सोलापूर-पुणे महामार्गावर शहरात बाळे येथे चार वाहनांचा विचित्र अपघात होऊन त्यात दुचाकीवरील एका महिलेचा जागीच हकनाक बळी गेला. तर तिचा पती गंभीर जखमी झाला. या रस्त्यावर वाहन तपासणीसाठी पोलिसांनी लावलेल्या कठड्यांमुळे हा अपघात झाल्याचा आरोप करीत स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मृतदेह तृथेच ठेवून ‘रास्ता रोको ‘ आंदोलन केले. शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व करतान पोलीस प्रशासनाच्या कार्यपध्दतीला दोष दिला.

हेही वाचा >>> उजनी धरणातून सोडलेले पाणी उद्या चंद्रभागेत पोहोचण्याची अपेक्षा

शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत जड वाहतुकीला बंदी आहे. परंतु तरीही जडवाहतूक सर्रासपणे सुरू असल्याचे पाहावयास मिळते. यात अधुनमधून जड वाहतुकीमुळे तरूण विद्यार्थ्यांसह कामगार व नागरिकांचे बळी जातात. यासंदर्भात आवाज उठवूनही पोलीस प्रशासन ढिम्म आहे.

याच पार्श्वभूमीवर तोंडावर येऊन ठेपलेल्या बकरी ईदच्या निमित्ताने कुर्बानीसाठी जनावरांची वाहतूक करण्यास बंदी आहे. त्यादृष्टीने शहर व परिसरात सर्व प्रमुख रस्त्यांवर पोलिसांनी तपासणी नाके सुरू केले आहेत. त्यासाठी कठडेही उभारण्यात आले आहेत. पुणे महामार्गावर बाळे येथे कठडे उभारण्यात आले असून तेथे पोलिसांकडून वाहनांची तपासणी होत आहे. दुपारी याच ठिकाणी हायवा, मालमोटार, मोटार कार आणि दुचाकी यांचा विचित्र अपघात झाला. बेजबाबदारपणे   थांबविण्यात आलेल्या वाहनाच्या पाठीमागे इतर वाहने येऊन थडकली.  यात दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या सुप्रिया गणेश नरखेडकर (वय ४५, रा. अनगर, ता. मोहोळ) या गंभीर जखमी होऊन जागीच मृतूयुमुखी पडल्या. तर दुचाकी चालविणारे त्यांचे पती गणेश भारत नरखेडकर हे गंभीर जखमी झाले.

हेही वाचा >>> शिक्षण विभागाचा मोठा निर्णय: राज्यात आता पाचवी, आठवीसाठी वार्षिक परीक्षा

हा अपघात घडताच स्थानिक तरूणांनी तेथे धाव घेतली. शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे तेथेच होते. पोलिसांनी चुकीच्या पध्दतीने रस्त्यावर कठडे लावल्यामुळे हा जीवघेणा अपघात झाल्याचा आरोप करीत, मृतदेह तेथेच ठेवून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दरम्यान, वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी यशस्वी शिष्टाई करून हे आंदोलन संपविले.  दरम्यान, या आपघाताला कारणीभूत ठरल्याबद्दल हायवाचालक अंबादास बोराडे (रा. मार्डी, ता. उत्तर सोलापूर) याच्याविरूध्द फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.