S. Jaishankar Slams US President Donald Trump: भारत आणि अमेरिका यांच्यातील रखडलेल्या व्यापारामुळे दोन्ही देशांमध्ये व्यापार तणाव वाढला आहे. अशात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून भारतावर ५० टक्के टॅरिफ लादले आहे. याचबरोबर भारताने रशियन तेल खरेदी थांबवावी यासाठी ट्रम्प सातत्याने भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र भारताने ट्रम्प यांच्या या दबावाला न जुमानता रशियन तेल खरेदी करण्याचा पवित्रा कायम ठेवला आहे.
असा राष्ट्राध्यक्ष…
दरम्यान, भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरण हाताळण्याच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी म्हटले की, “जगाने आजपर्यंत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी इतक्या उघडपणे परराष्ट्र धोरण राबवलेले कधीही पाहिलेले नाही.”
ट्रम्प यांना चोख उत्तर
अमेरिकेच्या अतिरिक्त टॅरिफ वाढीबाबत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ट्रम्प यांना चोख उत्तर दिले आहे. रशियाचे तेल खरेदी करण्यासाठी भारतावर लादण्यात आलेला ५० टॅरिफ पूर्णपणे चुकीचा असल्याचे जयशंकर यांनी म्हटले आहे. इकॉनॉमिक टाईम्स वर्ल्ड लीडर्स फोरम-२०२५ मध्ये बोलताना ते म्हणाले की, भारताची प्राथमिकता आपल्या शेतकऱ्यांचे आणि लहान उत्पादकांचे हित जपणे आहे. भारत आपल्या हितांशी तडजोड करणार नाही यावर जयशंकर यांनी भर दिला.
मर्यादा पाळल्याच पाहिजेत
जयशंकर म्हणाले की, “काही मर्यादा पाळल्याच पाहिजेत. आपले शेतकरी आणि लहान उत्पादक आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. आम्ही या बाबतीत मागे हटू शकत नाही. सरकार म्हणून, आम्ही आमच्या शेतकऱ्यांचे आणि लहान उत्पादकांचे हित जपण्यास ठाम आहोत. ही अशी गोष्ट आहे ज्यावर आम्ही तडजोड करू शकत नाही.”
टॅरिफ आणि तेल वाद
एस जयशंकर यांनी यावेळी असेही सांगितले की, टॅरिफचा मुद्दा चुकीच्या पद्धतीने तेल वाद म्हणून सादर केला जात आहे. ते म्हणाले की, चीन आणि इतर युरोपीय देश आपल्यापेक्षा रशियाकडून जास्त तेल आयात करत आहेत. परंतु टॅरिफचा मुद्दा त्यांना लागू होत नाही. जयशंकर पुढे म्हणाले की, जेव्हा काही लोक म्हणतात की, भारत युद्धासाठी रशियाला पैसे देत आहे, तेव्हा त्यांनी हे देखील पाहिले पाहिजे की रशिया-युरोप व्यापार हा भारत-रशिया व्यापारापेक्षा खूप मोठा आहे.
निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार
जयशंकर यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले की, भारताला राष्ट्रीय हितासाठी निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यांनी याला धोरणात्मक स्वायत्तता म्हटले आहे. भारत-अमेरिका संबंधांवर बोलताना जयशंकर म्हणाले की, तणाव असूनही, चर्चा सुरूच आहेत. ते म्हणाले की, आपण दोन मोठे देश आहोत. चर्चेची दारे बंद झाली नाहीत. अमेरिकेच्या भारतातील नव्या राजदूतांच्या नियुक्तीबद्दल विचारले असता, जयशंकर यांनी यावर भाष्य करण्यास नकार दिला.