आसाम आणि गुजरातमध्ये पुराचा कहर माजला आहे. या पुरामुळे आसाम आणि गुजराची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. तेथे बचावकार्य सुरु असून लोकांना सुरक्षितस्थळी पोहोचवलं जातंय. यादरम्यान आमिर खानने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला. नेहमी आपल्या चित्रपटांतून लोकांपर्यंत एक सकारात्मक संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करणारा आमिर या व्हिडिओच्या माध्यमातून देशातील लोकांना मदतीसाठी आवाहन करताना दिसतोय. आसाम आणि गुजरातमधील पूरग्रस्तांना मदत करण्याचं आवाहन आमिरने केलंय.

‘मित्रांनो, आसाम आणि गुजरातच्या काही भागांत पूर आलाय आणि तिथे राहणाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय. अनेकांचा मृत्यू झाला असून, पुरात खूप नुकसानंही झालंय. निसर्गापुढे तर आपण लाचार आहोत, मात्र तेथील नागरिकांना मदत करण्यासाठी आपण लाचार नाही. मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो, की आपण सर्वजण मिळून आसाम आणि गुजरातमधील पूरग्रस्तांना मदत करूया आणि दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्री मदत निधीत आपले योगदान देऊया. मीसुद्धा मदत करेन, तुम्हीही मला साथ द्या,’ या शब्दांत आमिरने पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी आवाहन केलंय.

वाचा : अन् दारुला कधीही हात न लावणाऱ्या जॉनी वॉकरचं नाव व्हिस्कीला देण्यात आलं

आतापर्यंत उत्तर आणि मध्य गुजरातमधील २५ हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलवले असून बचावकार्य अजूनही सुरु आहे. शुक्रवारपर्यंत गुजरातमध्ये पुरामध्ये १२८ लोकांना आपले प्राण गमवावे लागले. आसामलाही पुराचा फटका बसला असून २.१० लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय.