धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम, नागपूर आणि पालघर या सहा जिल्हा परिषदांतील ८४ सदस्य तर त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांतील १४१ रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी मंगळवारी ६२६ केंद्रांवर मतदान पार पडले आहे. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे ६३ टक्के मतदान झाले. त्यानंतर आज सकाळी १० वाजता मतमोजणी सुरू झाली आहे. पोटनिवडणुकीसाठी रविवारी सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्या होत्या. त्यानंतर सोमवारी दिवसभर अनेक उमेदवारांनी मतदारांच्या वैयक्तिक भेटीगाठी घेण्याचा प्रयत्न केला. या निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात सर्वच प्रमुख पक्षांच्या दिग्गजांनी प्रचारासाठी दौऱ्याचे आयोजन केले होते.

या पोटनिवडणुकीत वणई (डहाणू), नंडोरा- देवाखोप (पालघर) व गारगाव (वाडा) या जागा महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या असल्यामुळे चुरस वाढली आहे. त्यामुळे त्या प्रतिष्ठेचा झाल्या आहेत. भाजपातर्फे सर्व जागांवर उमेदवार रिंगणात आहेत. या पोटनिवडणुकीसाठी जिल्हा परिषदेच्या १५ जागांसाठी ७४ व चार तालुक्यातील पंचायत समितीच्या १४ जागांसाठी ७० उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यात निवडणुकीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून मतदान शांतपणे पार पाडण्यासाठी दक्षता घेण्यात आली.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम, नागपूर आणि पालघर या ६ जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या ३८ पंचायत समित्यांतील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील सदस्यांची पदे रद्द करण्यात आली होती. त्यामुळे या ६ जिल्हा परिषदेच्या ८५ निवडणूक विभागांची आणि पंचायत समित्यांच्या १४४ निर्वाचक गणांतील जागा रिक्त झाल्या होत्या. त्यापैकी धुळे जिल्हा परिषदेच्या एका आणि शिरपूर (जि. धुळे) पंचायत समितीच्या दोन; तर अक्कलकुवा (जि. नंदुरबार) पंचायत समितीच्या एका जागेवरची पोटनिवडणूक बिनविरोध झाली असून उर्वरित जागांसाठी किरकोळ वाद आणि गोंधळाच्या घटना  वगळता शांततेत मतदान झाले. प्राथमिक माहितीनुसार धुळे जिल्हा परिषदेत ६० टक्के तर नंदुरबारमध्ये ६५, अकोला- ६३, वाशीम-६५, नागपूर- ६० आणि पालघर जिल्हा परिषदेमध्ये ६५ टक्के मतदान झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.