यवतमाळमधील दारव्हा येथे मंगळवारी रात्री रस्त्यावर गोंधळ घालणाऱ्या चार तरूणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यातील एका तरूणाचा पोलीस कोठडीत अमानुष मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप करीत नागरिकांनी दारव्हा पोलीस ठाण्यावर दगडफेक केली. ही घटना मंगळवारी रात्री ९.३० वाजेच्या दरम्यान घडली. शेख इरफान शेख शब्बीर (३०) रा. रेल्वे स्टेशन परिसर, दारव्हा असे मृताचे नाव आहे. मृताच्या कुटुंबीयांनी या प्रकरणी चार पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करून तक्रार दाखल केली आहे. दारव्हा येथे जमावबंदी लागू केली आहे.

अमरावतीचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील हे दारव्हा शहरात ठाण मांडून आहेत. दारव्हा शहरानजीक तरोडा फाट्याजवळ काही युवक दारू पिवून धिंगाणा घालत असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी घटनास्थळी पोहचून चार युवकांना ताब्यात घेतले. चौघांना पोलिसांनी पकडल्याची माहिती एका मित्राने शेख इरफानच्या कुटुंबीयांना दिली. त्यावेळी शेख इरफानचा लहान भाऊ शेख जाबीर शेख शब्बीर हा तत्काळ पोलीस ठाण्यात पोहचला. तेव्हा तेथे शेख इरफान हातकड्या लावलेल्या स्थितीत निपचित पडून होता, तर त्याचे दोन मित्र आमीरखान समीर खान व गोलू शाह हे अत्यवस्थ स्थितीत जमीनीवर पडून होते, असा आरोप त्याने केला. या सर्वांना तत्काळ दारव्हा येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले गेले. तेथे डॉक्टरांनी शेख इरफान यास मृत घोषित केले. ही वार्ता शहरात पसरताच एक समुदाय पोलीस ठाण्यावर चालून आला. शेख इरफानचा मृत्यू पोलिसांच्या अमानुष मारहाणीत झाल्याचा आरोप करीत या जमावाने पोलीस ठाण्यावर दगडफेक केली. या दगडफेकीत तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले. या घटनेने दारव्हा शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली.

पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांनी तत्काळ दारव्हा येथे पोहचून आणि अतिरिक्त पोलीस कुमक पाठवून परिस्थिती नियंत्रणात आणली. आज सकाळी पोलिसांनी शहरात पथसंचलन करून नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. दरम्यान मृत शेख इरफानचा भाऊ शेख जाबीर शेख शब्बीर याने दारव्हा पोलीस ठाण्यातील जमादार बावणे, सचिन जाधव, संयज मोहतुरे, शब्बीर पप्पुवाले यांनी शेख इरफानला हातकडी लावून काठी, लाथा व बुक्क्यांनी अमानुष माहराण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत या चार कर्मचाऱ्यांविरोधात दारव्हा पोलिसांत आज (बुधवार) तक्रार दाखल केली. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल झाला नव्हता.

मारहाणीत जखमी झालेल्या अन्य तरूणांवर दारव्हा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस महानिरीक्षक मिना यांना यासंदर्भात विचारणा केली असता, या प्रकरणी मृताचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर नेमके काय घडले ते स्पष्ट होईल, असे माध्यमांशी बोलताना सांगितले. मंगळवारी रात्री पोलीस ठाण्यावर दगडफेक करणाऱ्या नागरिकांचाही शोध घेतला जात असून त्यांच्याविरोधातही कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. दारव्हा शहरात सध्या तणावपूर्ण शांतता असून शहराला पोलीस छावणीचे स्वरुप आले आहे.