गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना २००२मधील गुजरात दंगलीप्रकरणी न्यायालयानेच निदरेष ठरवले आहे. त्यामुळे या विषयावर आता अधिक चर्चा करणे थांबवावे, असा ‘सल्ला’ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी दिला. त्याच वेळी, ‘भाजपशी वैचारिक मतभेद असल्याने त्यांच्यासोबत जाणार नाही’ असेही पवार यांनी स्पष्ट केले.
केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार कोल्हापूर जिल्हय़ाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले असता येथील शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी दंगलीप्रकरणी मोदींवर टीका होऊ नये, असे अप्रत्यक्षपणे सूचित केले. मात्र, आपली व मोदींची भेट झाली नाही, असेही त्यांनी पुन्हा एकदा म्हटले.
प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या मोदींबद्दलच्या वक्तव्याचे त्यांनी समर्थन करताना न्यायालयातील निर्णयावर पुन्हा चर्चा होऊ नये असा पुनरुच्चार केला. तर राहुल गांधींचे काँग्रेसकडून होणारे उदात्तीकरण हा त्या पक्षाच्या धोरणाचा भाग असल्याचे सांगून त्याचेही त्यांनी समर्थन केले.
‘देशात काँग्रेससह मर्यादित पक्ष असलेली आघाडी स्थिर सरकार देऊ शकते. ८ ते १० पक्ष असलेली आघाडी स्थिर सरकार देऊ शकत नाही. आतापर्यंत अनेक वेळा स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या वेळी देशात काँग्रेस आघाडीलाच बहुमत मिळेल,’ असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. अलीकडे ज्या राज्यांत निवडणुका झाल्या, तेथे गेल्या १०-२० वर्षांत भाजपचाच
प्रभाव होता. त्यामुळे त्यांना यश मिळाले. मात्र, इतर राज्यांत भाजपला इतके यश मिळणार नाही, असे ते म्हणाले. दिल्लीमध्ये ‘आप’ला माध्यमांचा पािठबा मिळाला म्हणून त्यांना यश मिळाले, पण आता जनतेचा अपेक्षाभंग झाला आहे, असेही ते म्हणाले.
मुंडेंवर प्रतिहल्ला
लोकसभेच्या निवडणुका समोर आल्याने प्रत्येक पक्षाने आपली भूमिका मांडणे गर नाही. पण द्वेषाचे राजकारण ही काही लोकांची प्रवृत्ती आहे. ४७ वर्षांत १४ वेळा न हरता निवडणुका जिंकत आलो. पण ज्यांना त्यांच्याच मतदारसंघात आमच्या पक्षाने हरवले अशा गोपीनाथ मुंडेंनी आमच्या पराभवाची भाषा करू नये. कारण आम्ही द्वेषाचे राजकारण करत नाही, असे सांगत शरद पवार यांनी मुंडेंच्या टीकेला प्रत्युत्तर
दिले.