News Flash

जरी भासते स्थिर तरी अंतरी काहूर

जावेद अख्तर म्हणतात तसं.. सरोवरात पोहणारी बदकं किती शांत वाटतात..

जावेद अख्तर म्हणतात तसं.. सरोवरात पोहणारी बदकं किती शांत वाटतात.. ‘पुर-सुकूँ लगती है कितनी झील के पानी पे बत’, पण तसं नसतं.. ‘पैरों की बेताबियाँ पानी के अंदर देखिये..’ त्या बदकांच्या पायांची धडपड पाण्याच्या आत डोकावल्यावरच कळते.. तसंच आपलं वरवर शांत वाटणारं मन आत हुरहुरलेलं असतं.. कसली तरी तगमग असते.. ‘जरी भासते स्थिर तरी अंतरी काहूर, कशी लागे हुरहुर जीवघेणी..’ अशा वेळी वाटतं, कुणी काही विचारू नये, कुणाशी काही बोलू नये..

संध्याकाळची वेळ.. सूर्य अस्ताला निघालाय.. समुद्रकिनाऱ्यावर सगळीकडे चहलपहल.. लोक खेळतायत, खिदळतायत, हसतायत, समुद्राच्या लाटा अंगावर घेतायत.. मुलं वाळूचे किल्ले बनवतायत.. कुणी घोडागाडीत बसलाय, कुणी भेळ खातोय, कुणी फुगे उडवतायेत.. मीपण तिथेच बसलेय.. त्यांच्यातच आहे.. पण तरीही त्यांच्यापासून दूर.. कारण मला यातलं काही करावंसं वाटत नाहीये.. येणाऱ्या प्रत्येक लाटेकडे मी पाहतेय, पण त्यामुळे माझ्या मनात एकही उत्साहाची लाट उसळत नाहीये..

हळूहळू खळबळ करीत लाटा

येऊनि पुळणीवर ओसरती

जणू जगाची जीवनस्वप्ने

स्फुरती फुलती फुटती विरती..

कुसुमाग्रजांच्या ओळी आहेत डोळ्यांसमोर ..पण ती कविता आत्ता म्हणावीशी वाटत नाहीये..

क्षितिजावर दीपांकित तारू..

चाले पश्चिम दिशेस धूसर..

ते जहाज मी पाहतेय, पण ते कुठं बरं चाललं असेल? आणि काय बरं असेल त्याच्या पोटात.. असं नेहमीचं कुतूहल माझ्या मनात येत नाहीये.. कळत नाही काय होतंय.. कशातच रस वाटत नाहीये.. ओठांवर अलगद शब्द येतायत..

आत मनाच्या तळाशी मिट्ट काळोख

खोल कसे वाटते फोल सर्व काही

असं होतं ना?.. सगळ्यांमध्ये असूनही आपण तिथे नसतो.. आपल्याला अवतीभवतीची प्रत्येक गोष्ट कळत असते; पण त्यात रमावं, त्यात सामील व्हावं असं नाही वाटत.. आपण गप्प होऊन जातो.. आपले आपण.. अगदी एकटे..

कशावर काही प्रतिक्रिया द्यावी असंही वाटत नाही. सगळ्यांमध्ये असून कुणामध्येच नाही.

करीशी एकांती गर्दी.. एकांतही जनसंमर्दी..

गोविंदाग्रजांनी या ओळी अशाच स्थितीत लिहिल्या असतील का? अशा वेळी.. आपण एकटे असण्यासारखा आनंद नाही.. दुसरं कुणी असूही नये बरोबर आणि असलं तर आपली अवस्था समजून आपल्याला वेळ आणि एकांत देण्याएवढं उदारचित्त असावं. नाही तर त्या व्यक्तीला नेमका तेव्हा बोलायला उत्साह येतो ..आणि मन, इच्छा नसताना आपल्यालाही स्वरात स्वर मिसळावा लागतो. अगदी पूर्ण वाक्य नाही तरी ‘हो का?’ ‘अस्सं’ ‘अरे वा!’ अशी उद्गारवाचकं तरी उद्गारावीच लागतात.. म्हणून अशा वेळेला खरं तर कोणीही नको बरोबर. गंमत असते या स्थितीची ही! किती शांत वाटतं.. म्हणजे आपण शांत झालोयत.. असं वरवर वाटतं.. अगदी हीच शांतता जणू हवीय आपल्याला असंही वाटू लागतं ..मग थोडा वेळ गेला की लक्षात येतं, ही वादळापूर्वीची शांतता आहे. आंतर में खलबलीच्या आधीची ही शांतता आहे..

जावेद अख्तर म्हणतात तसं.. सरोवरात पोहणारी बदकं किती शांत वाटतात.. किती सुकून वाटतो त्यांच्या पोहण्यात.. कसली धडपड नाही, तगमग नाही.. अगदी शांत.. पण तसं असतं? नाही ..

‘पुर-सुकूँ लगती है कितनी झील के पानी पे बत

पैरों की बेताबियाँ पानी के अंदर देखिये..’

त्या बदकांच्या पायांची धडपड, तगमग पाण्याच्या आत डोकावल्यावरच कळते.. तसच वरवर शांत वाटणारं आपलं मन आत हुरहुरलेलं असतं.. कसली तरी तगमग असते.. मग कुठली तरी एखादी छोटीशी गोष्ट आठवते.. आणि डोळे भरायला लागतात.. खरं तर ती गोष्ट विचारात घ्यावी इतकीही महत्त्वाची नसते, पण डोळे भरायला ती तात्कालिक कारण म्हणून पुरते.. मग आठवणी, विचार, भावना, जवळच्या व्यक्तींची उणीव, सोडून द्यावी लागलेली स्वप्नं, झालेले अपेक्षाभंग, कुणी कधी काळी केलेले अपमान, आपल्या हातून घडलेल्या काही चुकांची बोच.. असं काहीही.. एकामागोमाग एक समोर यायला लागतं आणि डोळ्यांतून गंगायमुना पाझरायला लागतात.. जणू आठवणींचे कोशच अश्रूंतून व्हायला लागतात..

जरी भासते स्थिर तरी अंतरी काहूर

कशी लागे हुरहुर जीवघेणी..

अशा वेळी कुणी काही विचारू नये, कुणाशी काही बोलू नये असं वाटतं, कारण त्या गलबलण्याच्या मागे काही ठोस कारण असतंच असं नाही.. मुळात कळतच नाही आपल्याला काय होतंय.. त्यामुळे आपण दुसऱ्याला सांगणार तरी काय.. आणि काही वेळा मनाच्या इतक्या तळातल्या गोष्टी उसळी मारून वर येतात की, त्या कोणाला सांगताही येत नाही.. बरं ऐकणारी व्यक्ती आपल्याला समजून घेणारी, पाश्र्वभूमी माहीत असणारी असली तर ठीक, नाही तर मग कबीरजी म्हणतात तसं, ऐसा कोई ना मिला जासू कहु नि:संक

जासू हिरदा कि कहु वो फिर मारे डंख..

आपला अचानक ढळलेला तोल सावरणारी समोरची व्यक्ती.. ही विवेकीच असायला हवी.. संवेदनशील हवी.. असं होऊ  शकतं हे मानणारी हवी. तो उमाळा संपेपर्यंत धीर धरणारी हवी.. आणि मुख्य म्हणजे या अचानक आलेल्या रडण्यामागचं कारण न विचारणारी हवी.. हे एवढं सगळं एका व्यक्तीत सापडणं अवघड. त्यात त्या व्यक्तीने काही गैरसमज करून घेतला तर ते अचानक स्फुरलेलं रडणं अधिकच क्लेशकारक.. त्यापेक्षा.. आत्मैव आत्मनो बंधु: हेच खरं.. आपण आपल्यापाशीच मोकळं व्हावं.. आत्मसंवाद करावा.. आपण आपल्याशी मोकळं होतो तेव्हा प्रामाणिक असतो, खरे असतो.. दुसऱ्यापाशी व्यक्त होतानाही आपण आपली एक प्रतिमा सांभाळत असतो.. स्वत:शी मोकळं होताना ती सांभाळण्याची गरज नसते.. राग, लोभ, भीती, मत्सर.. ज्या काही भावना येत असतील त्या न लपवता आहेत तशा खुलेपणाने आपण आपल्यापाशी व्यक्त करू शकतो.. त्यामुळे मन हलकं होतं, कसल्या कसल्या गोष्टींचे भार जपलेले असतात ते मोकळे होतात, कुणाबद्दल राग आला असेल तर तो वाहून जातो.. निचरा होऊन जातो साचलेल्याचा.. आणि मुख्य म्हणजे जेव्हा आपण दुसऱ्यापाशी मोकळं होत असतो तेव्हा आपल्याला त्याची सहानुभूती हवी असते.. ‘‘हो गं’’, ‘‘खरंच गं’’, ‘‘तू म्हणून सहन केलंस गं’’ अशा प्रोत्साहनपर वाक्यांची गरज असते.. स्वत:शी मोकळं होताना या वाक्यांची गरजच येत नाही.. किंबहुना भर ओसरल्यानंतर आपण त्रयस्थपणे, तटस्थपणे स्वत:कडे पाहू शकतो.. पाहायला हवं.. कधी प्रेमाने, अंजारत गोंजारत स्वत:तली सहनशक्ती वाढवायला हवी, तर कधी शिस्तीची काल्पनिक छडी घेऊन स्वत:च्या चुका, दोषही पाहायला हवेत.. आत्मनिवेदन.. आत्मसंवाद.. आत्मपरीक्षण..

किती तरी वेळ मी एकटीच अशा स्थितीत किनाऱ्यावरती बसून आहे.. पुष्कळ पाणी वाहून गेलंय.. डोळ्यांतून.. म्हणूनच असेल.. मगाशी भवतालाशी मिटलेलं नातं आता पुन्हा जागं झालंय.. भरून आलेल्या डोळ्यांमुळे पश्चिम क्षितिजाचा लालिमा मगाशी दिसत नव्हता तो आता दिसायला लागलाय.. पश्चिमेकडे निघालेलं ते जहाज निघून गेलंय आणि दुसऱ्या जहाजाने त्याची जागा घेतलीय.. मगाशी अस्ताला जाणारा सूर्य आता दिसेनासा झालाय. अवतीभोवती अंधार वेढायला लागला असला तरी माझं मन मात्र स्वच्छ झालंय.. उजळलंय.. मगाशी मनाच्या तळाशी दाटलेला मिट्ट काळोख निघून गेलाय आणि त्याची जागा..

‘ओठावरी राहो नित्य उत्साहाचे गान

देई प्रकाशाचे दान अंधारात’ या शब्दांनी घेतलीय.

धनश्री लेले

dhanashreelele01@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2017 1:22 am

Web Title: kathakathan by dhanashree lele part 2
Next Stories
1 तक्रार
2 इच्छापूर्ती
3 प्रेम केले..
Just Now!
X