बहुतांश कथेतली, गाण्यातली म्हातारी ही जीवनानुभवाने पक्व होते, पण गोड होतेच असं नाही.. स्त्री म्हणून तिच्या वाटय़ाला आलेल्या अनुभवांमुळे, कष्टांमुळे म्हातारी होईपर्यंत तो गोडवा संपत जात असावा का? म्हणूनच कथेत, साहित्यात, म्हातारी नाही पण म्हातारा मात्र गोड समंजस रंगवला जात असावा का?

त्या दिवशी एक आजी आमच्याकडे आल्या होत्या. त्यांच्याबरोबर त्यांचा लहानगा नातू होता. मोठा चंट आणि गोड. एरवी रस्त्यात भेटलं तर नुसतं हसणं होतं. आज घरी आल्या म्हणून चहा केला. आमच्या गप्पा सुरू झाल्या. खरं तर आजींपेक्षा त्यांच्या नातवाशीच गप्पा सुरू होत्या माझ्या. इतका हुशार होता, स्वत:हून बोलत होता. चहा होईपर्यंत त्याला अनेक प्रश्न विचारले. शाळा कुठली? बाई कोण? मित्रांची नावं काय? डबा काय नेतोस? विषय कुठला आवडतो? सगळ्या प्रश्नांची भराभर उत्तरं देत होता.

PMC pune municipal corporation
रस्त्यावर फेकलेल्या कचऱ्यातून पत्ते शोधून दंडाची वसुली; मोटारीतून कचरा फेकणाऱ्यांचा पाठलाग करून महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कारवाई
personality of jacob rothschild
व्यक्तिवेध : जेकब रोथशील्ड
jewellery police pune
पुणे : रिक्षा प्रवासी महिलेचे सात तोळ्यांचे दागिने गहाळ; पाेलिसांच्या प्रयत्नांमुळे दागिन्यांचा शोध
nagpur university vc subhash chaudhari suspends by governor
लोकजागर : ‘चौधरी’ असण्याचा गुन्हा!

मध्येच मला म्हणाला, ‘‘आता मी विचारू तुला प्रश्न?’’

म्हटलं, ‘‘हो विचार ना?’’

‘‘तू मोठेपणी कोण होणार?’’ ..त्यानं विचारलं. अंदाज नसताना अचानक स्टम्पवर चेंडू लागून फलंदाज बाद व्हावा तशी माझी अवस्था झाली. माझ्या प्रश्नांच्या सरबत्तीला फटाफट उत्तरं देणाऱ्या त्याच्या प्रश्नावर मी मात्र नि:शब्द! ‘सौ सुनार कि एक लुहार कि..’ असाच प्रश्न होता त्याचा.. उत्तरादाखल मी फक्त आश्चर्यमिश्रित हसले.

‘‘हसू नकोस ना, सांग ना, कोण होणार तू मोठेपणी?’’ त्यानं पुन्हा विचारलं. आणि झटकन माझ्या तोंडून निघून गेलं, ‘‘म्हातारी’’..

या उत्तरावर त्याची आजी आणि मी खळखळून हसलो. काही वेळाने ते गेले. पण ते उत्तर काही माझ्या मनातून जाईना.. म्हातारी?  बापरे! आणि आत्तापर्यंत भेटलेल्या सगळ्या म्हाताऱ्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या..

म्हणजे लेकीकडे जाईन, तूप रोटी खाईन, जाडीजुडी होईन मग तू मला खा, असं वाघोबाला सांगणारी भोपळ्यातली म्हातारी किंवा पावसाळ्यात आकाशात जात्यावर चणे भरडणारी म्हातारी किंवा मतकरींच्या ‘निमाची निमा’ कथेतली ‘बयो’ एक जख्ख म्हातारी किंवा कॉलेजच्या वर्गात शिकवत असताना शेवरीच्या कापसाची म्हातारी वाऱ्याबरोबर वर्गात उडत आली म्हणून तिच्याकडे बघणाऱ्या मुलांना, ‘ यू यंग बॉईज्, यू हॅव गॉट नथिंग टू डू विथ दिस ओल्ड लेडी’ असं माधवराव पटवर्धनांनी जिच्याबद्दल म्हटलं ती म्हातारी किंवा ‘बुढ्ढी के बाल’मधली गुलाबी केसांची म्हातारी किंवा खोबरं किसताना त्याचा कडेला जमणारी खमंग म्हातारी किंवा सातव्या महिन्यात मुलगी झाली तर तिच्या आईला दिलासा देणाऱ्या म्हणीतली म्हातारी (सातारी म्हातारी ..म्हणजे सातव्या महिन्यात आली तरी म्हातारी होईपर्यंत जगेल तुझी पोर) ..कित्ती म्हाताऱ्या आठवल्या आणि गम्मत म्हणजे माझ्या लहानपणी भेटलेल्या या सगळ्या म्हाताऱ्या अजूनही आहेत..

कॉलेजमध्ये असताना एका नाटकात मी म्हातारीची भूमिका केली होती. केसांना पांढरा रंग, डोळ्याखाली काजळाने काढलेली वर्तुळं, दात पडलेत असं दाखवण्यासाठी पांढऱ्या दातांना फासलेली कोळशाची भुकटी, हातावर सुरकुत्या नाहीत हे कळू नये म्हणून घातलेलं लांब हाताचं ब्लाऊज.. बापरे! काय ती रंगभूषा! त्या वयात वाढलेलं वय दाखवण्यासाठी केलेली रंगभूषा, नंतर वय लपवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या रंगभूषेच्या अगदी उलट.. नंतर वय लपवण्यासाठी पांढऱ्या केसांना काळा रंग, दात आहेत अजून आणि ते ही पांढरे शुभ्र ..त्यासाठी कवळी. तेव्हा सुरकुत्या नाहीत हे दिसू नये म्हणून लांब हाताचं ब्लाऊज आणि नंतर सुरकुत्या आहेत हे दिसू नये म्हणून लांब हाताचं ब्लाऊज ..त्या म्हातारीच्या भूमिकेच्या रंगभूषेनंतर आरशात बघूच नये असं वाटलं होतं. आणि त्याच क्षणी ‘मेघदूता’च्या एका श्लोकातल्या ‘त्रिदशवनिता’ शब्दाचा अर्थ उलगडला होता. कैलास पर्वताचं वर्णन करताना यक्षाने कैलासाला ‘त्रिदशवनितादर्पण’ म्हटलंय. त्रिदशवनिता म्हणजे देवांच्या पत्नी ..त्या आकाशमार्गाने जाता येता पांढऱ्या शुभ्र कैलासात ..जणू आरसा असल्यासारखं आपलं मुख न्याहाळतात.. यातल्या ‘त्रिदश’ ऐवजी कालिदास देवांसाठी असलेले आणि त्या वृत्तात बसणारे इतर शब्दही वापरू शकले असते ..जसं अमरवनिता ..पण त्रिदश हाच शब्द वापरलाय. ‘देवांना तीनच दशा असतात- बाल्य, कौमार्य आणि तारुण्य. त्यांना वार्धक्य नसतं. देवपत्नी म्हातारी होत नाही.. आरशाचा संबंध आल्याबरोबर वार्धक्य नसलेल्या शब्दाचाच उपयोग कालिदासांना करावासा वाटला. किंवा अगदी असाच शब्द परमशिवाच्या सर्जनशक्तीला वापरला जातो.. ‘अजरायोनी’ असं काही काही त्या वेळी सुचू लागलं, मनात आलं म्हातारीच्या नुसत्या रंगभूषेमुळे असे विचार सुचत असावेत.. रंगभूषेने एवढी पक्वता येत असेल तर प्रत्यक्ष त्या वयात किती परिपक्व व्हायला हवं! पक्व शब्द कुठेतरी गोड शब्दाची ही आठवण करून देतो ..पक्व अन्न, पक्व फळ, पिकलेला आंबा कसा रसरशीत, टवटवीत गोड ..तसाच पिकलेला पक्व माणूस ही रसरशीत, टवटवीत, गोड.. खरंच असतो का?

बहुतांश कथेतली, गाण्यातली म्हातारीसुद्धा जीवनानुभवाने पक्व होते, पण गोड होतेच असं नाही.. स्त्री म्हणून तिच्या वाटय़ाला आलेल्या अनुभवांमुळे, कष्टांमुळे म्हातारी होईपर्यंत तो गोडवा संपत जात असावा का? म्हणूनच कथेत, साहित्यात, म्हातारी नाही पण म्हातारा मात्र गोड समंजस रंगवला जात असावा का? बहुतेक नवसासुरवाशिणीचा अनुभव ही तसाच असतो ना. सासू खाष्ट नि सासरा गोड.. पाश्चिमात्य देशात म्हातारीबद्दल एक समजूत आहे. जन्मलेली मुलगी देवाचा अंश आणि मुलगा दानवाचा, पण एकेक वर्ष जसं उलटत जातं तसा दोघांमधला मूळ अंश कमी होत जातो आणि विरुद्ध अंश वाढायला लागतो. बापरे! नकोच ते म्हातारी होणं! मॅसी या ख्यातनाम चित्रकाराचंही एक प्रसिद्ध चित्र आहे. त्याचं शीर्षक आहे- ‘अग्ली डचेस-ओल्ड वूमन’ मनात येतं.. कुरुपपण दाखवण्यासाठी म्हातारीचंच चित्र का, या प्रश्नाचं उत्तर मॅसीलाच ठाऊक!

पण गंमत अशी की हीच म्हातारी जेव्हा आपल्या आजीच्या रूपात आपण पाहतो तेव्हा किती सुंदर, गोड, प्रेमळ असते! ग्रीमच्या परीकथेतल्या बहुतेक म्हाताऱ्या राजकुमाराला शाप देणाऱ्या, दुष्ट.. कथा ऐकताना त्या म्हातारीची भीती वाटते म्हणून नात कुशीत शिरते म्हाताऱ्या आजीच्याच ना.. कधी वाटतं, या कथा पुरुषांनी लिहिल्यात किंवा तरुण वयात लिहिल्यात म्हणून म्हातारी अशी रंगवली असेल का? खऱ्या म्हातारीने त्या लिहिल्या तर ती त्यातली म्हातारी अशीच चितारेल का? नक्कीच नाही.. म्हणी, गाणी, कथा, वाणी यातून तिच्यावर झालेल्या अन्यायावर ती उतारा शोधेल, न्याय मिळवून देईल. तिच्या अनुभवाचा जगाला उपयोग करून देईल, मुरलेल्या लोणच्याप्रमाणे तिच्या वागण्या-बोलण्याला चव येईल, तरुण राजकुमाराला अंधाऱ्या कोठडीत बंद करून किल्ली स्वत:कडे ठेवणार नाही तर तरुणाला विचाराचा प्रकाश दाखवत योग्य दाराची किल्ली देईल, तिच्या चेहऱ्यावर पिकलेपणातून आलेलं सात्त्विक सौंदर्य तरळत असेल, म्हातारपण म्हणजे टवटवीत परिपक्वता अशी व्याख्या कदाचित ती करेल..

मोठेपणी जे व्हायचं असतं त्याची तयारी लहानवयातच करावी लागते तसं टवटवीत पक्व होण्याची तयारी आत्ताच करायला हवी, ओल्ड वाईल यंग अ‍ॅण्ड यंग वाईल ओल्ड म्हणजे मग मोठेपणी कोण होणार, असा प्रश्न पुन्हा कोणी विचारला तर उत्तर फक्त, म्हातारी असं न देता ‘टवटवीत पक्व म्हातारी’ असं देता येईल..

धनश्री लेले – dhanashreelele01@gmail.com