03 August 2020

News Flash

चुकीची कबुली

चुका तेव्हा क्षम्य होतात जेव्हा त्या मान्य करण्याचे, कबूल करण्याचे धैर्य आपल्याकडे असते. आयुष्यात एकही चूक केली नाही असा माणूस भेटणं विरळा.

‘मिस्टेक्स आर फरगिवेबल इफ वन हॅज द करेज टू अ‍ॅडमिट देम’ हे आपण नेहमी ऐकतो. चुका तेव्हा क्षम्य होतात जेव्हा त्या मान्य करण्याचे, कबूल करण्याचे धैर्य आपल्याकडे असते. आयुष्यात एकही चूक केली नाही असा माणूस भेटणं विरळा. लहानपणी आई-वडिलांनी, शाळेत शिक्षकांनी, नंतर मित्र-मैत्रिणींनी आपल्या चुका माफ केलेल्याच असतात. मोठेपणी काही चुका जाणूनबुजून केल्या जातात. काही स्वार्थापोटी. मनाला पटत असते की, ही चूक आहे, पण ती मान्य करण्यात कमीपणा वाटतो. नकळत झालेली चूक लक्षात आल्यावर ती धैर्याने मान्य करणारे असतात. त्यावेळी मात्र स्वच्छ मनाने, त्यांचा अपमान न करता क्षमा करायला हवी.

गेल्याच आठवडय़ातील गोष्ट. शेजारच्या उपनगरात मला जायचं होतं. पाऊस क ोसळत होता. स्टँडवर गेले. रिक्षा आली, त्यातून एक गृहस्थ उतरले. मी पण घाईने रिक्षात बसले. रहदारी कमी होती. १५ मिनिटांत इच्छित स्थळी पोहचलो. मी मीटर पाहिले, ते २०० रुपये दाखवत होते. मी येथे येण्याचे नेहमी ८० रुपये देते, असे मी चालकाला सांगितले. तो काही केल्या ऐकेना. मी रिक्षात बसण्यापूर्वी मीटर १२० रुपये दाखवीत असणार. त्याने पाऊस आणि माझी घाई दोन्हीचा फायदा घेत, नव्याने मीटर सुरू केले नाही हे माझ्या लक्षात आले. त्याला म्हटलं, ‘‘नव्याने मीटर सुरू कर. मी जेथून आले तेथे मला ने. जे पैसे होतील, अगदी ५०० रुपये झाले तरी मी देईन.’’ आपण मुद्दाम मीटर पाडले नाही, चूक केली आणि ती ग्राहकाच्या लक्षात आली हे कळल्यावर तो घाबरला. हात जोडून तीन तीनदा क्षमा मागू लागला. ‘‘चूक झाली ताई, परत नाही करणार असे’’ अशी कबुली दिली. मी पण जास्त ताणले नाही. ‘व्यवसाय प्रामाणिकपणे कर’ म्हटले आणि निघून आले.

ही गोष्ट झाली परक्या व्यक्तीची, पण आपल्या माणसांचं काय? आई मुलांना माफ करतच असते, मात्र कधी कधी असंही होऊ शकतं की आईच चुकते. अशावेळी तिनं मुलांची क्षमा मागायला हवी. रेवती आम्हाला सांगत होती, दोन दिवसांपूर्वी दुपारी तिची बहीण घरी आली. मुलांनी दुपारभर तिच्याशी खेळण्यात वेळ घालवला. तिला सोडायला म्हणून खाली गेलेली दोघं रात्री आठ वाजताच परत आली. जेवून झाल्यावर तिने गृहपाठाविषयी विचारले. ‘‘आज होमवर्क केला नाही’’ हे उत्तर ऐकून ती फार चिडली. ‘‘निदान उद्या जो हवाय तेवढा तरी करा आता, मी काहीही मदत करणार नाही’’ असे सांगून रागारागाने आत निघून गेली. गृहपाठ संपला. तेवढय़ात बाबा आले, ‘‘रात्र फार झाली, जा, पळा झोपा आता.’’ असं त्यांनी सांगितल्यावर मात्र मुलांनी आपली कैफियत सादर केली. ‘‘आम्ही कितीही केलं तरी आई आनंदी नसते. सारखी ओरडते. दुपारी शाळेचा अभ्यास झाला की, संध्याकाळी आईचा अभ्यास आम्ही करतो. खेळायला मिळत नाही बाबा.’’ रेवती हे ऐकून खिन्न झाली. हे त्यांचे खेळायचे, हुंदडण्याचे वय आहे, त्यांनी त्यांच्या वयाच्या मुलांबरोबर वेळ घालविला पाहिजे हे आपण विसरलो. कायम मुलांनी उत्कृष्टच केले पाहिजे हा हट्ट धरला. मोठी चूक केली आपण. तिने धावतच जाऊन मुलांना जवळ घेतले. ‘‘बाळांनो, चुकले रे मी, तुमच्या भूमिकेत जाऊन विचार केला नाही. मला क्षमा करा.’’ मुलांची क्षमा मागण्याकरिता काळीज मोठंच पाहिजे. रेवतीने ते धैर्य दाखवलं आणि मुलांसमोर चांगला आदर्श घालून दिला.

 

-गीता ग्रामोपाध्ये

geetagramopadhye@yahoo.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2016 1:13 am

Web Title: mistake acceptance
Next Stories
1 कडू घोटांचा गोडवा
2 विद्यार्थी, पालक आणि शिक्षक
3 मुलगी शिकली प्रगती झाली
Just Now!
X