Women’s Day 2023 : पारंपारिक मासेमारी व्यवसायाला फाटा देत तिने लहानपणापासूनच आकाशात उंच उडण्याचे स्वप्न उरी बाळगले होते. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तिने आपले स्वप्न प्रत्यक्षात साकारले. अनेक अडचणींवर मात करत तिने आज एक यशस्वी वैमानिक म्हणून नावलौकिक प्राप्त केला आहे. आज अलिबाग तालुक्यातील ग्रामीण भागातील मुलींसाठी कॅप्टन कृतज्ञा खऱ्या अर्थाने प्रेरणा स्त्रोत बनली आहे.

अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथील कॅप्टन कृतज्ञा हाले हिने लहानपणापासूनच वैमानिक होण्याचे स्वप्न पाहिले होते. २००९ तिने साळाव येथील इंग्रजी माध्यम शाळेत बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने थेट फिलिपिन्सला जाण्याचा निर्णय घेतला. वयाच्या सोळाव्या वर्षी तिने घर सोडले. हा निर्णय धाडसी होता. पण आई वडील दोघेही तिच्या पाठीशी ठामपणे उभे राहीले. परदेशात वैमानिक प्रशिक्षण घेतांना तिला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. पण ती डगमगली नाही. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तिने वैमानिक बनण्यासाठी आवश्यक चार वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिने भारतात परतण्याचा निर्णय घेतला. नागरी उड्डयन विभागाकडे वैमानिक परवान्यासाठी अर्ज केला. पाच वर्ष पाठपुरावा केल्यानंतर तिला अखेर वैमानिक परवाना प्राप्त झाला. त्यानंतर गो एअरवेझ कंपनीत वैमानिक पदावर ती रुजू झाली. पाच वर्षांची तपश्चर्या फळाला आली. यानंतर तीने कधीच मागे वळून पाहीले नाही.

हेही वाचा – अतिरिक्त ठरलेले आठ शिक्षक ११ वर्षांपासून वेतनाविना, शिक्षण विभागाचा लालफितीचा कारभार

आज प्रथितयश वैमानिक म्हणून ती नावारुपास आली आहे. देशविदेशात विमाने उडविण्याचा प्रदीर्घ अनुभव तिच्या पाठीशी आहे. अनेक आव्हानांना सामोरे जात तिने हे यश संपादित केले आहे. हवामानात होणारे बदल, विमानाच्या तांत्रिक बाबी याचे सखोल ज्ञान तिने आत्मसात केले. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत विमानांची हाताळणी करण्याचे कसब आत्मसात केले. आज या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या तरुणींसाठी ती रोल मॉडेल आहे. अनेक तरुणींसाठी ती मार्गदर्शक म्हणूनही कार्यरत आहे. कोळी समाजातील पहिली महिला वैमानिक म्हणूनही ती ओळखली जात आहे.

हेही वाचा – अवकाळीने दाणादाण; रब्बी पिकांसह द्राक्ष, डाळिंब, केळी, पपई पिकांचे नुकसान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ग्रामीण भागातील मुलीही कमी नाहीत. जिद्द, चिकाटी आणि घरच्यांचे पाठबळ असेल, तर कुठल्याही आव्हानाला सामोरे जाता येते, असा विश्वास कृतज्ञा व्यक्त करते.