अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या तिचा आगामी सिनेमा ‘फिल्लौरी’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. नुकतीच ती एका टीव्ही मालिकेमध्ये सिनेमाच्या प्रमोशनसाठी गेली होती. यावेळी तिने ‘यार मेरा सुपरस्टार’ या मालिकेत मुलाखती दरम्यान आपल्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला. अनुष्काने आपली लहानपणीची अशी एक आठवण सांगितली जी तिच्या चाहत्यांनाही माहित नसेल. अनुष्का म्हणाली की, ‘लहानपणी मी स्वतःला एक कचरा वेचणारी मुलगी समजायचे. मला चॉकलेटचे कागद गोळा करण्याचा छंद होता.’

शोची सूत्रसंचालक संगीताने, अनुष्काला तिच्या या चॉकलेटचे कागद गोळा करण्याच्या सवयीबद्दल विचारले तेव्हा अनुष्का म्हणाली की, ‘माझी आई मला यासाठी फार मारायची. त्यामुळे तिच्या नकळत मी शाळेतून घरी येताना रस्त्यावरचे चॉकलेटचे कागद गोळा करायचे आणि ते लपवून ठेवायचे. घराच्या जवळच माझी शाळा होती. त्यामुळे रस्त्यावरुन जाताना मला जिथे कुठे चॉकलेटचे कागद दिसायचे ते मी उचलायचे. माझ्या या सवयीमुळेच मी स्वतःला कचरा वेचणारी समजायचे.’

अनुष्का म्हणाली की, ‘जमा केलेले चॉकलेटचे कागद मी चपलांच्या बॉक्समध्ये ठेवून तो बॉक्स कपाटात जपून ठेवायचे.’ एकदा अनुष्काच्या आईला तिच्या कपाटात मुंग्या दिसल्या. अनुष्काने ठेवलेल्या चॉकलेटच्या कागदांना मुंग्या आल्याचे कळताच तिची आई फार चिडली. ‘तुझं डोकं फिरलं आहे का?’ असा प्रश्न तिने अनुष्काला केला. तेव्हा अनुष्काने अगदी गंभीरपणे हा माझा छंद असल्याचे सांगितले. या व्यतिरिक्त अनुष्काला स्टॅम्प आणि नाणी गोळा करण्याचाही छंद होता. अनुष्काने सांगितले की, ‘तिच्याकडे स्टॅम्प आणि नाण्यांचे खूप चांगले कलेक्शन होते.’ झूम वाहिनीवर शनिवारी हा एपिसोड प्रदर्शित होणार आहे. तर २४ मार्चला अनुष्का आणि दिलजीत दोसांजचा आगामी ‘फिल्लौरी’ हा सिनेमा प्रदर्शित होईल.

https://www.instagram.com/p/BRgh-9_jbsk/

https://www.instagram.com/p/BRTWx3gDbL5/

https://www.instagram.com/p/BRK8Z0ajNMw/

https://www.instagram.com/p/BRAHOKKjvrO/