रातून इतर राज्यांमध्ये होऊ लागलेले उद्योगांचे स्थलांतर, नव्याने तापू लागलेला महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न इत्यादी विषयांवर चर्चा करण्यासाठी सोमवारी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या ‘देवगिरी’ शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीला उद्धव ठाकरे, अजित पवार, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, छगन भुजबळ, भाई जगताप, खासदार संजय राऊत, विनायक राऊत, आदित्य ठाकरे आदी नेते उपस्थित होते. बैठकीनंतर घेण्यात आलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकार आणि राज्यपालांना लक्ष्य केले.

गद्दारी आणि कटकारस्थान करून सरकार पाडले

‘‘राज्यपाल हे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचा सातत्याने अवमान करीत आहेत. महाराष्ट्राचा अवमान करीत आहेत, इतकेच नव्हे तर ते हिंदूमध्येही फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. मग, केवळ ते राज्यपाल आहेत म्हणून त्यांचा मान राखायचा का,’’ असा सवाल ठाकरे यांनी केला. ‘‘महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार चांगले चालले असताना गद्दारी आणि कटकारस्थान करून ते पाडण्यात आले. महाराष्ट्रात कुटिलतेची बीजे पेरली जात आहेत. एकसंध महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातील गावांवर आक्रमकपणे हक्क सांगत आहेत, तेव्हा आपल्या राज्यात सरकार आहे की नाही असा प्रश्न पडतो. आधी जाहीर केलेला कर्नाटकचा दौरा मंत्री रद्द करतात. असले नेभळट सरकार महाराष्ट्राने कधी पाहिले नव्हते,’’ असा घणाघाती हल्ला ठाकरे यांनी भाजपा व शिंदे-फडणवीस सरकारवर चढवला.

नक्की वाचा >> “हेच त्यांचे देशप्रेम का? राज्यावरील बेगडी प्रेम त्यांच्या…”; मोदी भेटीनंतर CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला! ‘मविआ’च्या मोर्चावरही बोलले

विठोबाचा उल्लेख

याचवेळी सीमाप्रश्नावरुन बोलताना उद्धव ठाकरेंनी पंढरपूर आणि विठोबाचाही उल्लेख केला. “कर्नाटककडून महाराष्ट्रातील काही प्रदेशाची मागणी केली जात आहे. यामध्ये जत व सोलापूर तालुक्यांमधील काही भाग आणि गावांचा समावेश आहे. ते आमचा पंढरपूरचा विठोबाही मागतील का? यामुळे एक प्रश्न सातत्याने सतावतो आणि तो म्हणजे, महाराष्ट्रात सरकार अस्तित्वात आहे का?” असं म्हणत उद्धव यांनी टोला लगावला.

अजित पवारही संतापले

कर्नाटक, गुजरात, तेलंगणाच्या सीमेवरील गावांमधील नागरिकांनी महाराष्ट्राबाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना या गावांतील नागरिकांनी कधी अवाक्षर काढले नव्हते. आताच कसे एकदम सारे एकसुरात बोलू लागले, असा सवाल अजित पवार यांनी केली. यामागे काही कारस्थान आहे का, हे तपासावे लागेल, असेही ते म्हणाले.

नक्की वाचा >> “या बिल्डरच्या मदतीने शिंदेंनी आमदारांना सुरतला नेलं! खोके व्यवस्थेतील खोके याच बिल्डरचे”; शिवसेनेचा खळबळजनक दावा

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील गावे तोडण्याचा विचार

गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेण्यात आले. आता पुढे काही महिन्यांत कर्नाटकमध्ये निवडणुका होणार आहेत, त्याआधी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील गावे त्यांना तोडायची आहेत, असा आरोपही ठाकरे यांनी भाजपावर केला. या सर्व प्रश्नांवर महाराष्ट्राची एकजूट दाखविण्यासाठी येत्या १७ डिसेंबरला महाविकास आघाडीच्या वतीने भायखळा येथील जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा विराट मोर्चा काढण्यात येईल, अशी घोषणा ठाकरे, अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांनी केली.

नक्की पाहा >> फडणवीसांनी चालवलेल्या आलिशान Mercedes-Benz कारची किंमत पाहून व्हाल थक्क! ९ गेअर, ९ एअरबॅग, BJP कनेक्शन अन्…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

…म्हणून पुढे ढकलला दौरा

बेळगावमध्येच नव्हे, तर देशाच्या कुठल्याही भागामध्ये जायला कोणीही कोणाला रोखू शकत नाही. राज्यातील दोन मंत्र्यांच्या बेळगाव दौऱ्याबाबत कर्नाटक सरकारने सामंजस्याची भूमिका घ्यायला हवी होती. या दौऱ्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी मंत्र्यांचा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टीकरण देताना म्हटलं आहे.