03 August 2020

News Flash

भय इथले..

ही भीतीची भावना नेमकी शिरते कधी मनात? कुठल्या वयात?

‘‘आई तू ये ना, भीती वाटतेय..’’ रात्री सगळे गाढ झोपले असताना स्वयंपाकघरात एकटीने जाण्याचा प्रसंग आला की, मधल्या दोन्ही खोल्यांतले दिवे लावत लावत लहानपणी दबक्या आवाजात आईला हाक मारली जायचीच. दिवसभर त्याच खोल्यांमध्ये खेळलेलो, वावरलेलो असूनसुद्धा रात्री मात्र भीती वाटायची.. आपलंच घर आहे, दाराला बाबांनी व्यवस्थित कडी लावलेली आहे.. हे सगळं माहीत असायचं तरीही रात्री अंधारात एकटीने दुसऱ्या खोलीत जायची भीती वाटायची मला. बरं साधं तीन खोल्यांचं घर, तो काही राजप्रासाद नव्हता मोठमोठी दालनं, महाल असायला.. नुसतं कुजबुजलं तरी पलीकडे आवाज जायचा.. तरीही भीती वाटायची..

ही भीतीची भावना नेमकी शिरते कधी मनात? कुठल्या वयात?

माझी आजी तिच्या लहानपणाबद्दल सांगताना नेहमी तो किस्सा सांगायची.. की आजी तान्हंबाळ असताना तिच्या आईने तिला दुपटय़ावर ठेवलं आणि काही तरी कामासाठी ती स्वयंपाक घरात गेली, बाहेर येऊन पाहते तो त्या बाळा शेजारी एक मोठा नाग होता.. आणि ते बाळ आपल्या निसर्गसुलभ वागण्यानुसार हात-पाय हलवत, हसत त्याच्याकडे एकटक पाहत होतं..

इतक्या लहान मुलांच्या मनात भीतीची भावना नसते. पण हेच बाळ थोडं मोठं होतं तेव्हा साधा मुंगळा, मोठी माशी, छतावरची पाल बघून किती घाबरतं. वास्तवाचं भान यायला लागल्यावर मग भीतीची भावना जागृत व्हायला लागते का? नेमकी कधी शिरते ही भीती आपल्या मनात? की आपण जन्माला येतानाच भीतीची भावना बरोबर आणतो? किती प्रश्न पडतात ना भीतीबाबत? या प्रश्नांची उत्तरं मानसशास्त्रज्ञच देऊ शकतील, पण कळायला लागल्यापासून भीतीच्या भावनेचा आपल्या मनात शिरकाव होतो हे नक्की आणि ती बऱ्याचदा शेवटपर्यंत साथीला असते. एकनाथ तर म्हणतात, शेवट या शब्दाचीच तर खरी भीती असते.

लहानपणी चारचौघांत बोलण्याची भीती वाटते तर म्हातारपणी बोलायला चारचौघं तरी आपल्याबरोबर असतील की नाही या विचाराने भीती वाटते. वयानुसार, अनुभवानुसार, प्रसंगानुसार भीतीची कारणं बदलत जातात पण भीतीची भावना मात्र अधूनमधून डोकावत राहतेच. भय इथले संपत नाही..

काही अभ्यासकांनी म्हटलंय, भीती ही विकासामागची प्रेरणाही असू शकते. माणूस अनेक गोष्टी भीतीपोटी करतो. चांगले गुण मिळावेत या इच्छेने अभ्यास करणारी मंडळी जशी असतात तशी आपल्याला एकटय़ालाच वर्गात पेपर सोडवता आला नाही तर.. या भीतीनेही अभ्यास करणारी मुलं असतात. भविष्याच्या भीतीने माणूस अधिक प्रयत्नशील होतो. स्थान, सत्ता, पद, पैसा, नावलौकिक उद्या टिकेल ना? ही भीतीही अनेकांना ग्रासून टाकते. या भीतीतून सुरू होते ती हे सारं टिकवण्यासाठीची धडपड. संन्यासी मंडळी निर्भय असण्यामागचं हेही एक कारण आहे. ज्यांनी सगळंच त्यागलंय त्यांना कसली भीती? घरात तिजोरी असली तर चोरीची भीती. संन्यासी मंडळींचं जाऊ दे. ते काही आपल्याला जमणारं नाही. आपल्याला सगळं मिळवत, सांभाळतच जगायचंय. त्यामुळे कसली ना तरी कसली भीती आपल्या मनात असणारच. त्याला भीती म्हणा, चिंता म्हणा, काळजी म्हणा.. परीक्षेला जाण्यापूर्वी थोडीशी भीती वाटणारच, मोठी झेप घेताना, जमिनीवरचे पाय सोडताना थोडी भीती असणारच.. काळोख्या रात्री, अनोळखी प्रदेशात एकटय़ाने वावरताना भीतीने हृदयाची धडधड वाढणारच. धडधड वाढवण्याएवढी भीती स आहे, पण हृदय बंद पाडणारी भीती नको..

भीती वाटली तरी त्या भीतीवर मात करण्याची शक्ती आपल्यात आहे हे विसरता कामा नये. तेवढा स्वत:वरती विश्वास असेल तर उत्तम नाहीतर ‘रामरक्षा’ हाताशी असतेच. भीती वाटली की ‘राम राम राम राम’ म्हणायचं हे लहानपणीच कळलेलं असतं. त्याच वयात वाल्याकोळी आणि नारद ही गोष्टही वाचलेली असते. त्यातला मरा मरा म्हणणारा वाल्या कोळी आपल्या लक्षात राहतो पण आपल्या निर्भयत्वाने त्याच ‘मरा’चं रामनामात रूपांतर करून वाल्याचा वाल्मीकी करणाऱ्या नारदांचं निर्भयत्व मात्र आपण अलगद विसरून जातो.. खलत्वाला निर्भयत्वानेच जिंकता येतं.

रवींद्रनाथांचा एक प्रसंग फार बोलका आहे. लहान होते रवींद्र, त्यांच्या वडिलांबरोबर प्रवासाला निघाले होते.. पायी.. एके  ठिकाणी त्यांचा मुक्काम होता. तिथल्या एका सप्तपर्णीच्या झाडाखाली रवींद्रांचे वडील महर्षी देवेंद्रनाथ ध्यानाला बसले. ते झाड म्हणजे दरोडेखोरांच्या वाटमारीचं ठिकाण होतं. दरोडेखोरांना पाहून देवेंद्रनाथ अजिबात घाबरले नाहीत उलट त्यांच्या चेहऱ्यावरची निश्चलता पाहून दरोडेखोरच भांबावले. हळूहळू दरोडेखोरांना वाटणारी भीती कमी झाली ते या महर्षीच्या जवळ बसून आपली सुखदु:खं सांगू लागले. दरोडेखोरांच्या वृत्तीतही बदल झाला. त्याच परिसरात मोठेपणी रवींद्रांनी शाळा सुरू करण्याचं ठरवलं. कारण उपनिषदातल्या ‘मा भैषी:’ (भिऊ नकोस) या वाक्याची प्रत्यक्ष साधना त्या ठिकाणी रवींद्रांनी पहिली. शिक्षण हे निर्भयत्वाच्या पायावर उभं राहायला हवं आणि निर्भयत्व शिकवणारंच हवं. हा त्यांचा विचार होता. भीतीशिवाय मन, ही अशी अवस्था कधी तरी प्राप्त होईल का आपल्याला?

भिऊ नको मैने भय पाचवीला पूजलं

हाती गं धीराचं शस्त्र माउलीनं दीधलं..

पाठवणीच्या वेळेला आपल्या लाडक्या लेकीला भिऊ नको सांगणारी ही निरक्षर मालन किती सुज्ञ आहे, भीतीसाठीचं शस्त्र धीर. धीर म्हणजे धैर्यही आणि धीरजही.. म्हणजे शांत राहण्याची, वाट बघण्याची शक्ती. बऱ्याचदा भय हे केवळ कल्पनेतून निर्माण होतं, संकट येण्यापूर्वीच आपल्याला त्याची भीती वाटायला लागते. त्याचा विचार करून उपाययोजना काय करता येईल याचा विचार जरूर करावा पण, आधीच हातपाय गाळून कसं चालेल. त्यामुळे तो प्रसंग येईपर्यंत धीरज आणि आल्यावर धैर्य असं ते शस्त्र वापरावं. काही वेळा तर प्रसंग आल्यावर माणूस जास्त खंबीर होतो तर काही वेळा प्रसंग येऊन गेल्यावर. ‘छे जेवढी भीती वाटली तेवढं काहीच नव्हतं,’ असं ही वाटून जातं, म्हणूनच धीर धरणं उत्तम. रामदास स्वामी हेच सांगतात ना.. सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्प धारिष्टय़ पाहे.. म्हणून भय वाटलं तरी उभं राहावंच. भय समोर आलं की दोन मार्ग असतात. फाइट ऑर फ्लाइट – लढा किंवा पळा, पण एकदा भयाला पाठ दाखवली की भय आपली पाठ सोडत नाही. भित्यापाठी ब्रह्मराक्षस, म्हणून कधी तरी संपूर्ण शक्ती एकवटून ठामपणे उभं राहावंच लागतं. आणि एकदा भयाला सामोरं जाण्याची शक्ती आपल्यात आहे याची जाणीव झाली की निर्भयत्वाची दिशा सापडते. भय हीसुद्धा भावनाच आणि आपल्यात शक्ती आहे या विचाराने निर्माण झालेला धीर हीसुद्धा भावनाच. आपल्याच दोन्ही भावना, म्हणून आपणच आपल्याला उभारी द्यायला हवी.. आणि दुसरं कोणी जर भीतिग्रस्त असेल तर त्यालाही धीर द्यायला हवा. काही मंडळींना इतरांना घाबरवण्यातच आनंद मिळतो. म्हणजे गोष्ट छोटीशी असली तरी ती इतकी मीठ मसाला लावून सांगतात की, ऐकणाऱ्याच्या हृदयाचा ठोका चुकलाच समजावा किंवा एखाद्या गोष्टीची भीती आयुष्यभरासाठी त्याच्या मनात निर्माण झालीच म्हणून समजावी.

आपल्या संस्कृतीने ‘अभयदान’ ही महत्त्वाची गोष्ट मानलीय. भगवंताचा एक हात वर किंवा अभय देणारा असतो, असं मानलं जातं. गीतेत १६व्या अध्यायात दैवीगुणांची यादी सांगताना अग्रस्थानी मान मिळालाय तो ‘अभय’ या गुणाला. अर्थात तिथे तो आध्यात्मिक संदर्भात वापरला असला तरी अभयच अग्रस्थानाचा मानकरी आहे. कारण चित्त भयमुक्त असेल तरच माणसाच्या स्वतंत्र विचारांचं कमळ फुलतं. भयमुक्त माणूसच खरी प्रगती करू शकतो, भयमुक्त देशच खऱ्या अर्थाने सर्वागीण विकासाला पात्र ठरू शकतो. जीझसच्या तोंडी एक सुंदर वाक्य आहे.. ‘सकाळी फुलणारी फुलं संध्याकाळी कोमेजतात, पण त्या कोमेजण्याचं भय न बाळगता ती पूर्णत्वाने फुलतात, आनंदाने वाऱ्यावर डोलतात. माणसानं तसं जगावं.’ आता कोणी म्हणेल की, फुलांना या कशाचंच ज्ञान-भान नसतं. पण माणसाला ते असतं म्हणून भयही असतं.

अगदी खरं, पण रात्री अंधारात दुसऱ्या खोलीत जाताना आई आपल्या मागे आहे या विचाराने जसं भय पळून जातं तसं कुठल्याही सत्शक्तीवरचा विश्वास मनातलं भय दूर सारू शकतं. ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’.. आपला विश्वास मात्र दृढ हवा..

धनश्री लेले

dhanashreelele01@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 16, 2017 5:30 am

Web Title: kathakathan by dhanashree lele part 5
Next Stories
1 मौनाचा अर्थ
2 ‘होईल’चा आशावाद
3 तूच तुझा परीक्षक
Just Now!
X