चित्रा नक्षत्राच्या वादळी पावसासह गारपिटीने नगर शहर व परिसराला शुक्रवारी सायंकाळी चांगलेच झोडपून काढले. शहराच्या आसपास केडगाव तसेच नगर तालुक्यातील निमगाव वाघा परिसरात या वेळी चांगली गारपीट झाली.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून शहर व परिसरात ढगाळ हवामान आहे. उन्हाचा कडाकाही वाढला असून त्यामुळे हवेतील उष्णता कमालीची वाढली आहे. शुक्रवारीही अधूनमधून आभाळ येत होते व कडक ऊनही होते. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आकोश झाकोळून काही वेळातच वादळी वाऱ्यासह टपोऱ्या थेंबांनी पावसाला प्रारंभ झाला. सुरुवातीचा बराच वेळ वादळी वाऱ्यामुळे हा पाऊस अस्ताव्यस्त पडत होता. याच सुमारास काही ठिकाणी गारा पडल्या. शहरात केडगाव परिसरात सुमारे आठ-दहा मिनिटे गारपीट झाली. गारांचा आकारही मोठा होता. अंधारामुळे अनेकांना गारा पडल्याचे आधी लक्षात आले नाही, मात्र पावसाचा आवाज वाढल्याने गारांची जाणीव झाली.
नगर तालुक्यातील निमगाव वाघा भागात मात्र मोठी गारपीट झाल्याचे समजते. याच दरम्यान या भागात गारा पडल्या. या गारपिटीमुळे शेतातील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कांद्याचे मोठे नुकसान होण्याची भीती या परिसरात व्यक्त होते. गणेशोत्सवानंतर जिल्हय़ात पावसाने दडी मारली आहे. रब्बी पिकांसाठी पावसाची नितांत गरज आहे, मात्र परतीच्या पावसानेही जिल्हय़ाकडे पाठ फिरवल्याने चिंता व्यक्त होत आहे.