|| प्रबोध देशपांडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकही परिपूर्ण स्मारक नाही

विदर्भात साहित्य, कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रात अनेकांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. परंतु, येथे एकाही साहित्यिकाचे परिपूर्ण स्मारक नाही. राज्यकर्त्यांच्या उदासीनतेसह साहित्य संस्थांच्या नेतृत्वाचे दुर्लक्ष त्यासाठी कारणीभूत ठरले आहे.

मालगुंड येथे केशवसुतांचे अतिशय देखणे आणि साजेसे स्मारक उभारले आहे. नाशिकला कुसुमाग्रज आणि नारायण सुर्वे यांचे स्मारक आहे. नांदेडला कुरुंदकरांचे, औरंगाबादमध्ये बी. रघुनाथांचे, जळगावमध्ये बहिणाबाई चौधरी यांचे स्मारक आहे. परंतु, विदर्भात स्मारकांच्या बाबतीत अनुशेष दिसून येतो.

आद्य स्त्री निबंध लेखिका ताराबाई शिंदे यांचे बुलढाणा येथे तर कवी ना.घ.देशपांडे यांचे मेहकरमध्ये स्मारक असावे, अशी अनेक वर्षांपूर्वीची मागणी आहे. वि.भी.कोलते यांचे नागपूर किंवा मलकापूरमध्ये स्मारक उभारण्यात यावे, ही मागणी देखील जुनीच. कवी सुरेश भटांचे नाव नागपूरमध्ये फक्त नाटय़गृहाला दिले आहे. विदर्भात सुरेश भट, कवी ग्रेस, ना.घ.देशपांडे, नाटककार राम गणेश गडकरी, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, मुक्तीबोध, कवी बी., राम शेवाळकर, वामन निंबाळकर, द.भी.कुळकर्णी, गंगाधर पानतावणे अशा महान साहित्यिकांचे भव्यदिव्य स्मारक उभारण्याची गरज होती. परंतु, विदर्भातील राज्यकर्त्यांनी तसेच साहित्य संस्थांचे नेतृत्व करणाऱ्या सांस्कृतिक नेतृत्वाने या प्रश्नाचे गांभीर्य ओळखलेच नाही.

विदर्भाची साहित्य, कला आणि संस्कृती ही फार प्रगतशील आहे, असे बोलले जाते. मात्र, विदर्भातील साहित्यिकांना त्यांच्याच भूमित उपेक्षित राहावे लागत आहे. एकाही राजकीय पक्षाने कधीही साहित्यिकांच्या स्मारकांच्या अनुशेषावर भाष्य केले नाही. यावरून साहित्यिकांविषयी राज्यकर्त्यांची उदासीनता स्पष्ट होते. राज्यकर्ते या स्मारकांच्या बाबतीत अनुकूल नसतील तर ठिकठिकाणच्या स्थानिक नेतृत्वाने या स्मारकांसाठी  पुढाकार घ्यायला हवा. मात्र, कुणीही त्याबाबत पुढाकार घेतांना दिसून येत नाही. लेखक कलावंतांचे स्मरण करण्यासाठी व त्यांच्यापासून प्रेरणा घेण्यासाठी स्मारकांची गरज असते. पाश्चिमात्य देशांमध्ये लेखक, साहित्यिक कलावंतांच्या स्मारकांना राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळतो. विदर्भात मात्र याच्या अगदी उलट चित्र आहे.

उपेक्षा कुठे तरी थांबली पाहिजे

वैदर्भीय साहित्यिक व लेखकांच्या वाटय़ाला आलेली ही उपेक्षा कुठे तरी थांबली पाहिजे. विदर्भात लेखक, कवी, साहित्यिकांच्या स्मारकांचा अनुशेष त्वरित भरून काढावा. त्यासाठी विदर्भातील असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यकर्त्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. साहित्य संस्थांचे नेतृत्व करणाऱ्यांनीही हा प्रश्न गांभीर्याने घेणे अपेक्षित आहे.    – नरेंद्र लांजेवार, साहित्यिक, बुलढाणा

हुतात्मा स्मारकांत  तात्पुरती उभारणी शक्य

विदर्भातील जवळपास प्रत्येक जिल्ह्यत हुतात्मा स्मारक आहे. या हुतात्मा स्मारकामध्ये स्वातंत्र्य सैनिकांच्या छायाचित्रांव्यतिरिक्त काहीही नाही. अतिशय देखण्या अशा हुतात्मा स्मारकाच्या वास्तू आहेत. या वास्तूमध्ये तरी त्या संबंधित जिल्ह्यतील लेखक, साहित्यिक, कलावंतांचे तात्पुरते स्मारक उभारले जाऊ शकते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Writers monument in akola
First published on: 30-09-2018 at 00:03 IST