नांदेड : नांदेड शहर व जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागांत शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले असून, कांदा उत्पादकांना फटका बसला. जनजीवनही विस्कळीत झाले. नायगाव तालुक्यातल्या सांगवी येथे वीज पडून एका तरुणाचा मृत्यू झाला. तसेच ८ जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. चंद्रकांत सुभाष महागावे (वय २९) असे मृत्यू झालेल्या या तरुणाचे नाव आहे.

जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांसह सामान्यांनाही सहन करावा लागत आहे. गेल्या आठवड्यात दोन वेळा अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर आंबा, हळद, केळी, पपई, उन्हाळी ज्वारी या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.

उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असताना पावसाची हजेरी समाधानकारक वाटत असली, तरी अनेक भागातला वीजपुरवठा खंडित झाला. वादळी वाऱ्यामुळे वीजपुरवठा करणाऱ्या वाहिन्या व विद्युत खांबांचे मोठे नुकसान झाले. वारा, पाऊस सुरू झाला की वीजपुरवठा खंडित केला जातो. त्याचाच फटका शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत नांदेड शहरातल्या अनेक भागांसह ग्रामीण भागात बसला. सायंकाळी साडेसातच्या सुमारास सुरू झालेला पाऊस तब्बल रात्री दहापर्यंत सुरू होता. नांदेड शहरातला अधिकांश भाग अंधारात होता. रात्री उशिरापर्यंत महावितरणचे अधिकारी, कर्मचारी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्नरत होते. दरम्यान अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आलेले आहेत. परंतु, ते अद्याप पूर्ण झालेले नाहीत. शुक्रवारच्याही पावसाने झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून मदत करावी अशी मागणी खरबी गावातील शेतकरी सोमनाथ पाटील घोगरे यांनी केली आहे.