दापोली :  जम्मू काश्मीरमधील कुपवाडा येथील बेपत्ता झालेली महिला रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे सापडली आहे. कुपवाडा येथून आलेल्या पोलिसांनी संबंधित महिला आणि तिच्याबरोबर असलेल्या अब्दुल कादीर खान या व्यक्तीला दापोलीतील एका लॉजमधून ताब्यात घेतले आहे.  आपली पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार कुपवाडा पोलीस स्थानकात एका व्यक्तीने काही दिवसांपूर्वी दिली. त्यानंतर कुपवाडा पोलीस स्थानकाचे साहाय्यक पोलीस निरीक्षक रियाज अहमद यांच्या नेतृत्वाखाली तेथील पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली असता अब्दुल कादीर खान याचा महाराष्ट्र आणि राजस्थान या राज्यांमध्ये संपर्क असल्याची माहिती पोलिसाना मिळाली. त्याआधारे त्यांनी सापळा रचला. ते यापूर्वीदेखील एकदा दापोली येथे येऊन गेले होते, पण खान याचा शोध लागला नव्हता. दरम्यान, तो दापोलीतच असल्याची माहिती पुन्हा एकदा मिळाल्याने ते बेपत्ता महिलेच्या पतीसह दापोलीमध्ये आले. येथील काही लॉजमध्ये कसून शोध घेतला असता अखेर अब्दुल कादीर खानला संबंधित महिलेसह पकडण्यात पोलिसांना यश आले. यावेळी त्या महिलेचा पतीही सोबत असल्याने ओळख पटवणे सहज शक्य झाले.