राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी लोकसहभागाची गरज असून, या संकटावर मात करण्यासाठी शासन युद्धपातळीवर काम करत आहे. यापुढील काळात राज्यातील जनतेला पाणी टंचाईस सामोरे जावे लागणार नाही, याकरिता शासनाकडून संपूर्ण राज्यात पाण्याचे नियोजन केले जाईल, असे राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी किल्ले शिवनेरी येथे सांगितले.
शिवजयंती निमित्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, वनमंत्री पतंगराव कदम, आमदार विनायक मेटे, आमदार बापू पठारे, युवा नेते अतुल बेनके, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हाधिकारी विकास देशमुख, सत्यशील शेरकर आदी मान्यवर उपस्थित होते. शिवनेरीवरील शिवजन्मस्थळी भेट देऊन शिवजन्म सोहळ्यात सहभाग घेतला. संभाजी ब्रिगेडच्या महिलांनी या वेळी पारंपरिक पद्धतीने पाळणा गीते सादर केली.
मुख्यमंत्री चव्हाण या वेळी म्हणाले की, आजचा दिवस प्रेरणादायी दिवस आहे. शिवनेरीवर येऊन छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन राज्य कारभार करण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळी भागात दररोज १८०० ते १९०० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. नादुरुस्त नळपाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करण्यात येत आहे. यापुढे राज्यातील धरणाचे पाणी फक्त पिण्यासाठीच वापरण्यात येईल असा शासनाचा आदेश काढला आहे. सेवाभावी संस्थांनी दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी स्वत:हून पुढे येणे आवश्यक आहे.
अरबी समुद्रात शिवरायांचे स्मारक बांधण्यासाठी जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. परंतु त्याकरिता ४३ विविध विभागांच्या परवानगी घेणे आवश्यक आहे. शासन तातडीने लक्ष घालून स्मारकाला चालना देईल, तर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमली आहे. त्याचा आढावा घेवून इतर समाजातील आरक्षणाला धक्का न लावता आरक्षणाचा विचार करून योग्य तो निर्णय मंत्रिमंडळात घेतला जाईल.