ब्रिटनमध्ये करोनाचे नवीन दोन प्रकार आढळून आले आहेत. त्यामुळे सगळ्या देशांनी खबरदारी घेण्यास सुरूवात केली आहे. ब्रिटनमधून येणारी विमानंही थांबवण्यात आली आहे. मात्र, ब्रिटनमध्ये करोनाच्या नव्या प्रकाराचं संक्रमण सुरू असतानाच नागपूरमध्ये परतलेल्या एका तरुणामुळे नागपूरमध्ये खळबळ उडाली आहे.

नागपूरमधील नंदनवन येथील रहिवाशी असलेला २८ वर्षीय युवक पुण्यात एका कंपनीत कामाला आहे. कंपनीच्या कामानिमित्ताने महिनाभरापूर्वी तो इंग्लडला गेला होता. २९ नोव्हेंबरला तो नागपूरला परतला. सुरूवातील लक्षणं नसल्यानं त्याला होम क्वारंटाइन राहण्यास सांगण्यात आलं. मात्र, याच दरम्यान तो घरी न राहता शहरात फिरला. त्याचबरोबर गोंदियालाही जाऊन आला. त्यानंतर त्याला करोनाची लक्षणं दिसून आली. १५ डिसेंबर रोजी त्याने नंदनवन येथील आरोग्य केंद्रात चाचणी केली. त्यात त्याला करोना झाल्याचं निप्षन्न झालं.

आणखी वाचा- ब्रिटनहून आलेले पाच करोना पॉझिटिव्ह विमानतळावरूनच झाले फरार; प्रशासनाची धावपळ

२८ वर्षीय युवक इंग्लडवरून परतलेला असल्यानं त्याला विशेष कक्षात दाखल करण्यात आलं आहे. त्याला स्वतंत्र ठेवण्यात आलं असून, त्याचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. चाचणीचा अहवाल आल्यानंतर त्याला कोणता करोना झाला आहे? हे स्पष्ट होणार असलं तरी यामुळे नागपूरमध्ये खळबळ उडाली असून, प्रशासनही खडबडून जागं झालं आहे. दरम्यान, कुटुंबीयांसह त्याच्या संपर्कात आलेल्या १० जणांनाही करोना झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ब्रिटनमधील स्थिती कशी आहे?

लंडन आणि दक्षिण आणि पूर्व इंग्लंडमध्ये करोनाच्या नव्या प्रकाराचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. जेनेटिक कोडचा अभ्यास करणाऱ्या नेक्सस्ट्रेन या संस्थेच्या आकडेवारी असं दिसून येतं की डेन्मार्क आणि ऑस्ट्रेलियामध्येही हा व्हायरस आढळून आला आहे. नेदरलँडमध्येही करोनाच्या नव्या प्रकाराचा संसर्ग झालेले रुग्ण आढळून आले आहेत. दक्षिण आफ्रिकेतही व्हायरसच्या या नव्या प्रकाराशी मिळता जुळता एक व्हायरस आढळून आला आहे. पण, त्याचा ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या व्हायरसशी संबंध नसल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, हा व्हायरसही ब्रिटनमधून आढळून आला आहे. त्यामुळे ब्रिटनमध्ये करोनाच्या नवीन दोन प्रकाराचं संक्रमण वाढताना दिसत आहे.