मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे गाडी चालवून पदपथावरील पाचजणांना चिरडून त्यातील एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला अभिनेता सलमान खानवर सदोष मनुष्यवधाचा नवा आरोप निश्चित करण्यात आलेला आहे. मात्र आपल्यावर जर नव्याने आणि तोही गंभीर स्वरूपाचा आरोप ठेवण्यात येत आहे तर खटलाही नव्याने चालविण्यात यावा, अशी
मागणी सलमानने सोमवारी सत्र न्यायालयाकडे केली. त्याच्या या मागणीवर न्यायालय ५ डिसेंबर रोजी निर्णय देणार आहे.
सलमानने मद्यधुंद अवस्थेत तेही अंगरक्षकाने परिणामांबाबत सतत इशारा देऊनही बेदरकारपणे गाडी चालवून पदपथावर झोपलेल्या पाचजणांना चिरडले. त्यात एकाचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे त्याच्याविरुद्ध निष्काळजीपणाने गाडी चालविल्याचा नव्हे, तर सदोष मनुष्यवधचा गुन्हा चालविण्यात आला पाहिजे असा निर्वाळा देत महानगरदंडाधिकाऱ्यांनी खटला सत्र न्यायालयात वर्ग केला होता.
त्यानंतर सत्र न्यायालयात सलमानवर या नव्या आरोपाअंतर्गत नव्याने आरोपनिश्चिती करण्यात आली आणि सलमानने आपल्याला आरोप मान्य नसल्याचेही न्यायालयाला सांगितले. खटल्याला सुरुवातही झाली. परंतु सलमानने सोमवारी नव्याने अर्ज केला आणि आपल्याविरुद्ध नव्या आणि गंभीर आरोपाअंतर्गत खटला चालविण्यात येत आहे तर खटलाही नव्याने चालवावा आणि साक्षीदारही नव्याने तपासावे, अशी मागणी केली. सलमानवर नव्या आरोपाअंतर्गत कारवाई करण्याचा निर्णय देताना महानगरदंडाधिकाऱ्यांनी त्याला आपली बाजू मांडण्याची योग्य ती संधी दिली नसल्याचा दावा सलमानचे वकील श्रीकांत शिवदे यांनी खटल्याची नव्याने सुनावणी करण्याची मागणी करताना केली.  परंतु महानगरदंडाधिकाऱ्यांना पुढे आलेल्या पुराव्यांच्या आणि साक्षीदारांच्या साक्षीच्या आधारेच सलमानवर सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली खटला चालविण्याचा निर्णय घेतल्याचे सरकारी पक्षातर्फे न्यायालयाला सांगण्यात आले. तसेच खटला लांबविण्यासाठी सलमान ही शक्कल लढवत असल्याचा आरोप करीत सरकारी पक्षाने त्याला विरोध करण्यात आला आणि त्याची मागणी फेटाळून लावण्याची मागणी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New charges then run the new case salman khan demand to court
First published on: 19-11-2013 at 03:01 IST