महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेचा दसरा मेळावा हा कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. २०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडली. त्यानंतर एकनाथ शिंदे हे वेगळा दसरा मेळावा घेऊ लागले. तर उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंपासून चालत आलेली परंपरा कायम ठेवली आहे. शिवसेनेच्या आजच्या दसरा मेळाव्याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंसह युतीची घोषणा करणार का? याची शक्यता.
२००५ नंतर राज ठाकरे दसरा मेळाव्यात दिसलेले नाहीत
२००५ नंतर राज ठाकरे दसरा मेळाव्यात दिसलेले नाहीत. ते जर दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंसह दसरा मेळाव्यात दिसले तर २० वर्षांनी शिवसेनेच्य इतिहासाचा नवा अध्याय सुरु होईल असं म्हणता येईल. आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याचे संकेत मागच्या काही महिन्यांपासून दिले जात आहेत. या पार्श्वभूमीवर दसरा मेळाव्यात नेमकं काय होतं? हे पाहणं महत्त्वाचं असेल.
उद्धव ठाकरेंच्या भाषणात कुठले मुद्दे असू शकतात?
१) उद्धव ठाकरे हे पीएम केअर फंडाचा उल्लेख करत महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्या, कर्जमुक्त करा असं आवाहन आज करु शकतात.
२) देवेंद्र फडणवीस यांनी ओला दुष्काळ जाहीर करता येणार नाही असं म्हटलं आहे. त्यामुळे त्यावरुन उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करु शकतात.
३) महाराष्ट्रातली ओल्या दुष्काळासारखी स्थिती, तसंच भाजपाचं धोरण यावरुन उद्धव ठाकरे भाष्य करु शकतात.
४) राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या व्होटचोरीच्या मुद्द्यावरुन भाष्य करुन भाजपावर हल्लाबोल करु शकतात.
५) मुंबईसह प्रमुख शहरांमधल्या रस्त्यांची अवस्था, विकासकामांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीची समस्या या सगळ्यावर भाष्य करत भाजपावर आणि महायुतीवर टीका करु शकतात.
६) एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीवारीवरुन आणि महायुतीत फडणवीस विरुद्ध शिंदे असा संघर्ष कसा आहे यावरुन भाष्य करु शकतात.
७) राज ठाकरेंशी युतीची घोषणा करण्याची शक्यता, राज ठाकरे यांना दसरा मेळाव्याचं निमंत्रण दिलं असल्यस २० वर्षांनी ठाकरे बंधू दसरा मेळाव्यात एकत्र दिसू शकतात.
एप्रिल २०२५ नंतर समीकरणं कशी बदलली?
उद्धव ठाकरे यांच्या भाषणात हे सात मुद्दे प्रामुख्याने असतील अशी चिन्हं आहेत. मात्र उद्धव ठाकरे हे या सगळ्या मुद्द्यांवर बोलणार असले तरीही सर्वात जास्त आकर्षण आहे ते म्हणजे राज ठाकरेंशी युतीच्या घोषणेचं. शिवसेनेत घुसमट होऊ लागल्याने राज ठाकरेंनी शिवसेना सोडून महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन केला आहे. बाळासाहेब ठाकरे हयात असतानाच राज ठाकरे वेगळे झाले होते. तेव्हापासून एप्रिल २०२५ पर्यंतचा काळ असा होता की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात विस्तवही जात नव्हता. मात्र एप्रिल २०२५ नंतर समीकरणं बदलली हे महाराष्ट्राने पाहिलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सगळं काही विसरुन उद्धव ठाकरेंशी हातमिळवणीचे संकेत एका मुलाखतीत दिले होते. त्याला उद्धव ठाकरेंनीही तसाच प्रतिसाद दिला. पुढे चर्चांच्या अनेक फेऱ्यानंतर शेवटी मराठीच्या मुद्द्यावर दोन्ही भाऊ एकत्र आल्याचं महाराष्ट्राने पाहिलं. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही भाऊ एकत्र येऊन महापालिका निवडणुका लढवण्याची शक्यता आहे. एकेकाळी संपलेला पक्ष असा उल्लेख केलेल्या मनसेला उद्धव ठाकरेंनी बरोबर घेण्याचा निर्णय घेतला आहे. राज ठाकरेंनीही मागच्या वीस वर्षांत उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे. मात्र मतभेद विसरुन आता दोन्ही भाऊ एकत्र आल्याचं दिसून आलं आहे. दरम्यान या दोघांच्या युतीची घोषणा होणार का? हा दसरा मेळाव्याचा आकर्षण बिंदू आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या यांच्या मागील दोन महिन्यांत चार भेटीगाठी
५ जुलै २०२५ : मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू म्हणजेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघंही मुंबईत एकाच मंचावर दिसले. यानंतर त्यांचं कौटुंबिक फोटो सेशनही झालं.
२७ जुलै २०२५ : उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज ठाकरे हे मातोश्रीवर पोहचले, तिथे त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
२७ ऑगस्ट : गणेश चतुर्थीच्या निमित्ताने उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी सहकुटुंब पोहचले. यानंतर दोन्ही कुटुंबांचं स्नेहभोजनही झालं.
१० सप्टेंबर : उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि अनिल देसाई हे तिघंही अचानकच राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पोहचले. त्यावेळी या दोन्ही भावांमध्ये एक तासभर चर्चा झाली.
जे बाळासाहे ठाकरेंना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीस यांनी करुन दाखवलं असं राज ठाकरे ५ जुलैच्या भाषणात म्हणाले होते. तर अनाजीपंतांनी आमच्यातला आंतरपाट दूर केला असा टोला उद्धव ठाकरेंनी ५ जुलैच्या भाषणात लगावला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर दसरा मेळाव्यात काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दसरा मेळाव्याच्या टिझरमध्ये ‘ठाकरेंचे विचार’ असा शब्द वापरण्यात आला होता. त्यामुळेही राज ठाकरे दसरा मेळाव्यात येतील अशी चर्चा सुरु झाली आहे. आता आज उद्धव ठाकरे काय सरप्राईज देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.