लोकप्रिय अभिनेता आणि रंगभूमीवरील ‘हाऊसफुल्ल’चा हुकमी एक्का प्रशांत दामले यांनी काही कालावधीसाठी नाटय़व्यवसायातून तात्पुरती विश्रांती घेण्याचे ठरविले आहे. दामले यांचा हा ‘अल्पविराम’ अभिनय सोडून एका वेगळ्या क्षेत्रातील नव्या खेळीसाठी आहे. दामले यांची सध्या तीन नाटके सुरू असून या नाटकांचे काही प्रयोग करून ते थांबणार आहेत.
प्रशांत दामले गेली ३१ वर्षे रंगभूमीवर असून २३ फेब्रुवारी १९८३ या दिवशी रंगभूमीवर सादर झालेल्या ‘टुरटुर’ या नाटकातून दामले यांनी व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केले. रंगभूमीवर विविध नाटकांचे त्यांनी आत्तापर्यंत १० हजार ९८१ प्रयोग सादर केले आहेत. तसेच रंगभूमीवर काही विक्रमही त्यांच्या नावावर जमा आहेत.
दामले यांची सध्या ‘एका लग्नाची गोष्ट’, ‘गेला माधव कुणीकडे’ आणि ‘नकळत सारे घडले ही तीन नाटके सुरु आहेत. ‘एका लग्नाची गोष्ट’ आणि ‘गेला माधव कुणीकडे’ या दोन्ही नाटकांचे अनुक्रमे १ हजार ७५० आणि १ हजार ८५० प्रयोग झाले आहेत. तर ‘नकळत सारे घडले’चे ३७ प्रयोग झाले आहेत.
रंगभूमीवरील ३१ वर्षांच्या प्रदीर्घ कामानंतर दामले यांनी दोन वर्षांसाठी तात्पुरते थांबण्याचे ठरविले आहे. या काळात ते सध्या सुरू असलेल्या कोणत्याही नाटकाचे प्रयोग आणि नवीन नाटकही करणार नाहीत. अभिनयाकडून प्रशांत दामले हे ‘माध्यम’ क्षेत्रात नवी ‘इनिंग’ सुरू करणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून सांगण्यात आले.
‘नकळत सारे घडले या नाटकात दामले यांनी आपल्या नेहमीच्या पठडीपेक्षा वेगळी म्हणजे ‘अंध’ व्यक्तिची भूमिका केली आहे. या नाटकाच्या माध्यमातून त्यांनी ‘मरणोत्तर नेत्रदान’ ही चळवळ राबविली आहे. त्यामुळे जमले तर केवळ एक सामाजिक चळवळ म्हणून या नाटकाचे जमतील तसे प्रयोग करण्याची शक्यता आहे.

जुलै महिन्याच्या अखेरपासून एका नव्या प्रकल्पासाठी मी काम करणार आहे. तेथे जास्त वेळ द्यावा लागणार असल्याने नाटक आणि प्रयोगासाठी वेळ देता येणार नाही. त्यामुळे सध्या सुरु असलेल्या नाटकांचे प्रयोग थांबविण्याचा तसेच कोणतेही नवे नाटक न करण्याचा निर्णय मी घेतला आहे. माझ्या या नाटकांचे काही शेवटचे खेळ आता पुढील कालावधीत वेगवेगळ्या नाटय़गृहात सादर होतील. माझा नवीन प्रकल्प आणि काम याबाबत जरा ‘थांबा आणि वाट पाहा’.
-प्रशांत दामले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.