बॉलिवूडमध्ये काही चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अगदी जुन्या काळापासूनच्या चित्रपटांपासून ते हल्लीच्या चित्रपटांपर्यंत बऱ्याच बाबतीत दमदार कथानक, तगडी स्टारकास्ट आणि असामान्य दिग्दर्शन अशा गोष्टींचा मेळ साधणाऱ्या चित्रपटांना प्रेक्षकांनी पसंती दिल्याचं पाहायला मिळालं. अर्थात चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच त्याचं भवितव्य आपल्या कळतं. पण, यालाही काही अपवाद आहेत. सध्याच्या घडीला हा अपवाद म्हणजे, ‘पद्मावत’. चित्रीकरणाच्या पहिल्या दिवसापासून ते या क्षणापर्यंत भन्साळींच्या या स्वप्नवत प्रोजेक्टच्या चर्चा रंगल्याचं पहायला मिळालं. त्यात नकारात्मक चर्चा तुलनेने जास्त असल्या तरीही प्रेक्षकांनी मात्र त्यातूनही या चित्रपटाकडे सकारात्मक दृष्टीनेच पाहिले.

कधी एकदा हा चित्रपट प्रदर्शित होतो आणि भन्साळींचा हा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आपण कधी पाहतो, याचीच उत्सुकता अनेकांना लागून राहिली. पण, त्यातही काहीजणांच्या मनात हा चित्रपट नेमका का पहावा, हा प्रश्न घर करत होता. मुळात या प्रश्नाची उत्तरं जरी वेगवेगळी असली तरीही काही बाबतीत मात्र अनेकांचेच एकमत आहे. चला तर मग जाणून घेऊया ‘पद्मावत’ का पहावा याची पाच कारणं…

चित्रपटाला होणारा विरोध– चित्रपटाच्या सेटवर केलेल्या तोडफोडीपासून ते कलाकारांना जीवे मारण्याचा धमक्या देण्यापर्यंत मजल गाठणाऱ्या करणी सेनेने एक वेगळीच वातावरण निर्मिती केली. ज्यामुळे या चित्रपटाच्याच चर्चा कलाविश्वात रंगल्या. ‘पद्मावत’वर बंदी आणण्याचे शक्य ते सर्व प्रयत्न करणाऱ्या करणी सेनेने हा विरोध नेमका का केला हे जाणून घेण्यासाठी ‘पद्मावत’ पाहा.

भन्साळींचं दिग्दर्शन- ‘लार्जर दॅन लाइफ’ चित्रपट साकारण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या संजय लीला भन्साळींच्या दिग्दर्शनाची झलक या चित्रपटातून पाहता येणार आहे. चित्रपटाची भव्यता, प्रत्येक दृश्यामध्ये टिपण्यात आलेले बारकावे या गोष्टी भन्साळींच्या चित्रपटात जमेची बाजू ठरतात. असामान्य पद्धतीने एखादी कथा प्रभावीपणे रुपेरी पडद्यावर मांडणाऱ्या भन्साळींचा ‘पद्मावत’ही अशीच अुनभूती प्रेक्षकांना देऊ शकतो.

दीपिका आणि शाहिदची ऑनस्क्रीन केमिस्ट्री- ‘पद्मावत’च्या निमित्ताने शाहिद कपूर आणि दीपिका पदुकोण पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करत आहेत. या दोघांच्याही अभिनयातून साकालेल्या महारावल रतन सिंह आणि राणी पद्मावती या भूमिकांमधून नव्या जोडीच्या केमिस्ट्रीचं आणि एका वेगळ्याच संस्कृतीचं दर्शन प्रेक्षकांना होणार आहे.

रणवीरची नकारात्मक भूमिका- रणवीरने आतापर्यंत एका राजाची, प्रियकराची भूमिका साकारली आहे. पण, ‘पद्मावत’च्या निमित्ताने तो पहिल्यांदाच एक नकारात्मक भूमिका साकारतोय. विक्षिप्त सुल्तान अलाउद्दीन खिल्जीची भूमिका साकारणारा रणवीर भलताच चर्चेत असून, त्याच्या या भूमिकेसाठी अनेकांचे पाय चित्रपटगृहाकडे वळतील असे म्हणायला हरकत नाही.

Padmaavat Review : आश्चर्याच्या परिसीमा ओलांडणारा ‘पद्मावत’

‘पद्मावती’ ते ‘पद्मावत’- ‘पद्मावती’ या नावाने सुरुवात झालेल्या या चित्रपटाचा प्रवास अगदी शेवटच्या टप्प्यात येता येता ‘पद्मावत’वर येऊन थांबला आणि अनेकांनाच आश्चर्याचा धक्का बसला. करणी सेनेच्या विरोधानंतर सेन्सॉरने या चित्रपटात हा बदल सुचवला. कितीही वाद आणि आरोप- प्रत्यारोप झाले तरीही सध्याच्या घडीला ‘पद्मावत’ या वर्षातील सुरुवातीच्या दिवसांमध्ये तरी प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण करण्यात यशस्वी होणार असंच चित्र आहे.