सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात मटका, जुगार, हातभट्टी दारू, डान्सबार, सावकारीसह अन्य अवैध व अनधिकृत व्यवसाय मोठ्या प्रमाणावर बोकाळले असल्याच्या तक्रारी आहेत. त्याची दखल घेऊन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सर्व अवैध धंद्यांवर तत्काळ परिणामकारक कारवाई करावी, असे स्पष्ट आदेश पोलीस प्रशासनाला दिले आहेत.
शहर पोलीस आयुक्तालयात दुपारी कदम यांनी पोलीस प्रशासनासह अन्य विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीपूर्वी पोलीस आयुक्तालयात काही सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी पोलीस आयुक्त राजकुमार यांच्या समक्ष कदम यांची भेट घेऊन त्यांच्याकडे वाढत्या अवैध धंद्यांबद्दल तक्रारी केल्या. त्याची कदम यांनी तत्काळ दखल घेतली. या बैठकीस पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली काळे, अजित बोऱ्हाडे, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, अन्न धान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
कदम म्हणाले, महाराष्ट्रात सायबर गुन्ह्यांच्या तक्रारीमध्ये वाढ होत आहे. हे गुन्हे रोखण्यासाठी पीडित नागरिकांच्या तक्रारींना तत्काळ प्रतिसाद देऊन त्यावर उपाययोजना कराव्यात. तसेच जिल्ह्यात अनधिकृपणे गुटखा विक्री होणार नाही दक्षता घेऊन गुटखा विक्रीवर आळा घालण्यासाठी अन्न व औषध विभाग व पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे कार्यवाही करावी, अशा सूचानाही त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी पोलीस आयुक्त राजकुमार म्हणाले, सोलापूर शहरात एकूण सात पोलीस स्टेशन आहेत. तसेच वर्षात विविध सार्वजनिक उत्सवांच्या माध्यमातून १७० मिरवणुका असतात. त्या सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सतत प्रयत्नशील आहे. शंभर दिवसीय कृती आराखडा अभियानांतर्गत या विभागामार्फत ११०० वाहनांचा लिलाव करण्यात आला आहे. तसेच पोलीस प्रशासनातील रिक्त पदे तातडीने भरण्याची विनंती त्यांनी केली