28 January 2020

News Flash

सहज भाव

ओशो कम्युन’मध्ये नवीन आलेल्या मंडळींसाठी ध्यानप्रक्रियेपूर्वी एक नाचण्याचं सत्र असतं.

सह-ज.. जे आपल्यासह जन्माला आलं ते सहज. या अर्थाने कला सह-ज असते, म्हणून तर कला ही बाहेरून आत नाही, तर आतून बाहेर येते, असं सुंदर वाक्य ‘कटय़ार..’ नाटकात येतं. जे आपल्यासह जन्माला येतं, म्हणजे ते खरं तर किती सोपं असेल, पण सहज वागणं, बोलणं, जगणं सोपं नाही, सहज सोपं नाही. आपण ते अवघड करून ठेवलंय का?

‘सहज फुलू द्यावे फूल सहज दरवळावा गंध’.. शांताबाई शेळके यांची ही ओळ गेले दोन दिवस सतत मनात भिरभिरतेय.. कारण? हाती आलेली सोनटक्कय़ाची जुडी. खरं तर ती जुडी फुलांची नाही, तर न उमललेल्या कळ्यांची आहे. सोनटक्का हे नुसत्या वासाने आपली खूण पटवून देणारं फूल; पण इतकी फुलं एकत्र असूनही तो सुगंध येत नव्हता.. शेवटी न राहवून एक अर्धवट फुललेली कळी हातात घेऊन तिची एकेक पाकळी उमलवायला लागले.. नि ही ओळ मनात नाचू लागली ..सहज फुलू द्यावे फूल.. मनात आलं, माणूस नसता तर ही ओळ म्हणावीच लागली नसती, कारण माणूस सोडल्यास बाकी निसर्गातले घटक हे सहजच वागतात.. फूल नेहमीच सहज फुलतं, फुलणं हाच त्याचा धर्म आहे.. फुलायचं आणि सुगंधाने दरवळायचं.. एका शायरने म्हटल्यासारखं..

फूलोंसे बस एक ही उम्मीद रहती है कि वो महके..

ही फुलण्यातली सहजता किंवा हे सहजतेनं फुलणं निसर्गात आहे.. पण माणसाला मात्र ‘सहज फुलू द्यावे फूल’ असं सांगावं लागतं.. सहज फुलू देणं किंवा सहज फुलणं आपण विसरत चाललो आहोत का? फुलणं, फुलू देणं नंतरचं आहे, आधी सहज या शब्दापर्यंत आपल्याला पोहोचायचंय. सहज हा शब्द फार महत्त्वाचा. आपली सहजता गेली कुठे?

‘ओशो कम्युन’मध्ये नवीन आलेल्या मंडळींसाठी ध्यानप्रक्रियेपूर्वी एक नाचण्याचं सत्र असतं. सुरुवातीला गाणं, संगीत सुरू झालं तरी कोणी पाय उचलत नाही, हात हलवत नाही.. ‘असं अनोळखी चारचौघात कसं नाचायचं?’ हा विचार सगळ्यांच्याच मनात असतो म्हणजे.. अनेक चौकटींत जगणाऱ्या भारतीयांच्या मनात तर असतोच, पण त्यामानाने मुक्त वातावरणात राहणाऱ्या पाश्चिमात्यांच्या मनातही असतो. त्यामुळे सगळे अवघडलेले. मग त्या सत्राचा प्रशिक्षक एक गोष्ट आपल्या लक्षात आणून देतो.. ती म्हणजे.. ‘इथे कुणालाच तुमचं नाव माहीत नाहीये, तुम्ही कुठून आलात? काय करता? हुद्दा काय? स्वभाव कसा? हे कोणालाच माहीत नाहीये, मग तुम्ही कोणत्या चौकटीत स्वत:ला अडकवून ठेवलंय? तुम्हाला कोणी काही म्हणणार नाहीये, तुम्हाला कोणी काही विचारणार नाहीये. सगळ्या चौकटी ओलांडून बाहेर पडा.’ हळूहळू एकेक जण त्या संगीताशी, गाण्याशी समरस व्हायला लागतो. इतरांकडे तर नाहीच, पण स्वत:कडेही न बघता तो नाचायला लागतो, अगदी मनापासून.. जसं येईल तसं.. लहान मुलासारखं उत्स्फूर्त आणि सहज!

ही सहजता एरवी कुठे जाते? नानाविध चिंतांची, विचारांची ओझी, अभिमान-अहंकार यांची गाठोडी डोक्यावर ठेवून वावरत असतो आपण. ही गाठोडी, ओझी उतरवताही येतील, पण आपण आणि इतरांनी मिळून आपली स्वत:ची जी प्रतिमा तयार केलेली असते ती मनातून उतरवता येत नाही. ‘तुझं आहे तुजपाशी’ नाटकात गीता म्हणते तसं. ‘..उंटाने नेहमी तिरकंच चालायचं, घोडय़ाने अडीच घरच जायचं..’ अशा आपल्याही प्रतिमा आपण तयार करून ठेवल्या आहेत. अशा प्रतिमांमध्येच वावरलो तर सहजता कशी येणार? सुप्रसिद्ध गायिका ज्योत्स्ना भोळे यांचा या बाबतीतला एक किस्सा फारच बोलका आहे. ज्योत्स्नाबाईंची नाटकं तुफान गाजत होती, चाहतावर्ग वाढत होता. एक दिवस त्यांना भेटण्यासाठी त्यांचा एक चाहता सकाळीच त्यांच्या घरी गेला. ज्योत्स्नाबाई घरातली कामं करत होत्या. कणीक भिजवता भिजवताच त्या बाहेर आल्या. त्यांना तसं बघून त्या चाहत्याने विचारलं, ‘‘तुम्ही हे पण करता?’’ ज्योत्स्नाबाई म्हणाल्या, ‘‘अहो, ती बिंबा नाटकात, घरच्या गोष्टीत बिम्बेचं प्रतिबिंब पडून कसं चालेल?’’ रसिकांनी नाटय़ अभिनेत्रीची एक प्रतिमा त्यांच्या मनात तयार केली असली तरी ज्योत्स्नाबाईंनी स्वत:बद्दल कुठलीही प्रतिमा मनात तयार न केल्याने त्यांच्या वागण्या-बोलण्यात ती सहजता होती.

या सहजतेची गोडी काय वर्णावी? भा. रा. तांबे यांच्या एका कवितेत त्यांनी ती फार सुंदर रेखाटली आहे. कवितेचं शीर्षकच मुळी ‘सहज तुझी हालचाल’ असं आहे..

सहज चालणेहि तुझे, सहज बोलणेहि तुझे,

सहज पाहणेहि तुझे, मोहिनी मज घालते..

सहज तुझी हालचाल मंत्रे जणू मोहिते..

सहजतेतलं सौंदर्यच वेगळं.. गायक जेव्हा गात असतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर गाताना त्याला प्रचंड कष्ट होतायत असा भाव असेल तर ते गाणं मनाला भिडत नाही; पण जेव्हा एखादा गायक, वादक सहज आपली कला पेश करतोय असं दिसलं, की ते मनाला भिडतं, भावतं. कारण कुठलीही कला ही सहज असते.

मुळात सहज म्हणजे काय? तो शब्द आपण अनेकदा सहज वापरत असलो तरी तो इतका सहज घेऊन चालणार नाही. सह-ज ..जे आपल्यासह जन्माला आलं ते सहज. या अर्थाने कला सह-ज असते, म्हणून तर, कला ही बाहेरून आत नाही, तर आतून बाहेर येते, असं सुंदर वाक्य ‘कटय़ार काळजात घुसली.’ या नाटकात येतं. जे आपल्यासह जन्माला येतं, म्हणजे ते खरं तर किती सोपं असेल, पण सहज वागणं, बोलणं, जगणं सोपं नाही, सहज सोपं नाही. आपण ते अवघड करून ठेवलंय का? हो नक्कीच. जेव्हा एखादं फूल फुलतं तेव्हा ‘मला कुणी बघतंय का? माझ्यात फुलण्याजोगं काही आहे का? माझा रंग, गंध इतरांना आवडेल का? इतर फुलांपेक्षा मी खूपच लहान आहे का? माझं फुलणं इतर फुलांना कळेल का? असे जे प्रश्न आपल्याला पडतात तसे त्या फुलणाऱ्या फुलाला पडत नाहीत आणि म्हणून ते सहज फुलतं. लहान-मोठं, रंगीबेरंगी, सुवासिक-गंधहीन असे भेद त्या फुलांना कळत नाहीत, भेद नाही, स्पर्धा नाही, श्रेष्ठ-कनिष्ठ भाव नाही, म्हणून फुलणं सहज आहे, म्हणून साधं रंग-गंधहीन तगरीचं फूलही सहज फुलतं, न संकोचता. कवी ह.स. गोखले म्हणतात तसं-

फूल तगरीचे सर्वगुणी साधे,

दृष्टी पडता सहज जे चित्त वेधे

रूप नखऱ्याविण रुचिर कसे पाही,

डौल नसूनी बेडौल मुळी नाही..

याच विषयावर मार्मिकपणे आपल्याला चिमटा काढणारी रवींद्रनाथ टागोरांचीही एक कणिका आहे.

‘एकदा वनात आंबा एका कडू फळाच्या झाडाला म्हणाला, खरं तर आपण सगळे सारखेच. पण माणूस या जंगलात आला नि भेद सुरू झाला, साम्यावर बोळा फिरला..’

आपण भेद, स्पर्धा, मतमतांतर, अभिमान, माझं तेच खरं, लोक काय म्हणतील, अशा विचारांनी ग्रासलेले.. स्वत:त डोकावून बघण्यापेक्षा इतरांकडे नजर लावून बसलेले, म्हणूनही असेल, सहजता आपल्यापासून लांब राहते. कधी तरी आत डोकावून बघायला हवं, माझ्यासह काय काय जन्माला आलं ते शोधायला हवं, माझी सह-जता नेमकी आहे कशात, हा विचार करायला हवा. मी कशी आहे खरी? आणि मी धारण केलेले मुखवटे काय काय आहेत? याचा विचार केला तर हरवलेल्या सहजतेचा माग काढता येईल. ती सहजता आपल्या प्रत्येक क्रियेत डोकावेल.. आपलं फुलणंही फुलाइतकं सहज होईल, किंबहुना सहजता आली की फुलणं आपोआप सुरू होतं.. आपणच आपल्यावरती लादलेल्या चौकटी नाहीत, ओझी नाहीत.. सगळं सहज..

ही अशी सहज स्थिती परमार्थातही फार महत्त्वाची मानलीय.. ‘साधो सहज समाधी भली’.. ध्यान समाधी सहज लागली नाही तर काय उपयोग? म्हणूनच ध्यानासाठी ‘लागणे’ हे क्रियापद वापरतात, ‘लावणे’ वापरत नाहीत. लागण्यात सहजता आहे, लावण्यात नाही.. ही सहजता आपल्याला जन्मजात असते. लहान वयात ती दिसत असते, मोठेपणी आपणच ती झाकून ठेवतो. टागोरांनीच म्हटलं होतं, ‘लहान वयात व्यक्त होणारी सहजता सांभाळणं हे कौशल्याचं काम. ते पालकांनी, घरातल्या मंडळींनी, शिक्षकांनी मोठय़ा खुबीने करायला हवं.. मुलाचं मूलपण सांभाळायला हवं.. त्याला मोठं करण्याची घाई करण्यापेक्षा त्याला यथावकाश त्याच्या शक्तीने फुलू द्यावं.’

सहज फुलू द्यावे मूल..

हे काम टागोरांनी फार सुंदर केलं. अगदी लहान मूल शाळा शिकतं तेव्हा धडे, पुस्तकं हे त्याच्या

सह-ज भावनेशी, वयाशी मिळतंजुळतं असायला हवं. म्हणून त्यांनी स्वत: छोटय़ा मुलांसाठी धडे लिहून काढले.. त्यांना नावं दिलं ‘सहजपाठ’ ज्यात भाषेचा आकार, उकार, इकार शिकवला जाईल, ज्यात एक गोष्ट असेल, ज्यात त्यांच्याच वयाची मुलं असतील, ज्यात निसर्गाचं वर्णन असेल आणि ज्यात.. ‘सात दिन छुटी, तीन भाई मिले खेला होबे..’ असा त्यांच्या सह-ज भावनेचा हुंकार असेल..

‘सहज’ या शब्दाचा विचार खरं तर आणखीही विविध कोनांतून करता येईल.. पण तरीही इति लेखनसीमा.. कारण जो नियम फुलाला, मुलाला, तोच लिहिण्यालाही.. सहज फुलू द्यावे..

धनश्री लेले dhanashreelele01@gmail.com

First Published on February 11, 2017 12:58 am

Web Title: easily the most important word
Next Stories
1 पक्व
2 ‘स्व’त्व!
Just Now!
X