बालदिनाच्या निमित्ताने सोशल मीडियावर लहानपणीच्या आठवणींनी आणि फोटोंना जणू उधाणच आले होते. आपल्या बालपणीची छायाचिए पोस्ट करण्यासाठी मग बॉलिवूड सेलिब्रिटींनीसुद्धा क्षणाचाही विलंब केला नाही. बालदिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या एका क्रायक्रमामध्ये अभिनेत्री आलिया भट्टनेही हजेरी लावली होती. या कार्यक्रमात आलियाने तिच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत काही खोडकर गुपितंही उघड केली.

वाचा: ..म्हणून आलिया म्हणाली ‘जस्ट गो टू हेल’

गप्पांच्या ओघात आलियाने तिला मिळालेल्या एका शिक्षेविषयीसुद्धा सांगितले. अभिनेत्री आलिया भट्टला तिच्या शाळेमध्ये बाक (बेंच) साफ करण्याची शिक्षा मिळाली होती. याविषयी सांगताना आलिया म्हणाली, ‘मला लहानपणी शाळेतील प्रसाधनगृहामध्ये जाऊन झोपण्याची सवय होती. मी तिथे जाऊन झोपायचे. एके दिवशी मला प्रसाधनगृहामध्ये झोपताना माझ्या शिक्षकांनी पाहिले. त्यानंतर मला एका आठवड्यासाठी शाळेत वर्गातील बाकांची साफसफाई करण्याची शिक्षाही करण्यात आली होती. ते खुपच घाणेरडे काम होते’, असे म्हणत ‘तुम्ही कधीही वर्गात झोपू नका, त्याऐवजी घरी झोपा’ असा सल्लाही अलियाने उपस्थितांना दिला.

या कार्यक्रमामध्येच आलियाला तिच्या भावी जोडीदाराविषयीसुद्धा विचारण्यात आले. तुला आयुष्यात कशाप्रकारचा पार्टनर हवा, असा प्रश्न तिला विचारण्यात आला. त्यावेळी आलियाने म्हटले की, आयुष्याच्या जोडीदाराबाबत माझ्याही अपेक्षा चारचौघांसारख्यात आहेत. तो मला खूप हसवणारा आणि माझ्यावर प्रेम करणारा असावा, हीच माझी मुख्य अपेक्षा असल्याचे आलियाने सांगितले. जोडीदाराची निवड करताना तो दिसायला कसा आहे, हा माझ्यासाठी तितकासा प्राधान्याचा मुद्दा नसेल. मी इतक्यात लग्न करणार नसले तरी माझा लाईफ पार्टनर युथ आयकॉन नसावा, असे मला वाटते. कारण माझे लग्न होईपर्यंत मी तरूण राहीन, याची मला खात्री नाही, असे आलियाने यावेळी सांगितले.

अभिनेत्री आलिया भट्ट तिच्या अभिनयासोबतच स्टाईल स्टेटमेन्टसाठीही प्रसिद्ध आहे. ‘उडता पंजाब’ या चित्रपटामध्ये महत्त्वाची भूमिका साकारल्यानंतर अभिनेत्री आलिया भट्ट तिच्या आगामी ‘डिअर जिंदगी’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गौरी शिंदे दिग्दर्शित या चित्रपटामध्ये अभिनेता शाहरुख खान आणि आलिया भट्ट प्रथमच स्क्रिन शेअर करत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने गुरु-शिष्येचे एक वेगळे आणि नवे नाते प्रेक्षकांसमोर मांडले जाणार आहे. २५ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.