आठ जणांचे बळी घेणाऱ्या दोन वर्षांपूर्वीच्या पारधी हत्याकांडाने माढा तालुकाच नव्हे तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्राला हादरा दिला होता. १४ फेब्रुवारी २०१०च्या रात्री घडलेल्या या घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेले अभिमान काळे यांच्या साक्षीमुळेच आरोपींना दोषी ठरवण्यात मदत झाली.
या गाजलेल्या पारधी हत्याकांडाची पाश्र्वभूमी अशी की, सुरेश छाटन पवार (वय ५५) हा कुटुंबीयांसह माढा तालुक्यातील बेंदवस्ती येथे राहत होता. त्याच्याबरोबर भाऊ अशोक छाटन पवार व त्याचे कुटुंबीयही राहत होते.  १४ फेब्रुवारी २०१० रोजी मध्यरात्री त्याच्या झोपडीला आरोपींनी पेट्रोल ओतून आग लावली. यात सुरेश पवार याची सावत्र सून मनीषा संजय पवार (२६), नीताबाई राजू पवार (१८) यांच्यासह नातू स्वाती संजय पवार (३), महेश संजय पवार (६ महिने), मंगेश संजय पवार (६) तसेच सुरेश पवार याचा मुलगा राघू (११) व मुलगी छकुली (९) यांचा बळी गेला होता. विशेषत: संजय काँग्रेस पवार याची पत्नी मनीषा हिच्यासह दोन मुले व एक मुलगी असे सारे जण मृत्युमुखी पडले. या घटनेत संजय पवार हा एकटाच बचावला. कारण तो घटनेच्यावेळी झोपडीत नव्हता. तो आता एकाकीपणे आयुष्य जगत आहे. तर मृतांपैकी नीताबाई राजू पवार हिचे लग्न घटनेच्या अगोदर अवघ्या पंधरा दिवसांपूर्वीच झाले होते. ती नववधू होती.  या घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार पवार याचा मामा अभिमान काशीनाथ काळे (वय ६५, रा. मुंगशी लोणी, ता. माढा) हा होता. तो दहा दिवसांपूर्वी आपल्या भाच्याकडे राहण्यास आला होता. घरात रात्री झोपण्यासाठी जागा नसल्यामुळे तो घराबाहेर काही अंतरावर झोपला होता. त्या वेळी मध्यरात्रीच्या सुमारास सुरेश पवार याच्या झोपडीतून लहान मुलांच्या ओरडण्याचा आवाज आला. तेव्हा अभिमान काळे जागा होऊन झोपडीकडे धावत गेला.  त्याचवेळी आगीच्या उजेडात झुंबरबाई भैरू काळे रेल्वे रुळाच्या दिशेने गेलेली दिसली. थोडय़ावेळाने झोपडी संपूर्णत: जळून खाक झाली व त्यातील सर्व महिला व मुले जागीच भाजून भस्मसात झाली. हे जळीतकांड झुंबरबाई काळे हिच्यासह इतर आरोपींनी केले होते. झुंबरबाई व सुरेश पवार यांच्यात बऱ्याच दिवसांपासून वैमनस्य होते. झुंबरबाई ही पवार कुटंबीयांना गाव सोडून जाण्याबद्दल वारंवार बजावत होती. गाव न सोडल्यास गंभीर परिणाम होतील, असा इशाराही देत होती. त्यातूनच हे जळीतकांड घडल्याचे सिध्द झाले.  या गुन्ह्य़ाप्रकरणी माढा ठाण्यात गुन्हा दाखल झाला. सोलापूर ग्रामीणच्या गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक भास्कर थोरात व माढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हारून शेख यांनी गुन्ह्य़ाचा तपास केला होता.     

इतिहासातील पहिलीच घटना
सोलापूरच्या न्यायालयीन इतिहासात एखाद्या खटल्यात एकाचवेळी पाच आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली जाण्याची ही पहिलीच घटना आहे. यापूर्वी स्वातंत्र्य चळवळीत १९३० साली सोलापुरात मार्शल लॉ चळवळ झाली होती. त्या वेळी मल्लप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, श्रीकिशन सारडा व अब्दुल रसूल कुर्बान हुसेन या देशभक्तांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतरची आजची पाच जणांना फाशीची शिक्षा ठोठावण्याचा पहिलाच खटला आहे. विशेषत: या खटल्यात एकाचवेळी दोन महिला आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्याचीही पहिलीच घटना समजली जात आहे.