‘चल ग लवकर..आटप आता..मुहूर्त निघून जायचा नाहीतर..’ ‘हो आले..’ मी शक्य तितक्या रेंगाळून बोलले. लग्नाला जाणे हा किती कंटाळवाणा प्रसंग असतो ना. लग्न कोणाचे? दुसऱ्याचे.. तयारी कोण करतंय? आपण. आताशा ना मला या लग्नसमारंभांना जायचा वीटच येतो. खूप बोअर होते. छान कपडे घालायचे, लग्नाला जायचे आणि मग तिथल्या माम्या-काक्यांशी आई ओळख करून देणार. ही माझी मुलगी..आता अमुक अमुक करतेय. मग समोरून आत्यंतिक आश्चर्याने प्रतिसाद येणार. ‘अय्या हो.. बापरे ओळखलंच नाही ग मी हिला.. किती मोठी झाली ही. वेगळीच दिसते आता. काय ग काय करतेस तू?’ (वास्तविक या प्रश्नाचे उत्तर आईने आधीच दिलेले असते, तरीही हा प्रश्न विचारला जातो..का विचारला जातो याचे उत्तर विज्ञानाकडेसुद्धा नाही.) तर अशा या कंटाळवाण्या गप्पा, माम्या-काकूंचे मनोरंजन, शंका निरसन होईपर्यंत चालूच राहतात. म्हणजे ज्यांचे लग्न आहे त्या बिचाऱ्यांना साधे कोणी पाणीसुद्धा विचारत नाही. मात्र हिच्या चुलत भावाच्या मामेबहिणीच्या आतेबहिणीच्या पदराचा रंग तिच्या ब्लाउजबरोबर कसा मॅच होत नाही यावर मात्र महाचर्चा रंगलेली असते. हल्ली तर मी जिथे जिथे लग्नाला जाते तिथे तिथे या संघटनेच्या रडारपासून लांब राहण्याचाच प्रयत्न करते. समजा जर चुकून त्यांची तुमच्यावर नजर पडली तर मग तुम्ही आहात आणि त्या..आणि हल्ली हल्ली तर मला अगदी नकोसंच होतं जाणं. कारण आजकाल ‘किती मोठी झालीस?’ या अत्यंत आश्चर्यकारक? विधानानंतर, ‘म…ग (या म…ग मध्ये संपूर्ण जग सामावलेलं असतं हा.!)’ ‘आता लग्नाचं पाहायला हवं हा..नाही का?’ हे अ‍ॅड झालेलं असतं. आणि बरं इतकं बोलून त्या थांबत नाहीत तर मोठ्ठा पॉज घेऊन डोळे मिचकावत आपल्याकडे पाहतात. सावज सापडल्यावर शिकारी ज्या नजरेने सावजाकडे पाहतो आणि म्हणतो, ‘आता खाऊ का तुला?’ सावज बिचारं काय म्हणणार? ‘नको बाबा, आज उपवास आहे ना तुझा!’ त्याला खऱ्या उत्तराची चॉइसच नसते. अग्गदी तसंच या माम्या-काक्या आपल्याशी वागतात. ‘म…ग (पुन्हा तोच जगवाला म..ग) करायची का सुरुवात शोधायला? की शोधला आहेस तूच कोणीतरी? तसं असेल तर सांग बाई..हल्ली काय मुलं आपलं आपलं शोधतात आणि मोकळं होतात, ते बरं बाई, आई-वडिलांच्या जिवालापण घोर नाही. (खरंतर हे असं स्वत: स्वत:चं जमवणं त्यांना फारसं नाही आवडत. सावज हातातून निसटल्याचं कोणत्या शिकाऱ्याला आवडेल? तर अशी ही एकतर्फी महाचर्चा सुरूच असते. मी काही बोलावं अशी त्यांची अपेक्षा नसते. किंबहुना त्यांना तसं काही नकोच असतं. माझ्या लग्नाबद्दल, माझ्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल मी त्रयस्थासारखं ऐकणं मात्र अपेक्षित असतं त्यांना. कित्ती विअर्ड आहे हे..!
आणि हल्ली हल्ली तर लग्नाचा हा किडा अधिकच वळवळ करायला लागलाय. गेल्या काही महिन्यांपासून पाहतेय मी, फेसबुकचे पेज उघडले की कोणी ना कोणी एन्गेजमेंट करतंय, लग्न करतंय किंवा हे नसलं तर प्री वेडिंग फोटोशूट तर आहेच. आता तर असं वाटायला लागलंय की आजकाल लग्न करावेसे वाटतेय म्हणून कमी आणि आम्ही लग्न करतोय हे दाखविण्यासाठीच जास्त केली जातात. मी तर हल्ली दोन-तीन दिवसांतून एकदा आश्चर्याच्या शॉकमध्ये तर असतेच असते. आणि त्यानंतर भीतीच्या कोमात. ‘बा….परे, हा लग्न करतोय? कॉलेजला असताना तर एकाही मुलीशी बोलायचा नाही..’ ‘का…य, हिचं लग्न झालंसुद्धा? आणि मला बोलावलंपण नाही.आधी किती गोड गोड बोलायची..!’
आजकाल आम्ही सगळ्या मित्रमैत्रिणी भेटलो की हाच विषय निघतो. ‘तुला माहीतेय याचं लग्न ठरलं, तिने कोर्ट मॅरेज केलं. कॉलेजच्या अफेअर्सची जागा आता लग्न नामक ‘सिरिअस अफेअर’ घेतंय हे आम्हा सगळ्यांना जाणवू लागलंय. आणि ही जाणीव अधिक सशक्त सुदृढ बनवायला आपले नातेवाईक तर आहेतच की. सोशल नेटवर्किंग साइट्समुळे ते हे सोशल वर्क अतिशय सुलभरीत्या करू शकतात.
कधी कधी मला एक स्वप्न पडतं. विचित्रसं. मी एका निबिड जंगलात जीव मुठीत घेऊन धावतेय. खूप धावतेय..धावतेय. अचानक झाडावर लावलेले फलक दिसतात, ‘याच रस्त्याने जा. हाच रस्ता तुला या जंगलातून बाहेर नेऊ शकेल.’ जसजशी मी पुढे जातेय, तसतसे हे फलक वाढायला लागतात. आता ते खूप जास्त वाढतात. आणि मला दरदरून घाम फुटतो. अतिप्रेम संकटात नेई टाइप फिलिंग यायला लागतं. आणि आता समोर मला कसलातरी प्रकाश दिसतोय. म्हणजे मी पोहोचतच आलेय. आणि..आणि..मला जाग येते. शेवटच्या बॉलवर दोन रन्स हवे असताना टीव्ही बंद पडावा, अगदी तस्संच आहे हे. जागं झाल्यावरसुद्धा मग मनाला हुरहुर लागून राहते, सापडली असेल का मला जंगलाबाहेर जायची वाट? विचित्रसं काहीतरी.
आजकाल ना मी या ‘लग्न’ प्रकाराबद्दल खूपच विचार करायला लागलेय. आपण मोठे झालोय, एक प्रौढ व्यक्ती म्हणून या समाजात वावरायला हवं ही भावनाच पचत नाही मला. मी मागे थांबलेय की जग भर्रकन पुढे गेलंय यातच कन्फ्युज्ड झालेय. लग्नच करायचं नाही असं मत अजिबातच नाहीये माझं. पण ते नुसतंच करून टाकण्यापेक्षा मला ते अनुभवायचंय. कदाचित आधीच्या पिढीतील कित्येकांनी त्याला तडजोड म्हणून स्वीकारलेलं. मला तसं नकोय. लग्न माझ्या आयुष्यातला रोलर कोस्टर ठरेलही कदाचित. पण मला तो एन्जॉय करायचाय. त्यातला प्रत्येक क्षण समरसून जगायचाय. लग्न खरंतर किती नाजूक गोष्ट आहे. लोकरीचा मऊसूत धागा हळूच उसवून तो दुसरीकडे विणायचा इतकं नाजूक. मला तर वाटतं लग्नाच्या प्रेमात पडल्याशिवाय करूच नये लग्न. जंगलात हरवलेली वाट खरंतर शोधायचीच नसते, कारण ती आपल्याला आधीच सापडलेली असते.
response.lokprabha@expressindia.com