अगदी गेल्याच आठवडय़ात समाजमाध्यमांवर गौरी सावंत या तृतीयपंथी आईच्या जाहिरातीचा व्हिडीओ पाहून अनेकांची मनं आतून हेलावली नसतील तरच नवल! एका अनाथ मुलीला आईची माया मिळाली, तिला तिच्या पायावर उभं राहण्याची हिंमत त्या आईने दिली. ही जाहिरात पाहताना केवळ त्यातील भावनिकताच पाहणाऱ्याला गुंतवून ठेवते असं नाही, तर चांगलं काही करण्याची प्रेरणाही देते. चौसष्टावी कला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अगदी मिनिटभरापेक्षाही लहान असलेल्या या जाहिरात कलेचा प्रभाव इतका मोठा की, एक चांगला विचार लाखोंची मनं उजळून जावा. तर दुसरीकडे याच जाहिरातींच्या गर्दीतले मोठे चेहरे, आणि त्यांनी सांगितलंय म्हणून डोळे झाकून ती उत्पादने विकत घेणारे आपण सर्वसामान्य.. या जाहिरातींचा चुकीच्या मार्गाने वापर केला तर एक समाज काळाच्या मागे फेकला जाऊ शकतो, याकडे लक्ष वेधत सगळ्यांच्याच डोळ्यांत झणझणीत अंजन टाकण्याचा प्रयत्न करणारा अभय देओल. जाहिरात या एकाच माध्यमाचे या दोन पद्धतीने जनमानसात उमटलेले हे पडसाद.. बरेच काही शिकवून जाणारे आहेत. त्यानिमित्ताने एकाच वेळी जाहिरातींतून सामाजिक बांधिलकीचे भान पेरणारी सर्जनशीलता आणि दुसरीकडे  संवेदनशील म्हणवणारी प्रतिभा या दोन्ही जाहिरातवाटांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न..

समाजात वाढत चाललेला वर्णद्वेष आणि सेलिब्रिटी करत असलेल्या ‘फेअरनेस क्रीम’च्या जाहिराती यांचा थेट संबंध जोडत अभिनेता अभय देओलने समाजमाध्यमांतून बॉलीवूडमधील आपल्याच सहकाऱ्यांना एक प्रकारे आवाहनच केले आहे. ‘फेअरनेस क्रीम’च्या जाहिरातीविरोधात आवाज उठवणारा अभय हा पहिला कलाकार नाही. याआधीही अभिनेत्री नंदिता दासने याविरोधात मोहीम उघडली होती. ती आजही वेगवेगळ्या प्रकारे ‘फेअरनेस क्रीम’ कंपन्यांविरोधात लढते आहे. मात्र आपल्याच क्षेत्रातील लोक अजूनही या उत्पादनांच्या जाहिराती करून तिच्या प्रयत्नांवर पाणी फिरवत आहेत, असा थेट टोला लगावत अभयने निषेध व्यक्त केलाय खरा.. मात्र याला अजूनही सोनम कपूर वगळता बॉलीवूडकरांनी थेट प्रतिसाद दिलेला नाही.

एका राजकीय नेत्याने केलेले वर्णद्वेषी विधान ऐकल्यानंतर आपल्या समाजात मुळातच गोरे असण्याचा अट्टहास गेली अनेक र्वष घट्ट पाळंमुळं रुजवून आहेत. त्यात फेअरनेस क्रीम कंपन्यांच्या जाहिराती पुन्हा एकदा या गोरेपणाच्या अट्टहासाला खतपाणी घालून स्वत:ची तुंबडी भरत असल्या तरी त्यांच्या या एका कृतीने पुढे येण्याऐवजी एक पिढी पुन्हा त्याच बुरसटलेल्या विचारांमध्ये हरवते आहे. गेली अनेक र्वष समाजात वैचारिक सुधारणा व्हावी म्हणून धडपडणाऱ्यांचे प्रयत्न फोल ठरतात. कारण, फेअरनेस क्रीमच्या उत्पादनांची जाहिरात लोकांच्या आवडत्या ‘स्टार’ कलाकारांकडून केली जाते. ‘फेअरनेस क्रीम’च्या जाहिरातींमध्ये तुमचा चेहरा गोरा होईल, असा दावा केला जातो तोच कायदेशीररीत्या खोटा आहे. त्यामुळे शाहरूख खान, दीपिका पदुकोण, सोनम कपूर, जॉन अब्राहम, शाहीद कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा अशी बॉलीवूडची नामी मंडळी जी या उत्पादनांच्या जाहिराती करतायेत त्यांनी हे कुठेतरी थांबवायला हवं आहे, अशी अपेक्षा अभयने व्यक्त केली आहे.

वर्णद्वेष केवळ समाजात आहे, असं नाही. तर खुद्द बॉलीवूडमध्येही अनेक चांगल्या कलाकारांना वर्णद्वेषाला सामोरे जावे लागले आहे. नंदिता दास आणि स्वरा भास्करसारख्या अभिनेत्रींनी याबद्दल जाहीर नाराजीही व्यक्त केली. नवाजुद्दीन सिद्दीकीनेही केवळ अभिनयगुणांच्या जोरावर बॉलीवूडला आपलेसे केले असले तरी त्यालाही या अनुभवांना सामोरे जावे लागले आहे. मात्र असे असूनही अनेक मोठे कलाकार अजूनही या जाहिराती करताना दिसतात. अभय देओलने फेसबुकवर ही पोस्ट टाकल्यानंतर समविचारी कलाकारांनी त्याला पािठबा दिला असला तरी ज्यांची जाहीर नावे घेऊन त्याने हा निषेध व्यक्त केला आहे त्या कलाकारांनी अजून तरी तोंड उघडलेले नाही. अपवाद फक्त सोनम कपूरचा.. मात्र तिनेही अभयच्या म्हणण्याचा विचार न करता विरोधाला विरोध या अर्थाने तिने अशाच उत्पादनांची जाहिरात करणाऱ्या ईशा देओलचे छायाचित्र पोस्ट केले. नंतर सोनमने आपल्या पोस्ट काढून टाकत माघारही घेतली असली तरी घाईघाईत तिने प्रत्युत्तरादाखल केलेला प्रकार हा हास्यास्पदच होता. सोनमने अभयबरोबर दोन चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यामुळे सहकलाकार असूनही तिने त्याच्या म्हणण्याचा पुरेशा गांभीर्याने विचार केला नाही. उलट, सोनमच्या या प्रतिक्रियेची दखल घेत अभयने आपल्याला या कलाकारांना वैयक्तिकरीत्या कुठलाच विरोध करायचा नाही, असे एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले.

अभयने केवळ जाहिराती करणाऱ्या कलाकारांचा विरोध केला असं नाही. तर फेअरनेस क्रीमच्या जाहिराती न करण्याचा निर्णय जाणीवपूर्वक घेणाऱ्या रणबीर कपूर, कंगना राणावत या दोघांचेही त्याने कौतुक केले. नंदिता दासच्या लढय़ाचाही दाखला देत त्याने या सेलिब्रिटी कलाकारांची कानउघाडणी केली आहे. माझ्या या पोस्टवर बॉलीवूडचे कलाकार आणि इतर मंडळी काय विचार करतात, याची मला पर्वा नाही, असं त्याने स्पष्ट केलं आहे. मी हे पाऊल उचलले कारण मी कित्येक सेलिब्रिटींना या जाहिराती करू नका, असं सांगून सांगून थकलो आहे. गोऱ्या रंगाचा सोस या समाजात शंभर वर्षांपेक्षा जास्त टिकून आहे. सेलिब्रिटी कलाकार  जेव्हा या जाहिराती करतात तेव्हा नकळतपणे शंभर वर्षांपेक्षाही जास्त काळ समाजात रुजलेला हा विचार ते आणखी मोठा करतात, घट्ट करतात. आणि आपण अजून कित्येक र्वष समाजाला वैचारिकदृष्टय़ा मागे टाकतो, याचं भानच या मंडळींना नाही आहे, अशी टीका त्याने केली आहे. काही कलाकार बोलत नाहीत, कारण कित्येकदा त्यांचे म्हणणे मागे पडते आणि त्यांच्या विधानाची उगाच मोडतोड करून नको त्या गोष्टींना प्रसिद्धी दिली जाते. मी स्वत:ही काही खूप चांगला आहे असं नाही. पण कुठेतरी ही गोरेपणाची भ्रामक कल्पना खोडून काढली पाहिजे तरच खऱ्या समस्येला हात घालता येईल, असं सांगत अभयने हा विषय उचलून धरला आहे.