एग्झिट पोल म्हणजे अंतिम निकाल नाही, असं गंमतीशीरपणे सांगणारे सलमान खान, ऐश्वर्या राय-बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या मिम्सचा एक फोटो अभिनेता विवेक ओबेरॉयने ट्विटरवर शेअर केला होता. हा फोटो शेअर करुन विवेक चांगलाच अडचणीत सापडला आहे. राज्य व केंद्रीय महिला आयोगाने त्याला नोटीस पाठविली आहे. इतकंच नाही तर कलाविश्वातील काही कलाकारांनीही त्याच्यावर टीकास्त्र डागले. यामध्ये अभिनेत्री सोनम कपूरनेदेखील ट्विटरच्या माध्यमातून त्याला ‘क्लासलेस’ म्हटलं होतं. सोनमच्या या ट्विटनंतर विवेकनेही तिला प्रत्युत्तर दिलं आहे.

अभिनेत्री सोनम कपूर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रीय असते. स्त्रीवादाची पुरस्कर्ती असलेली सोनम कायम महिलांवर होणाऱ्या अन्यायावर, शोषणावर आवाज उठवत असते. त्यांना पाठिंबा देत असते. त्यामुळे विवेकने ऐश्वर्याचा फोटो शेअर केल्यानंतर सोनमने तिचा संताप व्यक्त केला. तिने विवेकला थेट ‘क्लासलेस’ असल्याचं म्हटलं. तिच्या या प्रतिक्रियेनंतर विवेकनेही सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे.

“मला असं वाटतं अनेक वेळा लोकं स्वत:ला कूल असल्याचं सिद्ध करण्यासाठी अशा कमेंट करतात. सोनम महिला सबलीकरणाविषयी अनेक वेळा बोलत असते, त्यामुळे माझा तिला एक लहानसा प्रश्न आहे. सोनम तू आतापर्यंत महिला सबलीकरणासाठी काय -काय केलंस, कोणतं पाऊल उचललसं ? गेल्या दहा वर्षांमध्ये आम्ही २२०० मुलींची वेश्याव्यवसायातून सुटका केली आहे. त्यांना मोफत शिक्षण, आरोग्यविषयक सुविधा आणि त्यांच्या खाण्यापिण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या मुलींपैकी अशा अनेक मुली आज युएस., यूके आणि कॅनडामध्ये शिष्यवृत्ती मिळवून त्यांचं पुढील शिक्षण करत आहे , आणि मी हे केवळ बोलायचं म्हणून बोलत नाही, तर माझ्याकडे त्याचा पुरावा आहे. हे सगळं कागदोपत्री लिहून ठेवण्यात आला आहे. फॉर्ब्स आणि अन्य काही आंतरराष्ट्रीय मासिकांमध्येदेखील या विषयी मोठ्या प्रमाणावर लिखाण करण्यात आलं आहे”, असं विवेक म्हणाला.

पुढे तो म्हणतो, “ज्यावेळी सोनम तिचा वेळ मेकओव्हर करण्यात घालवत होती. तेव्हापासून मी महिला सबलीकरणासाठी काम कर आहे. मला आता फक्त एवढंच म्हणायचं आहे की, सोनम तू एक चांगली मुलगी आहेस, तुझ्या वडीलांचा अनिल कपूर यांचा मी मनापासून आदर करतो. मात्र तुला मी एक सल्ला देईन, चित्रपटांमध्ये तू ओव्हर अॅक्टींग आणि सोशल मीडियावर ओव्हर रिअॅक्ट होण्याचं कमी कर. तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा”.

दरम्यान, विवेकने ट्विटरवर एक मीम शेअर केलं होतं. यामध्ये पहिल्या फोटोत ऐश्वर्या राय सलमान खानसोबत असलेला फोटो आहे त्याखाली ‘ओपिनियन पोल’ असे लिहिले आहे. दुसऱ्या फोटोत विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या राय असा फोटो आहे. त्या फोटोत ‘एक्झिट पोल’ असे लिहिले आहे. त्यानंतर अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय आणि आराध्या यांचा फोटो आहे त्याफोटोखाली ‘रिझल्ट’ असं लिहिलं आहे. हे मीम विवेक ओबेरॉयने तयार केलेले नाही. मात्र ते शेअर करत हे मीम आपल्याला खरोखरच आवडले अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर त्याच्यावर अनेकांनी टीका केली. यामध्ये “विवेक तू शेअर केलेला फोटो अत्यंत दर्जाहीन आणि तिरस्कार निर्माण करणारा आहे. हे योग्य नाही”, असं म्हणत सोनमने विवेकला फटकारलं आहे.