scorecardresearch

“हेच त्यांचे देशप्रेम का? राज्यावरील बेगडी प्रेम त्यांच्या…”; मोदी भेटीनंतर CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला! ‘मविआ’च्या मोर्चावरही बोलले

महाविकास आघाडीमधील घटक पक्षांच्या नेत्यांसहीत घेतलेल्या संयुक्त पत्रकारपरिषदेत १७ डिसेंबर रोजी मोर्चाची घोषणा उद्धव यांनी केली

“हेच त्यांचे देशप्रेम का? राज्यावरील बेगडी प्रेम त्यांच्या…”; मोदी भेटीनंतर CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला! ‘मविआ’च्या मोर्चावरही बोलले
शिंदेंची जी-२० संदर्भातील सर्वपक्षीय बैठकीसाठी हजेरी (फोटो- ट्वीटरवरुन साभार)

All Party meet on India G 20 Presidency: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जी-२०’ परिषदेच्या निमित्ताने सोमवारी दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीला देशातील सर्वच राज्यांमधील प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, तेलंगणाचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लीकार्जून खरगे यासारखे अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही मोदींच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या या सर्वपक्षीय बैठकीला हजर होते. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या बैठकीसाठी दिल्लीला गेले नव्हते. उलट महाविकास आघाडीमधील घटक पक्षांच्या नेत्यांसहीत घेतलेल्या संयुक्त पत्रकारपरिषदेमध्ये त्यांनी १७ डिसेंबर रोजी महामोर्चा काढण्याची घोषणा मुंबईत केली. उद्धव ठाकरेंच्या अनुपस्थितीसंदर्भात शिंदे यांनी दिल्लीमध्ये भाष्य करताना टोला लगावला.

शिंदे नेमकं काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील या बैठकीला सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना निमंत्रण देण्यात आले होते. मात्र उद्धव ठाकरे या बैठकीला अनुपस्थित होते. हाच मुद्दा पत्रकारांशी बोलताना शिंदेंनी अधोरेखित करत ठाकरेंवर टीका केली. “उद्धव ठाकरेंनाही निमंत्रण दिले होते. तरीही ते अनुपस्थित राहिले. विकास प्रकल्प, उद्योग या मुद्यांवरून आरोप-प्रत्यरोप करणारे उद्धव ठाकरे यांनी गैरहजर राहून काय सिद्ध केले? हेच त्यांचे देशप्रेम आहे का? हेच राज्यावरील त्यांचे प्रेम आहे का? त्यांचे राज्यावरील बेगडी प्रेम त्यांच्या कृतीतून दिसले,” अशा शब्दांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. “‘जी-२०’चे यजमानपद देशाला मिळणे ही खरेतर गौरवाची बाब आहे,” असंही शिंदे म्हणाले.

१७ तारखेच्या मोर्चावरुनही टोला

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबाबत वादग्रस्त विधाने करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि सीमाप्रश्नी मवाळ धोरण स्वीकारल्याने राज्य सरकारविरोधात महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. या मुद्दयांवर १७ डिसेंबरला मुंबईत जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा विराट मोर्चा काढण्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. यासंदर्भात शिंदेंना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, या पक्षांना विराट मोर्चासाठी शुभेच्छा आहेत असा टोला शिंदे यांनी विरोधकांना लगावला.

नक्की पाहा >> फडणवीसांनी चालवलेल्या आलिशान Mercedes-Benz कारची किंमत पाहून व्हाल थक्क! ९ गेअर, ९ एअरबॅग, BJP कनेक्शन अन्…

भाजपा नेत्यांच्या भेटी

शिंदे यांनी भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, भाजपाचे संघटना महासचिव बी. एल. संतोष यांच्यासह केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, प्रल्हाद जोशी यांची भेट घेतली. राज्यातील विमानतळांचे प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याशी चर्चा झाली आहे. कोळसा खाणींसंदर्भात प्रल्हाद जोशी यांच्याशीही चर्चा करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 08:09 IST

संबंधित बातम्या