ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाला प्रेक्षकांची सध्या चांगलीच पसंती मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून तसे पाहिले तर अभिनेता रणबीर कपूरच्या चित्रपटांच्या वाटेला काही केल्या यश मिळत नव्हते. पण, ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाने रणबीरला चांगलेच तारले आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच अनेकांनी अॅडव्हान्स बुकिंग करत चित्रपटाच्या ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ला हजेरी लावली होती. ‘ऐ दिल….’ सर्वत्र प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच सोशल मीडियावर या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरश: उचलून धरले होते. या चित्रपटासाठी करणच्या दिग्दर्शनापासून ते अगदी रणबीरच्या अभिनयापर्यंत साऱ्याचेत कौतुक केले जात आहे. चित्रपटगृहांबाहेर काही प्रेक्षकांनी तर रणबीरच्याच नावाचा कल्ला केल्याचे चित्र पहिल्या दिवशी होते. ‘रणबीर या चित्रपटामध्ये चमकला आहे. या चित्रपटाचा तोच कणा असून काळानुरुप त्याचे अभिनय कौशल्य आणखीनच खुलत जात आहे’, अशी प्रतिक्रिया एका प्रेक्षकाने दिली.

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपटाने संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) ३.७० कोटीची कमाई केल्याचे ट्विट केले आहे. दिवाळी मुहुर्तावर प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने लोकांना सुट्ट्या असल्यामुळे बॉक्स ऑफिसमवर बक्कळ कमाई करणे अपेक्षित होते. पण यामुळे केवळ तीन दिवसच चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनला फायदा होऊ शकतो. तसेच, या चित्रपटासोबतच प्रदर्शित झालेला अजय देवगणचा ‘शिवाय’ बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. हे दोन्ही चित्रपट २८०० ते ३००० स्क्रिन्सवर प्रदर्शित करण्यात आले आहेत. ‘ऐ दिल है मुश्किल’ला मोठ्या प्रमाणात मल्टिप्लेक्स मिळाले असून ‘शिवाय’ मात्र जास्तीत जास्त सिंगल स्क्रिन थिएटरमध्ये दाखविण्यात येत आहे. ‘ऐ दिल है मुश्किल’चे बजेट जवळपास ७० कोटी रुपये इतके असून १०-१५ कोटी रुपये चित्रपटाच्या प्रसिद्धीवर खर्च करण्यात आले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटाने आपले प्रसिद्धी अधिकार विकून प्रदर्शनापूर्वीच ५० कोटी रुपये कमविल्याचे कळते.

दरम्यान, शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित होताच संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी कल्याणमध्ये चित्रपटगृहाबाहेर निदर्शने केलेली. पाकिस्तानविरोधात  घोषणाबाजी देत कार्यकर्त्यांनी या चित्रपटाला विरोध दर्शवला होता. करण जोहर दिग्दर्शित ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटात पाकिस्तानी अभिनेता फवाद खानने काम केले आहे. उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करु देणार नाही अशी भूमिका मनसेने घेतली होती. त्यामुळे हा चित्रपट अडचणीत सापडला होता. चित्रपट प्रदर्शित केल्यास ‘फटाके’ फुटतील असा इशाराच मनसेने दिला होता. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी मध्यस्थी करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि करण जोहर यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाला मनसेचा विरोध मावळला होता.