सावंतवाडी: दोडामार्ग तालुक्यातील खोकरल गावात सोमवारी संध्याकाळच्या सुमारास गणेश विसर्जन घाटावर गणेश मूर्ती विसर्जनासाठी लाईटची व्यवस्था करताना वीजेच्या धक्क्याने एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर उपसरपंच गंभीर जखमी झाले. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.मृत तरुणाचे नाव सुर्याजी साबाजी कुबल (वय ३०) असे असून, जखमी उपसरपंचाचे नाव भरत गवस (वय ४५) आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश विसर्जन घाटावरील वीज वाहिन्यांची झाडेझुडपे साफ करून बल्ब लावण्याचे काम सुरू होते. गावातील काही ग्रामस्थ, ज्यात सुर्याजी कुबल आणि उपसरपंच भरत गवस यांचा समावेश होता, हे काम करत असताना अचानक वीज प्रवाहाचा धक्का लागला. यात दोघेही गंभीर जखमी झाले.
त्यांना तात्काळ साटेली-भेडशी येथील आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले, परंतु वाटेतच सुर्याजी कुबल यांचा मृत्यू झाला. जखमी भरत गवस यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना गोव्यातील बांबोळी येथे हलवण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच दोडामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गावातील ग्रामस्थ गणेशोत्सवाची तयारी करत असताना घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे खोकरल गावात हळहळ व्यक्त होत आहे.