दुष्काळामुळे गावोगावी जसा पाण्याचा शोध सुरू झाला आहे, तसेच या दुष्काळामुळे रोजगाराच्या शोधात शेकडोंच्या संख्येने लोकंही स्थलांतर करू लागले आहेत. पाणी आणि रोजगाराच्या या शोधात मिरज तालुक्यात कर्नाटकातून आलेल्या काही महिलांनी चक्क विहीर खोदायला घेतली आहे. आजवर केवळ पुरुषांचे म्हणून पाहिल्या जाणाऱ्या या कामातील महिलांची ही भरारी पाहून अनेकांना थक्क व्हायला झाले आहे.
सांगली जिल्ह्य़ात यंदा अनेक भागांत तीव्र स्वरूपाचा दुष्काळ पडलेला आहे. पाण्याअभावी लोक परागंदा होत आहेत. शेती जळू लागली आहे, जनावरांचे हाल सुरू आहेत. या पाश्र्वभूमीवर अनेक ठिकाणी पाण्याच्या शोधात विंधनविहीर, विहिरी खोदण्याची कामे मोठय़ा प्रमाणात सुरू आहेत. या कामावरही अन्य भागांतील, विशेषत: शेजारील कर्नाटक राज्यातील दुष्काळग्रस्तच मोठय़ा प्रमाणात काम करत आहेत. यामध्येही मुख्यत्वे खोदाईचे काम पुरुष तर त्यांना मदतीचे काम स्त्रिया करताना दिसतात, पण जिल्ह्य़ातील मिरजजवळील खंडेराजुरी गावातील महिलांच्या या पराक्रमाने कष्टाचे मोल आणखी वाढवले आहे.
गेल्या महिन्यापासून या गावात चक्क महिलांनीच एक विहीर खोदायला घेतली आहे. गावातील चंद्रकांत चव्हाण यांच्या शेतात सुरू असलेल्या या विहीर खोदाईच्या कामावर कर्नाटक राज्यातील विजापूर येथील महिला काम करीत आहेत. श्रीदेवी राठोड ही महिला मुकादमाची जबाबदारी पार पाडत असून तिच्या हाताखाली पाच महिला ही विहीर खोदत आहेत.
या महिलांकडे चौकशी केली असता, त्याही दुष्काळग्रस्त भागातूनच रोजगारासाठी इथे आल्या आहेत. शेतात अन्य स्वरूपाचा रोजगार मिळेनासा झाल्यावर नाइलाजाने त्या विहीर खोदाईकडे वळल्या आहेत. पहार, टिकाव, घण आणि अशाच अवजड हत्यारांनिशी करायचे हे काम खरेतर महिलांच्या शक्तीबाहेरचे, पण हलाखी आणि चिकाटीच्या जोरावर या महिलांनी हे काम आत्मसात केले आहे. त्यांनी गेल्या पाच वर्षांत तब्बल पंचवीसहून अधिक विहिरी खोदल्या आहेत. या कामात श्रीदेवी राठोड यांना सुवालीबाई राठोड, सुनीता राठोड, मुंगीबाई राठोड, मंजुबाई राठोड व शैला राठोड या मदत करतात. विहीर खोदाईवेळी खालून निघणारा दगड, गाळ काढण्यासाठी इंजिनवरील यारीचा वापर या महिला करतात. यारीचालकाचे हे काम शैला राठोड ही महिला मोठय़ा हिमतीने पेलते. विहीर खोदाईसाठी अनेकदा स्फोटकांचा वापर केला जातो. हे जिलेटीन व अमोनियम भरण्याची जोखीमही या महिलाच पार पाडतात.
दुष्काळामुळे सध्या सगळीकडेच अस्वस्थता पसरली आहे. पाणी नाही, शेती नाही, यामुळे रोजगारही नाही. अशात या दुष्काळाने जगणे अवघड केल्याचीच सर्वत्र भावना आहे. या पाश्र्वभूमीवर विहीर खोदणाऱ्या या महिलांची लढाई बरेच काही सांगून जात आहे.
संग्रहित लेख, दिनांक 7th May 2013 रोजी प्रकाशित
दुष्काळाच्या वणव्यात ‘त्यांनी’ विहीर खोदायला घेतली
दुष्काळामुळे गावोगावी जसा पाण्याचा शोध सुरू झाला आहे, तसेच या दुष्काळामुळे रोजगाराच्या शोधात शेकडोंच्या संख्येने लोकंही स्थलांतर करू लागले आहेत. पाणी आणि रोजगाराच्या या शोधात मिरज तालुक्यात कर्नाटकातून आलेल्या काही महिलांनी चक्क विहीर खोदायला घेतली आहे. आजवर केवळ पुरुषांचे म्हणून पाहिल्या जाणाऱ्या या कामातील महिलांची ही भरारी पाहून अनेकांना थक्क व्हायला झाले आहे.
First published on: 07-05-2013 at 03:12 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Womens starts to digging the well in the drought effected area