व्याख्यानमाला, साहित्यिकांचा गौरव यांसह इतर माहितीपूर्ण व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचा आस्वाद येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने २० ते २७ एप्रिल या कालावधीत आयोजित ‘वार्षिकोत्सव’च्या निमित्ताने नाशिककरांना घेता येणार आहे. वाचनालयाच्या प. सा. नाटय़मंदिरात हे सर्व कार्यक्रम सायंकाळी साडेसहा वाजता होतील. २० एप्रिल रोजी अनंत कान्हेरे स्मृती व्याख्यानाने या कार्यक्रमांची सुरुवात होणार आहे. ‘क्रांतिकारकांचे जीवन’ या विषयावर प्रकाश पाठक यांचे व्याख्यान होईल. २३ एप्रिल रोजी विवेक वेलणकर यांचे आकूत स्मृतिप्रीत्यर्थ व्याख्यान होणार असून ‘माहितीचा अधिकार सामान्य जनतेच्या हातातील अस्त्र’ या विषयावर ते बोलतील. २४ एप्रिल रोजी शाहीर परवेझ यांचे शिष्य नाशिकचे डॉ. उद्धव अष्टुरकर यांचा सतारवादनाचा कार्यक्रम होईल. २७ एप्रिलला या वार्षिकोत्सवाचा समारोप बाळशास्त्री जांभेकर पत्रकार पुरस्कार प्रदान समारंभाने होईल. या वर्षी हा पुरस्कार नाशिकचे ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा यांना ‘लोकसत्ता’चे व्यवस्थापकीय संपादक गिरीश कुबेर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. दरम्यान, २०१२ मधील उत्कृष्ट साहित्यकृतींना सावानातर्फे देण्यात येणारे पुरस्कार जाहीर झाले आहेत. डॉ. वि. म. गोगटे ललितेतर साहित्यासाठी डॉ. सुलभा ब्रह्मनाळकर यांना (गोफ जन्मांतरीचे), ग. वि. अकोलकर पुरस्कार आसावरी काकडे यांना (ईषावास्यम् इदम् सर्वम्), अ. वा. वर्टी कथालेखक पुरस्कार नीलिमा बोरवणकर यांना, मु ब. यंदे पुरस्कार कै. धनंजय कुलकर्णी यांना (हैदराबादची चित्तरकथा), तर पु. ना. पंडित पुरस्कार मिलिंद जोशी यांना ‘पानगळ’ या कथासंग्रहासाठी दिला जाणार आहे. या वर्षी विमादी पटवर्धन विनोदी लेखन पुरस्कारयोग्य साहित्यकृती आढळली नसल्याचे परीक्षक मंडळाने नमूद केले आहे. अ‍ॅड. अभय सदावर्ते, डॉ. सतीश श्रीवास्तव, प्रकाश वैद्य, डॉ. चंद्रकांत संकलेचा व स्वानंद बेदरकर यांच्या समितीने या साहित्यकृतींची निवड केली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते २५ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजता प. सा. नाटय़गृहात आयोजित कार्यक्रमात पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे.