राष्ट्रवादी काँग्रेसमधील सध्याच्या अस्थिर वातावरणाचा परिणाम राज्यभरात युवतींचे संघटन करण्यात आघाडी घेणाऱ्या राष्ट्रवादी युवती काँग्रेसची काही महत्त्वपूर्ण पदांची नावे जाहीर न होण्यात झाल्याचे दिसत आहे. वर्षभरापासून कोणतीही जबाबदारी सोपविली जात नसल्याने युवती कार्यकर्तीमध्ये कमालीची अस्वस्थता अन् संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिस्थितीत विभाग ‘प्रतिनिधी’ (समन्वयक) पदांची नावे निश्चित करण्यात आली. ही यादी जाहीर होण्याच्या मार्गावर असताना मंत्रिमंडळ आणि संघटनेत बदल करण्याचे सूतोवाच झाल्यामुळे हा विषय लांबणीवर पडला आहे.
खा. सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून आकारास आलेल्या राष्ट्रवादी युवती काँग्रेसने जिल्हावार मेळावे घेऊन अधिकाधिक युवतींना पक्ष संघटनेशी जोडण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक जिल्ह्यात हे मेळावे झाल्यावर साधारणत: आठ महिन्यांपूर्वी औरंगाबाद येथे महामेळावा घेऊन जोरदार शक्ती प्रदर्शनही केले होते. युवतींचे प्रश्न सोडविण्यासाठी सशक्त राजकीय व्यासपीठ उपलब्ध करण्याच्या दृष्टीने रचना झालेल्या या संघटनेत बराच काळ उलटूनही काही जबाबदारी सोपविली जात नसल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हावार मेळाव्यात वर्षभरात युवती संघटना बांधणी करतील आणि नंतर आपल्यातून आपले नेतृत्व निवडतील, असे सांगितले गेले होते. त्या ईर्षेने कार्यकर्तीनी बरेच काम केले. स्थानिक पातळीवरील युवतींशी संबंधित अनेक प्रश्नांवर आंदोलने करण्यात आली. नवीन युवतींना संघटनेत आणण्यासाठी प्रयत्न केले; परंतु असे सर्व काही करूनही पदनियुक्तीबाबत फारशी चर्चा होत नसल्याचे लक्षात आले. यामुळे आपल्या कामाची दखल घेतली जाते की नाही, याबद्दल काही जणी बुचकळ्यात सापडल्या. प्रारंभीच्या काळात या संघटनेत काही महत्त्वपूर्ण पदे काबीज करता येतील, या आशेने तिशी गाठलेल्या महिलांनी प्रवेश केला होता; तथापि त्याचे स्वरूप आणि काम केल्याशिवाय काही हाती लागणार नसल्याचे लक्षात आल्यावर त्यांनाही माघारी फिरावे लागले.
या एकूणच घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर, राष्ट्रवादी युवती काँग्रेसतर्फे विभागवार प्रतिनिधी (समन्वयक) या पदांची जबाबदारी त्या त्या विभागातील प्रमुख कार्यकर्तीवर सोपविण्याचे निश्चित झाले. त्यानुसार प्रत्येक विभागातील राष्ट्रवादी युवती प्रतिनिधींची नावेही निश्चित करण्यात आली. या नावांची यादी जाहीर करण्यासाठी पुढे प्रदेश कार्यालयाकडे पाठविण्यात आली; परंतु ही यादी या कार्यालयाकडे जाण्याची वेळ आणि पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मंत्रिमंडळ व पक्ष संघटनेत फेरबदल करण्याचा घेतलेला निर्णय याची वेळ एकच झाल्याने आता राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या विभागवार प्रतिनिधींची निवड अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडली आहे. पक्ष संघटना व मंत्रिमंडळातील फेरबदल पूर्णत्वास जाईपर्यंत हा विषय पटलावर येणार नाही. परिणामी, या युवतींमधील अस्वस्थता आणखी वाढणार असल्याचे अधोरेखित होत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 11th Jun 2013 रोजी प्रकाशित
पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर होत नसल्याने राष्ट्रवादी युवती काँग्रेसमध्ये अस्वस्थता
राष्ट्रवादी काँग्रेसमधील सध्याच्या अस्थिर वातावरणाचा परिणाम राज्यभरात युवतींचे संघटन करण्यात आघाडी घेणाऱ्या राष्ट्रवादी युवती काँग्रेसची काही महत्त्वपूर्ण पदांची नावे जाहीर न होण्यात झाल्याचे दिसत आहे. वर्षभरापासून कोणतीही जबाबदारी सोपविली जात नसल्याने युवती कार्यकर्तीमध्ये कमालीची अस्वस्थता अन् संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
First published on: 11-06-2013 at 02:02 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Young women wing of ncp feel sickness due to not announcing names for post