11 July 2020

News Flash

मेरे कान तुम्हारें नाम..

मंद अशा सुंदर चांदण्यातही ‘ती’ मात्र सासू-नणंदांची गाऱ्हाणीच सांगण्यात गुंग आहे.

बोलणाऱ्याला समोरचा कान आणि लिहिणाऱ्याला वाचकच ही तसल्ली देऊ शकतात

समोरचा अस्वस्थ दिसला की आपण त्याला उपदेश करतो, प्रेरणादायी काही सांगू पाहतो, होईल सगळं ठीक असा शाब्दिक उत्साह जागवतो.. पण त्याला हे सगळं त्या घडीला नकोच असतं.. त्याला हवे असतात फक्त आपले कान.. ‘मला बोलू दे.. माझं ऐकून घे..’ एवढंच त्याचं त्या घडीला म्हणणं असतं..

सुनो भाई

आसुओन्से लबालब भरी

तुम्हारी आखों को देखकर

समझ सकता हूँ मै.. तुम्हें क्या चाहिये?

नही, तुम्हें मेरे कंधों की जरुरत नही

ना हाथ के सहारे कि जरुरत है

ना बाहों में भरने की..

चलो, कर दिये मैंने..

मेरे कान तुम्हारे नाम..

या ओळी वाचल्यावर हा जो कोणी हे म्हणणारा आहे त्याला सलामच करावासा वाटतो.. किती समजूतदार आहे हा! किती अचूक समजून घेतलय त्याने समोरच्याला. डोळे पाण्याने भरल्यावर फक्त आधाराचीच नाही तर ऐकणाऱ्या कानांची ही गरज असते. किंबहुना त्याचीच जास्त गरज असते. समोरचा अस्वस्थ दिसला की आपण त्याला उपदेश करतो, प्रेरणादायी काही सांगू पाहतो, होईल

सगळं ठीक असा शाब्दिक उत्साह जागवतो.. पण त्याला हे सगळं त्या घडीला नकोच असतं.. त्याला हवे असतात फक्त आपले कान.. ‘मला बोलू दे.. माझं ऐकून घे..’ एवढंच त्याचं त्या घडीला म्हणणं असतं.. आणि आपण कान सोडून

बाकी सगळं द्यायला तयार असतो. एखाद्याला कान देणं.. हे मान देण्यापेक्षा ही जास्त महत्त्वाचं आहे. यातला शब्दच्छल वगळू.. योग्य वेळी मान न दिल्याने एखादा फार तर फार रागावू शकतो पण योग्य वेळी कान न दिल्याने मात्र एखादा उन्मळून पडू शकतो.

कान देणं ही खरंच कला आहे, समोरच्याला बोलू देणं, त्याच्या बोलण्यात आपण रस घेणं.. निदान तसं भासवणं ही कलाच आहे. त्याचं अर्ध दु:ख, अस्वस्थता त्याच्या व्यक्त होण्यानेच दूर होणार असते.. मागे एका लेखात एक छान वाक्य वाचलं होतं, ‘गावागावांतून पाणवठे संपले आणि मानसशास्त्रज्ञांची गरज वाढू लागली..’ पाणवठय़ावर भेटल्यावर बायका एकमेकींशी बोलत होत्या, चर्चा करत होत्या, आपल्या अडचणी, अनुभव एकमेकींना सांगत होत्या.. थोडक्यात, व्यक्त होत होत्या.. त्यांचं बोलणं ऐकून घेणारे कानही त्यांना मिळत होते.

‘कोणी पुसणारं असेल तर डोळे भरून येण्यात अर्थ आहे.’ तसं कुणी ऐकणारं असेल तर व्यक्त होण्यात अर्थ आहे. आपण आपल्या हृदयातलं शल्य सांगतोय आणि ते समजून घेऊन समोर मान हलताना दिसते तेव्हा केवढा आनंद होतो. मी काय काय सहन करतेय हे समोरच्याला कळतंय याचा आनंद त्या बोचणाऱ्या शल्याच्या दु:खापेक्षा जास्त असतो. ‘मला काय दुखतं ते माझं मलाच माहीत’ असं जरी डोळे पुसत कुठलीही स्त्री म्हणत असली तरी ‘माझं मलाच माहीत’मध्ये ‘माझं तुलाही माहीत व्हावं’ हाच खरा त्या वाक्याचा अर्थ असतो. ते शल्य समोरचा दूर करेल ही अपेक्षा नसते पण ती बोच त्याला कळावी एवढी इच्छा मात्र असते.

बोरकरांच्या ‘मंद असावे जरा चांदणे’ कवितेत नाही का बोरकर ही म्हणतात,

दूर घुमावा तमात पावा,

जवळच व्याकूळ व्हावे पाणी

तू ही कथावी रुसून अकारण

सासू नणंदांची गाऱ्हाणी..

मंद अशा सुंदर चांदण्यातही ‘ती’ मात्र सासू-नणंदांची गाऱ्हाणीच सांगण्यात गुंग आहे. कारण समोर मनापासून ऐकणारा हक्काचा कान आहे. हा हक्काचा कान मिळणं हे भाग्य असतं. पूर्वीच्या काळच्या स्त्रियांच्या ओव्यांत, सासुरवाशिणींना हा ऐकून घेणारा हक्काचा कान लाभत नाही याची खंत तर व्यक्त होतेच पण मग त्या अशा वेळी काय करतात ते ही त्या सांगतात.

पहिली माझी ववी (ओवी)

गाते पहिल्या फेऱ्यायाला

हुरुदीच (हृदयीचं)

सुकदुक (सुखदु:ख) त्येला कंठ फुटीयेला

दुसरी माझी ववी दुसऱ्या फेऱ्यायाला गाते

जात्या माउलीच्या पाशी माझं हुरुद उकलिते

सासरी आपलं ऐकून घेणारं कुणी नाही हे कळल्यावर ती जात्यापाशीच आपलं मन मोकळं करते, जात्यालाच आई मानून आणि जात्यापाशीच बोललेलं बरं.. एक म्हणजे त्याच्या घरघर आवाजात हिचे शब्द आतपर्यंत ऐकू जात नाहीत कोणाला, त्यामुळे घरातली शांतता ढळत नाही आणि जातं, ती जे बोलली ते कुणालाही मीठ मसाला लावून सांगणार नसतं.

गंमत असते ना, व्यक्त होताना आपल्याला कान हवा असतो समोर पण त्या दोन कानांच्या पलीकडे ती गोष्ट जाऊ  नये ही सुद्धा इच्छा असते.. म्हणून असं व्यक्त होताना.. ‘फक्त तुला म्हणून सांगते हं!’ आणि ‘कोणाला सांगू नकोस’ हे पालुपद अधूनमधून येत राहतंच. ऐकणाऱ्याची जबाबदारी या पालुपदाने वाढते. आता बोलणाऱ्याने त्याच्यावर ठेवलेला विश्वास त्याला जपावा लागणार असतो. कबीरजी नेमकं इथेच बरोबर ऐकणाऱ्याच्या बाबतीत साशंक होतात. म्हणतात..

ऐसा कोई ना मिला जासू कहु नि:संक

जासू हिरदा की कहु वो फिर मारे डंख..

आपलं गुपित समोरच्याला सांगावं, आपल्या हृदयाला लागलेली गोष्ट समोरच्याला सांगावी आणि नंतर त्याने आयुष्यभर त्या गोष्टीचं भांडवल करून आपल्याला दाबून ठेवावं. जणू डंख करत राहावं.. काय कबीरजींचं बारीक निरीक्षण! ऐकणाऱ्याने ही विश्वासार्हता टिकवणं फार महत्त्वाचं.

एकदा कान दिला की मग फक्त श्रोत्याच्या भूमिकेत राहावं लागतं.. हेही अवघड आहे. कारण सांगणारा जो अनुभव सांगतोय त्या अनुभवातून कदाचित ऐकणारा आधीच गेलेला असू शकतो. मग ऐकणाऱ्याला स्वत:चा अनुभव सांगितल्याशिवाय चैन पडत नाही.. मग ऐकण्यापेक्षा त्याचीच बोलण्याची घाई सुरू होते आणि त्या बोलण्याची सुरवात, ‘अगं हे तर काहीच नाही, तू माझा अनुभव ऐकशील ना..’ अशीच असते. आपला अनुभव कितीही जबरदस्त असला तरी आत्ता आपण अनुभव सांगणारे नाहीत तर फक्त ऐकणारे आहोत याचं भान सतत ठेवायला लागतं. कान देणं सोपं नाही. मुळात एखाद्याला कान द्यायचा म्हणजे वेळही द्यावा लागणार.. आणि सध्या बाकी काहीही देता येईल पण वेळ देता येणं फार अवघड आहे. सगळ्यांच्या हाताला घडय़ाळं आहेत पण वेळ नाही.. घडय़ाळात आहेत ते वेळेचे बोचणारे काटे.. कोण कुणाला कसा कान देणार? आपल्याकडे भक्तीच्या नऊ विधा सांगितल्या आहेत. त्यातली शेवटची आहे आत्मनिवेदन. आपलं मन भगवंतासमोर उलगडणं.. बाकी कोणी नाही तरी भगवंत आपल्याला नक्की कान देईल याची भक्ताला खात्री असते. बरं भगवंत सगळं जाणणारा आहे हेही भक्ताला माहीत असतं तरीही आपल्या मनातलं बोलून दाखवावं असं त्याला वाटतं..

मीरेने म्हटलं होतं.. मैं तो दरसदिवानी आणि म्हारा तो गिरिधर गोपाल.. याशिवाय कृष्णा मला दुसरं तुला वेगळं काहीच सांगायचं नाहीये.. पण तरीही मी ते सांगणार, रोज सांगणार, अगदी जिवात जीव असेपर्यंत सांगणार.. कारण तूच आहेस जो न कंटाळता हे ऐकून घेणार आहेस.

खरंच आहे.. प्रत्येक वेळेला सांगणाऱ्याला काही खास, महत्त्वाचं सांगायचं असतं असं नाही पण तरीही ते कुणी तरी ऐकावं ही इच्छा असते. एका शायरने किती छान म्हटलंय

रुदाद – ए – मुहब्बत मेरी कुछ खास तो नही

पर सुनते हो तो हो जाती है तसल्ली मेरे दिल की..

माझी कहाणी काही खास नाही, वेगळी नाही.. पण तू ऐकतोस ना तेव्हा बरं वाटतं.

ही तसल्ली महत्त्वाची. बोलणाऱ्याला समोरचा कान आणि लिहिणाऱ्याला वाचकच ही तसल्ली देऊ  शकतात.. म्हणून शेवटची ओळ बदलून लिहिते,

‘पढते हो तो हो जाती है तसल्ली मेरे दिल की’

धनश्री लेले dhanashreelele01@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2017 2:18 am

Web Title: responsibilities of the listener and speaker
Next Stories
1 भूतकाळातली वांगी
2 बोच
3 हे निद्रे
Just Now!
X