लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : वर्दळ नसलेल्या सांगलीवाडी ते कदमवाडी रस्त्यावर गुरूवारी एका तरूणाचा दगडाने खून केल्याची घटना घडली असून हा खून अनैतिक संबंधातून झाला असल्याचा पोलीसांचा प्राथमिक अंदाज आहे. घटनास्थळी पोलीसांना चाकू व कोयता मिळाला आहे. या खूनप्रकरणी तिघा संशयितांना पोलीसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळाली.

सांगलीवाडीहून नदीकाठाने कदमवाडीकडे जाणार्‍या रस्त्यावर दत्ता सुतार (वय ३५ रा. इंदिरानगर, सांगली) याचा खून झाल्याची घटना दुपारी उघडकीस आला. मृतदेहाजवळच मृताची दुचाकी (एमएच ०९ बीययू ४९८५) होती. हल्लेखोरांनी दगडाने डोकीचा चेंदामेंदा केल्याचे आढळले. अतिरक्तस्त्राव झाल्याने जागीच त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, शहर पोलीस ठाण्यास याची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत प्राथमिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी हेखोरांनी चाकू व कोयता टाकला असला तरी त्यावर रक्ताचे डाग दिसत नव्हते. यामुळे या हत्याराचा वापर केला गेला की नाही याची माहिती वैद्यकीय तपासणीनंतरच मिळणार आहे. हा खून अनैतिक संबंधातून झाला असल्याचा अंदाज असून तीन संशयितांना पोलीसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, विश्रामबाग पोलीसांनी एका अरबाज उर्फ इब्राहिम रेठरेकर (वय २१) या तरूणाकडून एका जिवंत काडतूससह देशी बनावटीचे पिस्तूल जप्त केले असून संशयिताला अटक करण्यात आली असल्याचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी गुरूवारी सांगितले.