Raj Thackeray : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात हिंदी भाषा आणि मराठी विरुद्ध अमराठी भाषेच्या मुद्द्यांवरून चांगलाच वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. यावरून राज्यातील राजकारण देखील चांगलंच तापलेलं आहे. हिंदी भाषा सक्तीचा निर्णय रद्द केल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येत मुंबईत एक मेळावा घेतला होता. या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. मात्र, याच भाषणात राज ठाकरे यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून आता तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अलिकडेच मुंबईत केलेल्या एका जाहीर भाषणादरम्यान एका वक्तव्याबाबत आक्षेप घेण्यात आला आहे. दरम्यान, मराठी भाषेच्या मुद्द्यांवरून परप्रांतीयांना मारहाण करण्यात आल्याच्या काही घटना घडल्या होत्या. या घटनेचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल देखील झाले होते. त्यानंतर या घटनेवरून भाजपा आणि मनसेच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारणही रंगलं होतं. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी भाषणात बोलताना म्हटलं होतं की, ‘मारहाण करताना व्हिडीओ रेकॉर्ड करू नका.’
राज ठाकरे यांचं हे विधान द्वेषपूर्ण आणि भडकाऊ असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून संताप व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत राज ठाकरे यांच्याविरोधात पोलीस महासंचालकाकडे तीन वकिलांनी लेखी तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे. या तक्रारीत राज ठाकरे यांचे काही विधाने सामाजिक अशांततेला प्रोत्साहन देणारे असल्याचं म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांनी भाषणात केलेल्या परप्रांतीयांबाबतच्या विधानामुळे राज्यातील सामाजिक सलोखा आणि कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणारी आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात मीरा भाईंदर येथील घटनेचा संदर्भ देत परप्रांतीयांबाबत सांगत उठसूट मारायची गरज नाही. मात्र, जास्त नाटकं केली तर कानाखाली आवाज काढला पाहिजे, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं होतं.