सांगली : मृतात्म्याच्या त्रासामुळे घरातील सदस्य सतत आजारी पडत आहेत. त्याची शांती करा असा आग्रह धरूनही शांती केली जात नाही. यामुळे शेजारी-शेजारी राहणार्‍या दोन कुटुंबात वादही झाला. आपसात अबोलाही धरला. हा वाद अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यानी प्रबोधन व सामोपचाराने मिटवला. आता दोन्ही कुटुंबातील कटुता संपली आणि संवादही सुरू झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की, माडग्याळ (ता. जत) येथे एका कुटुंबातील वृद्ध व्यक्तीचे सहा वर्षांपूर्वी निधन झाले होते.तेव्हापासून शेजारी राहणार्‍या कुटुंबामध्ये मुले आणि महिला सतत आजारी पडत. त्यामुळे त्या कुटुंबाला वाटत होते की, शेजारील मयत वृद्ध व्यक्तीचा आत्मा अशांत आहे.तो आमच्या घरी येऊन आमच्या कुटुंबीयांना त्रास देतो, आजारी पाडतो. यासाठी संबंधित कुटुंबाला त्यांनी वारंवार विनंती केली की,तुम्ही तुमच्या मृत वडिलांच्या आत्म्याची शांती करा,त्याला खानादाना द्या,म्हणजे तो शांत होईल. या गोष्टीला त्यांनी नकार दिला होता. या तगाद्याने दोन्ही कुटुंबात वादही झाला.मृताच्या घरातील सदस्य हे करणी, जादूटोणा करते असा अपप्रचार गावात केला गेला. त्यामुळे शेजारी राहणार्‍या या दोन्ही कुटुंबांनी एकमेकांशी अबोला धरला.

तुम्ही मृतात्म्याची शांती का करत नाहीत’ अशी विचारणा करून मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना गावांमध्ये सतत अपमानित केले जात होते. त्यामुळे त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा सचिव रवि सांगोलकर यांच्याशी संपर्क केला.काल सांगोलकर यांनी माडग्याळ गावी जाऊन त्यांनी दोन्ही कुटुंबांची एकत्र बैठक घेतली. या बैठकीस गावचे पोलीस पाटील सिद्धांना ऐवळे हेही उपस्थित होते.

यावेळी श्री. सांगोलकर म्हणाले की, आत्मा पुनर्जन्म या गोष्टी विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध झालेल्या नाहीत. कोणताही मृत आत्मा येऊन आपल्याला त्रास देऊ शकत नाहीत. घरातील सततच्या आजारपणाला वेगळी कारणे असू शकतात. ती आपण शोधली पाहिजेत. आत्म्याची शांती करून आजारपण दूर होणार नाही. वेळीच वैद्यकीय सल्ला घेतला तर आजारपणावर नक्की मात करता येईल.अंधश्रद्धेतून असे खोटे आरोप करणे हा जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा आहे. तुम्ही जर या कुटुंबाची पुन्हा बदनामी केली तर आम्ही कायदेशीर कारवाई करण्यास पोलिसांना सांगू.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

समोपचाराच्या बैठकीमध्ये दोन्हीही कुटुंबांचे समाधान झाले.त्या कुटुंबाने अंधश्रद्धेतून आरोप करणे आम्ही थांबवू अशी ग्वाही अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना दिली. या बैठकीस अंनिस जाडरबोबलाद शाखेचे अध्यक्ष संतोष गेजगे, संतोष शिंदे उपस्थित होते.