मुंबई बॉम्बस्फोटातील गुन्हेगार याकूब मेमनची शेवटची इच्छा नागपूर तुरूंग प्रशासनाने पूर्ण केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. आपली धाकटी मुलगी झुबेदाशी बोलण्याची इच्छा याकूबने व्यक्त केल्यानंतर अधीक्षकांनी तिच्याशी फोनवरून संपर्क साधला आणि याकूबचे झुबेदाशी बोलणे घडवून आणले.
फाशी देण्यात येणाऱ्या गुन्हेगाराला त्याची शेवटची इच्छा विचारण्याची प्रथा आहे. त्यानुसार, याकूबलाही त्याची शेवटची इच्छा विचारण्यात आली होती. फासावर लटकणार असल्याची पूर्ण कल्पना त्यावेळी याकूबला आली होती. त्यामुळेच मुलगी झुबेदाला भेटू द्यावे, अशी विनंती याकूबने तुरंग प्रशासनाकडे केली. गुन्हेगाराची शेवटची इच्छा मान्य किंवा अमान्य करण्याचा अधिकार हा तुरुंग प्रशासनाकडे असतो. याकूबची इच्छा नियमांनुसार मान्य करत तरुंग प्रशासनाने बाप-बेटीमध्ये अखेर फोनवरून संवाद घडवण्याचा निर्णय घेतला आणि याकूबचे फासावर चढण्याआधी मुलगी झुबेदाशी काही मिनिटे फोनवर बोलणे झाल्याचे सांगण्यात आले आहे.