सातारा : जगातील सर्वांत बुटकी म्हैस म्हणून साताऱ्यातील मलवडी (ता. माण) येथील ‘राधा’ नावाच्या पाळीव म्हशीची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली आहे. या ठेंगण्या-ठुसक्या ‘राधा’ला पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता लागलेली असते. आता तर प्रत्येक कृषी प्रदर्शनात ती गर्दी खेचत आहे.

शेतकरी व पशुपालक त्रिंबक बोराटे यांच्या घरच्याच मुऱ्हा म्हशीच्या पोटी जून २०२२ मध्ये ‘राधा’चा जन्म झाला. ‘राधा’ दोन-अडीच वर्षांची झाल्यावर तिच्या उंचीत बदल होत नसल्याचे बोराटे यांच्या लक्षात आले. त्यानंतर बोराटे यांचा कृषी पदवीधर मुलगा अनिकेत याने ‘राधा’ला कृषी प्रदर्शनात सहभागी करण्याचा निर्णय घेतला.

सुरुवातीला कोणीच त्याला प्रतिसाद दिला नाही. डिसेंबर २०२४ मध्ये सोलापूर येथील सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनात पहिल्यांदा ‘राधा’ने सहभाग घेतला. अन् ‘राधा’चा सर्वत्र बोलबाला सुरू झाला. त्यानंतर पुसेगावचे सेवागिरी, कर्नाटकातील निपाणी यांसह एकूण १३ कृषी प्रदर्शनांत खास आकर्षण म्हणून ‘राधा’ला निमंत्रित करण्यात आले.

जानेवारी २०२५ रोजी ‘राधा’ची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्येही नोंद झाली. परभणी येथील कृषी प्रदर्शनानंतर अनिकेत याने ‘राधा’च्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी प्रयत्न सुरू केले. यात पशुधन विकास अधिकारी डॉ. शरद थोरात यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी म्हशीची पाहणी करून अहवाल सप्टेंबरमध्ये पाठवला.

२८ ऑक्टोबर रोजी ‘राधा’ची जगातील सर्वांत बुटकी म्हैस म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली. या म्हशीसाठी ओला व सुका चारा दररोज बारा किलो, पेंड, गव्हाचे पीठ, भुसा सकाळी व संध्याकाळी दोन दोन किलो दिला जातो. तिचे वजन २८५ किलो आहे. यापुढे देशातील सर्वांत मोठ्या आणि आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनात ‘राधा’ला सहभागी करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

राधा
  • म्हशीचे नाव – राधा
  • वैशिष्ट्य – जगातील सर्वांत बुटकी पाळीव म्हैस
  • उंची – ८३.८ सेंमी (२ फूट ८ इंच)
  • ठिकाण – मलवडी, ता. माण, जि. सातारा, महाराष्ट्र
गिनीज रेकॉर्डसाठी तरुणाचा प्रयत्न सफल!

आमची ‘राधा’ प्रत्येक कृषी प्रदर्शनात सर्वांचेच लक्ष वेधून घेत असून, सामान्य शेतकऱ्यांसह अनेक मान्यवर व तज्ज्ञांच्या आकर्षणाची ती केंद्रबिंदू ठरत आहे. ‘राधा’ची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये झाल्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे. यापुढे आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनात ‘राधा’ला सहभागी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. – अनिकेत बोराटे, म्हशीचे पशुपालक.

नियमित म्हैस साडेचार- पाच फूट उंचीची व साडेचारशे-पाचशे किलो वजनाची असते. ही म्हैस फक्त दोन फूट आठ इंच आहे. या म्हशीच्या जनुकीय पेशींत, रचनेत वाढ झाली नाही. त्यामुळे वजन, उंची वाढली नाही. प्रजननक्षमता वाढीसाठी आवश्यक घटक नसल्याने प्रजनन होऊ शकत नाही. – डॉ. शरद थोरात, पशुवैद्यकीय अधिकारी, वावरहिरे, माण, सातारा.