यवतमाळ जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांच्या विरोधात पुकारलेल्या आंदोलनास मोठ्यासंख्येने अधिकारी, कर्मचाऱ्यांचा पाठींबा मिळत असल्याने हे आंदोलन तीव्र झाल्याचे दिसत आहे. आज मंगळवारी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांसह तब्बल १२० वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्या सेवेचा राजीनामा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांडे सुपूर्द केल्याने खळबळ उडाली.
करोना काळात गेल्या सहा महिन्यांपासून अवितर आरोग्य सेवा देणाऱ्या जिल्ह्यातील आरोग्य अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी सन्मानाची वागणूक देत नसल्याचा आरोप करत सुरू झालेल्या या आंदोलनात विविध अधिकाऱ्यांनी उडी घेतली आहे. जिल्हाधिकारी सिंह हे अधिकारी, कर्मचाऱ्यांना कायमच हीन दर्जाची वागणूक देत असल्याचा आरोप राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेने केला आहे. त्यामुळे त्यांची बदली केल्याशिवाय या आंदोलनातून माघार नाही, असा पवित्रा राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट-अ (मॅग्मो) संघटनेने घेतला आहे. संघटनेच्यावतीने आज(मंगळवार) येथील आझाद मैदानातील जयस्तंभासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार, नगर परिषद मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी संघटना, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संघटना, नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटनेने सहभागी होऊन पाठींबा दिल्याने प्रशासनात सर्व आलबेल नसल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यातच जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. चव्हाण, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुभाष ढोले, उपसंचालक (कुष्ठरोग) डॉ. प्रशांत पवार, साथरोग अधिकारी डॉ. सुभाष बेंद्रे आदींनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडे राजीनामा दिल्याची माहिती ‘मॅग्मो’चे अध्यक्ष डॉ. विजय आकोलकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
याशिवाय जिल्ह्यातील १२० आरोग्य अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यशैलीस कंटाळून प्रशासनाकडे राजीनामे सादर केल्याचे डॉ. आकोलकर यांनी सांगितले. या आंदोलनाची दखल घेत विभागीय आयुक्तांनी मंगळवारी रात्री शिष्टमंडळास चर्चेसाठी बोलावले असून जिल्हाधिकारी सिंह यांची येथून बदली केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट-अ (मॅग्मो) संघटनेने जाहीर केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांची बदली केली नाही तर राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा ‘मॅग्मो’ संघटनेने दिला आहे.
मी कोणाचाही अपमान केला नाही – जिल्हाधिकारी
सोमवारी काही आरोग्य अधिकारी एक निवेदन द्यायला आपल्या कक्षात आले होते. त्यावेळी त्यांचे निवेदन स्वीकारून त्यांना ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या उपक्रमात आपले काय योगदान आहे? याची माहिती विचारली. तेव्हा हे शिष्टमंडळ तडक उठून कक्षाबाहेर गेले आणि ८९ डॉक्टरांनी राजीनामे सादर केले. ही काम करण्याची पद्धती नाही. मी कोणत्याही डॉक्टरचा अपमान केला नाही, अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
ग्रामीण भागातील आरोग्य सेवा कोलमडली
जिल्ह्यात करोनाचे थैमान सुरू आहे. दररोज सरासरी १०० बाधित रूग्ण आढळत असून रुग्णांचे मृत्यू देखील होत आहेत. अशा कठीण प्रसंगी वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे ग्रामीण भागातील वैद्यकीय सेवा कोलमडली आहे. सध्या ग्रामीण भागात जलजन्य साथरोग उद्भवले असून करोनाचा संसर्गही वाढला. त्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या या आंदोलनावर शासन, प्रशासन काय भूमिका घेते, आंदोलनकर्त्या डॉक्टरांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांतर्गत कारवाई करते की, जिल्हाधिकाऱ्यांची उचलबांगडी करते याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.