आयुष्याच्या संध्याकाळी खरोखरीच आठवणींच्या मऊ मऊ चटईवर निवांत झोप काढायची असेल तर आयुष्यभरातील काळ्या, खरबरीत आठवणी विसरून फक्त आनंद, सुख देणाऱ्या आठवणी लक्षात ठेवाव्या. जोडीदाराबरोबर त्यांचीच चर्चा करावी. अशा बोलण्यातून आपले आयुष्य किती छान होते हा विचार येतो, उमेद वाढते. बरोबर असणाऱ्या व्यक्तीचे दिवस आपण नकळत आनंदी करतो.

राधिका तशी गरिबीतच लहानाची मोठी झाली होती. तिच्यापेक्षा चांगल्या परिस्थितीत वाढलेल्या सुजयशी तिने विवाह केला. पण तो अनाथ, कमनशिबी या बिरुदाखाली काकांच्या घरी मोठा झाला होता, कारण विभक्त झालेल्या त्याच्या आई- वडिलांपैकी कोणीही त्याची जबाबदारी घेतली नाही. कायद्याने त्याला अनाथ आश्रमाचा रस्ता दाखविला असता. काकांनी त्याला आपल्या घरी आपल्या मुलांप्रमाणे वागणूक दिली. आई-वडिलांना मी नकोसा होतो, हा सल मात्र कायम त्याच्या मनात राहिला.

राधिकाकडे लहानपणी कायम पैशांची चणचण असे. तरी आपण खूप गमती केल्या, भावंडांबरोबर कशा मजा केल्या हे ती नवऱ्याला कायम सांगायची. सुजयला तिने खूप प्रेम दिले. मागील कटू आठवणी त्याच्या मनातून काढायचा प्रयत्न केला, पण बालमनावर झालेल्या आघातांच्या खुणा जाईनात. आता दोघेही सेवानिवृत्त झालेत. सकाळी लौकर उठण्याच्या सवयीचा फायदा झाला. जवळच असलेल्या पार्कमध्ये दोघे फिरायला जाऊ  लागले. मित्रमैत्रिणी वाढल्या. सुख-दु:ख वाटली जाऊ  लागली. लहानपणच्या मजेदार आठवणी, आईने केलेले लाड, कौतुक आठवून आठवून एकमेकांना सांगितले जाऊ  लागले. आधार आश्रमात जाणाऱ्यांबरोबर तेथे जाऊ  लागल्यानंतर तेथे राहणारे मागच्या गोड, सुखकारक आठवणी सांगून आयुष्य कसे मजेत व्यतीत करताहेत हे सुजयच्या लक्षात आले. आपणच वेडय़ासारखे मागच्या वाईट, दु:खदायी आठवणी उगाळून आपलेच आयुष्य अवघड, दु:खी करतो आहोत, हे त्याच्या  लक्षात आले. काकांनी दिलेले प्रेम, फक्त आपल्यासाठी आणलेला खाऊ, खेळणी, आजारपणात केलेले लाड, शाळेच्या सहली, मित्रांबरोबर केलेल्या मजा, गमती अशा सुखदायी गोष्टी आपण आठवून राधिकाला, मित्रांना हसविले पाहिजे. आपला सहवास सर्वाना हवासा वाटेल. महत्त्वाची गोष्ट आपण स्वत: छान, सुखी, संतोषी आयुष्य जगू शकू, हे मनापासून जाणवल्यामुळे आनंददायी आठवणींच्या पिसांच्या चटईवर तो खरोखरीची निवांत झोप हल्ली काढतो.

गीता ग्रामोपाध्ये

geetagramopadhye@yahoo.com