तुम्हीच आमची कमिटी तुम्हीच आमचं सर्वस्व. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा जो निर्णय घेतला आहे तो मागे घ्या असं आवाहन छगन भुजबळ यांनी शरद पवार यांना सगळ्यांच्या वतीने केलं आहे. आज मुंबईत झालेल्या कार्यक्रमात शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. अशात त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय हा सगळ्यांनाच धक्का देणारा ठरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रडू लागले. जितेंद्र आव्हाड यांनाही अश्रू अनावर झाले. अशात छगन भुजबळ यांनी सगळ्यांच्या वतीने शरद पवार यांना आवाहन केलं आहे.
काय म्हटलं आहे छगन भुजबळ यांनी?
” असं आहे साहेब तुम्ही तुमचं वय झालं आहे वगैरे जे सांगत आहात ते काही आम्हाला मंजूर नाही. या वयातही तुमचा उत्साह हा आम्हाला लाजवणारा आहे. आमच्या कुणाहीपेक्षा तुम्ही आमच्यापेक्षा दसपट काम करता. आज या पक्षाला, राज्याला आणि देशाला तुमच्या नेतृत्वाची गरज आहे. अशावेळी तुम्ही असा निर्णय घेणं हे आम्हालाच काय देशातल्या कुठल्याही व्यक्तीला मान्य होणार नाही. आम्ही आमच्या सगळ्यांच्या वतीने आम्हाला विनंती करतो की आपण राजीनामा मागे घ्यावा. हे सगळे इथे आले आहेत ते आम्ही सगळेच तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागलो आहोत. तुमच्यासोबत सुखात आणि दुःखात चाललो आहोत. तुम्ही आमच्या सोबत राहिला आहात. अशावेळी तुम्हाला बाजूला ठेवून काम करणार? कमिटी वगैरे आम्हाला काहीही मंजूर नाही. आम्हाला ते काहीही नको. तुम्हीच आमचे नेते, तुम्हीच आमची कमिटी आणि तुम्हीच सर्वस्व. संपला विषय. ” असं म्हणत राजीनामा मागे घेण्याचा निर्णय तुम्ही घ्यावा असं आवाहन छगन भुजबळ यांनी केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या राजकीय जीवनाबाबत मोठी घोषणा केली आहे. “प्रदीर्घ कालावधीनंतर आता कोठेतरी थांबण्याचा विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे,” असं शरद पवारांनी जाहीर केलं. ते मंगळवारी (२ मे) मुंबईत ‘लोक माझे सांगाती’ या त्यांच्या राजकीय आत्मकथेच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन कार्यक्रमात बोलत होते.
शरद पवार म्हणाले, “१९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली, तेव्हापासून गेली २४ वर्षे राष्ट्रवादी पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे. सार्वजनीक जीवनातील १ मे १९६० पासून सुरू झालेला हा संपुर्ण प्रवास गेली ६३ वर्षे अविरत चालू आहे. त्यापैकी ५६ वर्षे मी कुठल्या ना कुठल्या सभागृहाचा सदस्य किंवा मंत्री म्हणून सातत्याने काम करत आहे. संसदेतील राज्यसभा सदस्यपदाची पुढील ३ वर्षे शिल्लक आहेत. या काळात राज्याच्या आणि देशाच्या प्रश्नांमध्ये अधिकाधीक लक्ष घालण्यावर माझा भर असेल, याशिवाय मी कोणतीही अन्य जबाबदारी घेणार नाही.”
