Women Chained to Tree in Kokan’s Forest : महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जंगलात शनिवारी एक महिला झाडाला टांगलेल्या अवस्थेत सापडली. तिच्याकडे अमेरिकेचा मुदत उलटलेला पासपोर्ट असून तिच्याकडे सापडलेल्या आधार कार्डवर तामिळनाडूचा पत्ता आहे. ललिता कायी कुमार स असं या महिलेने स्वतःचं नाव सांगितलं आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
सिंधुदुर्गातील सोनुर्ली गावाजवळील जंगलात शनिवारी सायंकाळी रडण्याचा आवाज येऊ लागला. हा आवाज गावकऱ्याने ऐकला. त्याने जंगलात जाऊन पाहिलं असता त्याला साखळीने झाडाला बांधलेली एक महिला दिसली. त्याने तत्काळ याविषयी पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी तिला साखळीतून सोडवून प्राथमिक उपचारांसाठी सिंधुदुर्गातील सावंतवाडी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेलं. तिथून तिला ओरोस येथील अत्याधुनिक रुग्णालयात पाठवण्यात आलं.
महिलेला मानसिक आजार
तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी इंडिया टुडेने सांगितलं की, या महिलेला मानसिक आजार असून तिने एका कागदावर तिच्या आरोग्याच्या समस्या लिहून दिल्या आहेत. गेल्या ४० दिवसांपासून तिने काहीही खाल्लं नसल्याचं तिने डॉक्टरांना लिहून दिलं. भांडण झाल्यानंतर नवऱ्याने तिला येऊन आणून जंगलात बांधून ठेवल्याचंही तिने यात लिहिलं आहे.
पतीशी भांडण झाल्याने तिला कोकणात आणून बांधलं
प्रसारमाध्यमांशी बोलताना महाराष्ट्र पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणासंदर्भात अद्याप एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही, परंतु तपास सुरू करण्यात आला आहे. “महिला तिचे म्हणणे मांडण्याच्या स्थितीत नाही. ती महिला अशक्त आहे कारण तिने गेल्या काही दिवसांपासून काहीही खाल्ले नाही आणि तसेच या भागात मुसळधार पाऊस पडला आहे. तिला किती वेळ बांधून ठेवले होते ते आम्हाला माहीत नाही. पतीशी भांडण झाल्यानंतर तिने पतीला सोडले, असे अधिकारी म्हणाले.
तामिळनाडूचा पत्ता असलेले आधार कार्ड आणि मुदत उलटलेला युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचा पासपोर्टसह अनेक कागदपत्रांच्या आधारे पोलिसांनी तिची ओळख पटवली. तिचं राष्ट्रीयत्व निश्चित करण्यासाठी पोलीस तिच्या कागदपत्रांची पडताळणी करत आहेत. ही महिला गेल्या १० वर्षांपासून भारतात राहत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणाची चौकशी करण्याकरता पोलिसांचं पथक तामिळनाडू, गोवा आणि इतर ठिकाणी रवाना झाले आहेत.